काश्मीरच्या सौरामध्ये शुक्रवारच्या नमाजनंतर काय घडलं? - ग्राउंड रिपोर्ट

    • Author, आमिर पीरझादा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, श्रीनगरच्या सौरा भागातून

आम्ही शुक्रवारी श्रीनगरच्या सौरा भागातील त्या दर्ग्यात पोहोचलो, जिथं गेल्या आठवड्यात स्थानिकांनी निदर्शन केलं होतं.

सौरा भागात 9 ऑगस्टला मोठ्या प्रमाणावर निदर्शनं झाली होती. यात हजारो जण सहभागी झाले होते. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. आम्ही सौरा भागात जाण्याचा प्रयत्न केला.

सौरा भागातल्या प्रत्येग गल्लीत बॅरिकेड लागलेले होते. तसंच मोठ्या संख्येनं सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते.

बॅरिकेड हटवले तर मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरू शकतात, असं सुरक्षा रक्षकांचं म्हणणं होतं.

निदर्शक मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचले, तर त्यांना आवर घालणं कठीण होईल आणि कायदा व्यवस्था बिघडेल, असं सुरक्षा रक्षकांचं मत होतं.

सौरामध्ये शांततेनं निदर्शन

या शुक्रवारी (16 ऑगस्ट) नमाजनंतर मोठ्या संख्येनं लोक सौरा भागातल्या दर्ग्याजवळ जमले होते. यात पुरुष आणि महिला सहभागी होत्या. त्यांनी शांततेत मोर्चा काढला, परिसरातील गल्ली-बोळातून हा मोर्चा पुन्हा दर्ग्याजवळ वापस आला.

याच दर्ग्याजवळील लाऊडस्पीकरवर काश्मीरच्या स्वातंत्र्यतेचं गीत ऐकू येत होतं.

याच लाऊडस्पीकरचा वापर करून लोकांना मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत होतं. एकप्रकारे पाहिलं तर लोकांमधील भीती कमी होऊन राग वाढत आहे.

'आमचा हक्क परत मिळावा'

आमचा हक्का हिरावला जात आहे, असं एका निर्दशकाचं म्हणणं होतं.

त्यांनी सांगितलं, "आमचा हक्क आमच्यापासून का हिरावून घेतला जातोय? भारत सरकारनं आम्हाला आमचा हक्क परत द्यावा, असं आमचं म्हणणं आहे. आम्ही शांततेनं मोर्चा काढला असतानाही आमच्यावर पॅलेट गन्स आणि अश्रूधुर फवारण्यात आला. ही बळजबरी नाही, तर काय आहे?"

कलम 370 रद्द करून भारत सरकारनं काश्मीरचं रुपांतर युद्धभूमीत केलं आहे, असं एका महिला निदर्शकाचं म्हणणं होतं.

त्या म्हणाल्या, "आम्ही कलम 370 हटवण्याच्या विरोधात निदर्शन करत आहोत. मोदी सरकारनं हा निर्णय घेऊन काश्मीरला युद्धभूमीत ढकललं आहे. सुरक्षा रक्षक आमच्यावर पॅलेट गन्स आणि अश्रूधुराचा मारा करत आहेत. आम्ही कलम 370साठी जीव देऊ."

"आम्हाला ना भारतासोबत राहायचं आहे, ना पाकिस्तानसोबत, हा आमचा मोदींना संदेश आहे. आम्हाला स्वतंत्र काश्मीर हवंय. प्रत्येक माणसाजवळ अधिकार असतो आणि तसा तो आमच्याजवळही आहे. आम्हाला स्वतंत्र काश्मीर हवंय."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)