Sacred games Season 2: सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन फसलाय का?

सेक्रेड गेम्स

फोटो स्रोत, Netflix/twitter

फोटो कॅप्शन, सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीझनमधील एक प्रसंग
    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

लहानपणापासून अभ्यासात हुशार मुलगा. दहावीच्या वर्षात उत्तम गुणांनी पास होतो. त्याबद्दल त्याचं तोंडभरून कौतुक होतं. सत्कार होतात. सगळ्यांना माहीत असतं हा मुलगा काहीतरी 'करून दाखवणार' आहे.

वर्ष पुढे सरकतात. आता येते बारावी. यावेळी सुद्धा त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा केली जाते. काही जणांना तर हा विद्यार्थी यावेळी मागच्या वेळीपेक्षाही जास्त गुण घेणार असंच वाटत असतं. पण कुठेतरी माशी शिंकते आणि लहानपणापासून हुशार असलेला हा विद्यार्थी जेमतेम काठावर पास होतो.

सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनसोबत पण असंच काहीतरी घडलंय का? समीक्षकांचे रिव्ह्यू, सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया पाहिलात तर सध्यातरी तसंच वाटत आहे. सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन फसलाय का, याबाबत कथा उघड न करता आणि 'स्पॉयलर' टाळून माहिती घेण्याचा प्रयत्न करू.

सेक्रेड गेम्स

फोटो स्रोत, Netflix

सेक्रेड गेम्स-1 ला भारतीय प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. यातलं गणेश गायतोंडेचं पात्र तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. पहिला सीझन संपताना 'सिर्फ त्रिवेदी बचेगा, बाकी कोई नही रहेगा' म्हणून प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यात आली होती.

याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षक सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. 15 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजता सेक्रेड गेम्स 2 रिलीज झाला. अपेक्षा तर खूप होत्या. काही लोकांनी तर आपल्या झोपेचं 'बलिदान' दिलं आणि रात्रभर जागरण करून सलग आठ एपिसोड पाहिले. पण या सीझनमध्ये काहीतरी 'मिसिंग' असल्यासारखं अनेकांना वाटलं.

'गोची' कुठे झाली?

पहिल्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये काही अज्ञात व्यक्ती गायतोंडेला तुरुंगातून सोडवून घेऊन जातात. तिथून पुढे दुसऱ्या सीझनची कथा सुरू होते. त्यानंतर स्वतःला भगवान समजणाऱ्या गायतोंडेचं आयुष्य यू-टर्न घेतं. पुढे केनिया तिथून क्रोएशिया आणि परत भारत अशा गायतोंडेच्या प्रवासाची कहाणी आहे सेक्रेड गेम्स सीझन 2.

या भागातही समांतरपणे वर्तमानातील सरताज सिंग (सैफ अली खान) आणि गायतोंडे (नवाज) यांची कहाणी सुरू असते. पहिल्या भागात वर्तमान काळातल्या दृश्यांचं दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानीने केलं होतं. या सीझनमध्ये त्याच्याऐवजी नीरज घायवानने ही जबाबदारी स्वीकारली आहे. तर फ्लॅशबॅक दृश्यांचा दिग्दर्शक यावेळीही अनुराग कश्यपच आहे.

सेक्रेड गेम्स 2 चे पोस्टर

फोटो स्रोत, Netflix twitter

फोटो कॅप्शन, सेक्रेड गेम्स 2 चे पोस्टर

पहिल्या दोन एपिसोडमध्ये कथा वेगवान आहे. गायतोंडे तुरूंगातून सुटतो खरा पण इथं त्याच्यासोबत अनपेक्षित गोष्टी घडू लागतात. पण हेच त्याचं नवं विश्व असतं. परिस्थितीशी तडजोडी करून यातून बाहेर पडण्याचा त्याचा सतत प्रयत्न सुरू असतो. यादरम्यान केनियातला ड्रग्जमाफिया बोबोचो याला संपवून पुरुषोत्तमला (सानंद वर्मा) त्याच्या जागी बसवणं, दुबईला पळून गेलेल्या इसाला दमबाजी करणं या दृश्यांमुळे गायतोंडे अजूनही जिवंत असल्याची जाणीव करून देतात. रॉ एजंट कुसूमदेवी यादव (अमृता सुभाष) हिच्यासोबतची त्याची जुगलबंदीही चांगली जमली आहे.

दुसरीकडे सरताज सिंग (सैफ अली खान) आपल्या परीने गायतोंडे प्रकरणाचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. पण हा गुंता न सुटता तो आणखीन चक्रव्यूहात अडकत जातो. या सगळ्या गोष्टी कथेमध्ये चांगला इंटरेस्ट तयार करतात.

