कोल्हापूरमधील पाऊस आजवर पडलेल्या पावसाच्या 12 पट : #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, ANI/TWITTER
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. कोल्हापूरमधील पाऊस आजवर पडलेल्या पावसाच्या 12 पट
कोल्हापूरच्या 12 तालुक्यांमध्ये झालेला पाऊस हा आजवरचा सर्वाधिक पाऊस ठरला आहे, गेल्या 24 तासांमध्ये कोल्हापूरमध्ये 12 पट पाऊस पडला आहे, अशी बातमी एबीपी माझानं दिली आहे.
यामुळे पूर्वेकडील नद्यांना पूर आला आणि ही स्थिती उद्भवली. येत्या 48 तासांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, "पुराच्या तडाख्यानं पिकांचं आणि मालमत्तेचं नुकसान सोसत असलेल्या सांगली आणि कोल्हापूर भागातील सर्व शेतकऱ्यांना सरकारनं 100 टक्के कर्जमाफी द्यावी," अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
"पुरात पीक वाया गेलं असताना, संसार उद्धवस्त झाला असताना शेतकऱ्यांना नवीन पेरणीचा खर्च करावा लागणार आहे, त्यासाठी सरकारनं 100 टक्के कर्जमाफी करण्याची गरज आहे. यामुळे द्राक्ष, ऊस आणि इतर भाज्या पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल," असं त्यांनी म्हटलंय.
2. केरळमध्ये पूर, 8 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्येही पूर आला आहे. यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच 5 हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. सामनानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, ANI/TWITTER
केरळच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं 3 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे 12 जिल्ह्यांत जनजीजन विस्कळीत झालं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघात दरड कोसळल्यानं 20 जण बेपत्ता झाले आहेत.
3. प्रफुल्ल पटेलांची सीबीआय चौकशी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांची गुरुवारी (8 ऑगस्ट) सीबीआय चौकशी झाली. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Praful Patel/TWITTER
दीपक तलवार यांच्याशी कथित संबंधाच्या संशयावरून पटेल यांची चौकशी सुरू आहे. दीपक तलवार यांनी परदेशी विमान कंपन्यांसाठी लॉबिंग केले होतं, त्याचा फटका एअर इंडियाला बसल्याचा त्यांच्यावर ठपका आहे.
2004-2011 या काळात प्रफुल्ल पटेल नागरी उड्डाण मंत्री म्हणून कार्यरत असताना हा आर्थिक घोटाळा झाल्याचा संशय आहे.
4. देशातील 57 टक्के डॉक्टर बोगस?
देशातील अलोपॅथीची प्रॅक्टिस करणारे बहुसंख्य डॉक्टर बोगस असल्याचं सरकारी आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
देशात अलोपॅथिची प्रॅक्टिस करणारे 57.3 टक्के डॉक्टर बोगस आहेत, यांच्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील शैक्षणिक अर्हता नाही, असा अहवाल 2016मध्ये जागतिक व्यापार संघटनेनं दिला होता. जानेवारी 2018मध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी हा अहवाल फेटाळून लावला होता.
पण, 6 ऑगस्टला PIBनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, देशात अलोपिथीची प्रक्टिस करणाऱ्या 57.3 टक्के डॉक्टरांकडे कोणतंही वैद्यकीय शिक्षण नाही.
5. हिंदू-मुस्लीम दोन्ही पक्षांनी अयोध्येला रामजन्मभूमी मानावं
रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणातील हिंदू आणि मुस्लीम दोन्ही पक्षांनी अयोध्येला रामाचं जन्मस्थान मानायला हवं, यात काहीएक मतभेद असता कामा नये, असं रामलला विराजमानच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.
याविषयी बाजू मांडताना वरिष्ठ वकील के. परासरन यांनी म्हटलं की, जन्मस्थान म्हणजे फक्त ठिकाण असा त्याचा अर्थ होत नाही, तर सगळ्या आजूबाजूच्या परिसराचा त्यात समावेश असू शकतो.
अयोध्येतील वादग्रस्त जागेविषयी सर्वोच्च न्यायलयात सध्या दररोज सुनावणी सुरू आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