पण जशी जशी कथा पुढे सरकते, तशी तशी गुरूजी (पंकज त्रिपाठी), गायतोंडे, त्रिवेदी (चित्तरंजन त्रिपाठी) आणि एजंट यादव यांच्याभोवतीच कथा फिरताना दिसते. नंतर नंतर भगवान म्हणवून घेणाऱ्या गायतोंडेची अवस्था तर सर्कशीमध्ये जोकरप्रमाणे झाल्याचं दाखवण्यात आलंय. एकंदर गायतोंडे नावाच्या गोपालमठच्या भगवानचा अशा पद्धतीने झालेला ऱ्हास मनाला पटत नाही. इथूनच कथेची पकड सुटायला सुरूवात होते.

सेक्रेड गेम्स

फोटो स्रोत, Netflix

गायतोंडेचा तिसरा बाप असलेला गुरुजीच संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार असल्याचं सांगितलं जातं. पण पंकज त्रिपाठीने साकारलेल्या गुरूजीचं पात्र वारंवार फक्त प्रवचन देतानाच दाखवण्यात आलंय. वारंवार एकसुरी डायलॉगमुळे दृश्यांमधला इंटरेस्ट निघून जातो. तो इतकं मोठं रॅकेट उभं करत असताना त्याचा आतापर्यंतचा प्रवास आणि त्याच्या पात्राबद्दल सविस्तरपणे माहिती मिळत नाही.

गुरूजींच्या शिबिरात गायतोंडे, भोसले (गिरीश कुलकर्णी), त्रिवेदी हे अनेकवेळा एकत्र आलेले दाखवण्यात आलंय. परंतु, त्यांच्यात काहीच विशेष संवाद होताना दिसत नाही. रहस्यमयी असणाऱ्या त्रिवेदीच्या पात्राबाबत अधिक माहिती मिळत नाही.

इतर पात्रांना न्याय नाही

पहिल्या सीझनचं कथानक गायतोंडे, सरताज आणि अंजली माथुर(राधिका आपटे) या पात्रांभोवती फिरतं. तरीसुद्धा काटेकर (जितेंद्र जोशी), परूळकर (नीरज काबी), कांताबाई (शालिनी वत्स), बंटी (जतीन शर्मा) यांच्याशिवाय गणेश गायतोंडेची पत्नी सुभद्रा (राजश्री देशपांडे) आणि कुकू (कुब्रा सैद) यांच्या लक्षवेधी ठरल्या होत्या. अगदी काटेकर हवालदाराची पत्नीसुद्धा (नेहा शितोळे) चांगलीच लक्षात राहिली होती.

पण दुसऱ्या सीझनमध्ये इतर पात्रांना म्हणावा तितका न्याय मिळालेला नाही. दुसऱ्या सीझनमध्ये गुरूजी आणि रॉ एजंट यादव यांच्याशिवाय शाहीद खान (रणवीर शौरी), बात्या (कल्की कोचलीन) आणि इतर कलाकारांची एंट्री आहे. पात्रांची ओळख करून देण्यात दिग्दर्शक कुठेतरी कमी पडले आहेत का, असंच सारखं वाटत राहतं. दुबळ्या डायलॉगमुळे इतर कोणताही कलाकार प्रभावी वाटत नाही.

सेक्रेड गेम्स

फोटो स्रोत, Netflix

सध्या महाराष्ट्रातील तरूणींच्या गळ्यातला ताईत असणाऱ्या अमेय वाघची या वेब सिरीजमध्ये भूमिका आहे. पण त्याच्या वाट्याला एक ते दोनच सीन आले आहेत. तोसुद्धा अनावश्यक पद्धतीने हिंस्त्र दाखवण्यात आला आहे.

कल्की कोचलिन ही तशी गुणी अभिनेत्री आहे. तिच्याकडून योग्य काम करून घेण्यासही दिग्दर्शक कमी पडले आहेत. गुरूजींची आवडती शिष्या असलेली बात्या फक्त गुरूजींच्या प्रवचनांनंतर एखाद्या रोबोटप्रमाणे ठराविक हालचालीं करताना दिसते.

आंतरराष्ट्रीय दहशतवादी असलेल्या शाहीद खानचं पात्र विशेष असं फुलवण्यात आलेलं नाही. त्याच्या वाट्याला आलेले जड डायलॉग ओढून ताणून तोंडी घातल्यासारखे वाटतात.

मुंबईवर आण्विक हल्ला करण्यासाठी शाहीद खानसारखा मास्टरमाईंड स्वतःच बॉम्ब ठेवायला येतो, हा तर्क थोडासा हास्यास्पद वाटतो. इतर हस्तकांशी त्याचे संबंध आणि त्यांची काम करण्याची पद्धत या बाबींवर प्रकाश टाकण्यात आलेला नसल्याने शाहीद खानचं पात्र थरार निर्माण करण्यात कमी पडतं.

कथेत त्रुटी

सेक्रेड गेम्सचा पहिला सीझन सगळ्याच बाबतीत एक फाईन प्रोडक्ट होता. अधूनमधून होणारी रहस्यमयी पात्रांची एंट्री, कथेला असलेले वेगवेगळे पदर यामुळे पहिल्या सीझनचा प्रत्येक एपिसोड उत्कंठा वाढवणारा होता. एपिसोड संपताना पुढच्या एपिसोडची उत्सुकता लागून राहायची. तसंच त्रिवेदी बचेगा म्हणत दुसऱ्या सीझनची वाट पाहायला लावण्याचीही तयारी करून झाली होती. त्यामुळे साहजिकच दुसऱ्या सीझनकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

दुसऱ्या सीझनच्या कथा आणि डायलॉगवर लेखक वरूण ग्रोव्हरने मेहनत घेतली आहे. पण पहिल्या सीझनच्या तुलनेत ही तोकडी पडल्याचं नंतर जाणवू लागतं. शेवटचे दोन एपिसोड तर विनाकारण लांबवले आहेत असं वाटू लागतं. सॅक्रेड गेम्स ही 25 दिवसांची कहाणी आहे. पण अनेकवेळा कथा संपेल की पुन्हा शेवटच्या पाच दिवसांसाठी सीझन 3 पाहावं लागेल, असा विचार येऊ लागतो.

अनेक चित्रपटांमध्ये शहरांचा वापर एखाद्या पात्राप्रमाणे करण्यात आल्याचं आपण पाहिलं आहे. चित्रपटातील दृश्यांना संबंधित शहराचा गंध असला तर प्रेक्षकांना ते कथानक अधिक जवळचं वाटतं.

सेक्रेड गेम्स 2 मध्ये मुंबईचा उल्लेख वारंवार होतो. पहिल्या सीझनमध्ये पाहायला मिळालेली मुंबई या सीझनमध्ये पाहायला मिळत नाही. अणुहल्ला होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबईत माजलेला गोंधळ पाहणं रंजक ठरू शकलं असतं. पण दोन ते चार सीनमध्येच हा गदारोळ गुंडाळण्यात आलाय. बाँब ठेवलेली जागा शोधण्याचा तर्क तर बाळबोध वाटतो. कथेतील अनेक प्रसंगांसाठी तर फक्त अतार्किक हाच शब्द योग्य राहील.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

पटकथेत अनेक विषयात हात घालून केवळ वरवर स्पर्श करून उथळ माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कथेत पुढे असलेले त्याचे रेफरन्स समजून येत नाहीत. 'त्रिवेदी बचेगा' या डायलॉगवर सगळा गुंता तयार करण्यात आलाय, मात्र या प्रश्नाचं उत्तर शोधताना तुमच्या वाट्याला निराशा येऊ शकते. सेक्रेड गेम्स-2 च्या कथेत ठराविक विचारधारेचं समर्थन करणारं कथानक लिहिण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण हा प्रयत्न केवळ प्रयत्नच राहिल्यामुळे कथानकाकडे थोडंफार दुर्लक्ष झालंय. तात्पर्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात कथानक कमी पडतं.

देशातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करण्याचा प्रयत्न यातून केला आहे. पण दृश्य कथेचा भाग न वाटता मुद्दाम घुसडण्यात आली आहेत की काय, असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो. त्यामुळे नंतर नंतर कधी एकदा 25 दिवसांची ही कथा संपते आणि कधी एकदा आपण मोकळे होतो, असं प्रेक्षकांना वाटू लागतं.

सोशल मीडियावर ट्रोल

सेक्रेड गेम्स 2 ला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. दुबळं कथानक, दुबळे डायलॉग आणि इतर गोष्टींवर नेटकरी टीका करत आहेत. वेब सिरीज रिलीज होऊन आठवडा झाला तरी अजूनही याबाबतचे ट्विट आणि मीम्स सुरूच आहेत. बहुतांश ट्विट आणि मीम्समध्ये सुद्धा प्रेक्षक सॅक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनची टर उडवतानाच दिसत आहेत.

आणखी काही ट्विट पाहा.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

या ट्विटमध्ये सुद्धा असंच काहीसं सांगणारं मीम आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन पाहिलेल्या बहुतांश प्रेक्षकांनी तर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)