काश्मीरच्या कलम 370 च्या मीडिया कव्हरेजमधून काश्मीरचा आवाज गायब झाला?

फोटो स्रोत, RSTV
- Author, -
- Role, बीबीसी मॉनिटरिंग
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसदेत जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याची घोषणा केल्यानंतर काही टीव्ही चॅनल्सवर उत्सव आणि आनंदाचं वातावरण दाखवण्यात आलं.
या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो, याविषयी तज्ज्ञ ट्विटरवर आणि वर्तमानपत्रांमध्ये आपली मतं व्यक्त करत होते आणि टीव्ही चॅन्सलवर 'देशात आनंदाचं वातावरण' असल्याची दृश्यं दाखवली जाऊ लागली.
'अखेर भारत आणि काश्मीर एकसंध', 'इतिहास घडवला', 'सगळ्यांसाठी गर्वाचा क्षण' असं टीव्हीवर या 'उत्सवाचं' वर्णन केलं जात होतं. पण त्याचवेळी जम्मू-काश्मीरमधली संपर्क यंत्रणा अजूनही बंद आहे. टेलिफोन लाईन्स, इंटरनेट बंद आहे. कलम 370 हटवलं जात असताना काश्मीरमधल्या कोणाचंही म्हणणं राष्ट्रीय टीव्ही चॅनल्सवर ऐकू आलं नाही.

फोटो स्रोत, AAJ TAK
भारतीय संसदेविषयीची चर्चा, निर्णयाचं समर्थन करणाऱ्या विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि 'देशभरातल्या उत्सवाच्या वातावरणाच्या' दृश्यांवर बहुतेक टीव्ही चर्चा आधारित होत्या.
कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर नाचणाऱ्या आणि आनंद साजऱ्या करणाऱ्या काश्मिरी पंडितांची दृश्यंही सोबतच प्रसारित करण्यात आली. कट्टरतावाद्यांनी दिलेल्या धमक्या आणि हल्ल्यांनंतर ९० च्या दशकामध्ये हजारो काश्मिरी पंडितांनी काश्मीर सोडलं होतं.
टीव्हीवर ज्या इतर प्रतिक्रिया दाखवण्यात आल्या त्यामध्ये बौद्धबहुल लडाख भागामधील लोक सहभागी होते. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळं करत केंद्रशासित प्रदेश करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, TIMES NOW
लडाखच्या लोकांचा संदर्भ देत टीव्ही चॅनल्सनी म्हटलं की यामुळे 'स्वतःची वेगळी ओळख असण्याचं त्यांचं जुनं स्वप्न' पूर्ण होणार आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
भारतीय टीव्ही चॅनल्सवर ऐकू आलेला काश्मीर खोऱ्यातला एकमेव आवाज होता माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचा. इंटरनेटवरच्या निर्बंधांवर मात करत त्यांनी ट्वीट केलं की '5 ऑगस्ट हा भारतीय प्रजासत्ताकाच्या इतिहासातला सर्वांत काळा दिवस आहे.'
ट्विटरवरून मत प्रदर्शन
लोकांना ही बातमी समजल्यानंतर त्यांनी हा निर्णय 'ऐतिहासिक' आणि 'खरंखुरं यश' असल्याचं सांगत याने 'राष्ट्रीय अखंडता मजबूत होणार' असल्याचं ट्विटरच्या माध्यमातून सांगायला सुरुवात केली.
यावेळी भारतामध्ये 'Article370', 'KashmirParFinalFight', 'KashmirMeinTiranga', 'KashmirBleeds' असे हॅशटॅग ट्रेंडिंग होते.

फोटो स्रोत, BBC MONITORING
गृहमंत्र्यांनी ५ ऑगस्टला संसदेत घोषणा केल्यानंतर कलम ३७०विषयी सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आणि काही वेळातच याविषयची पाच हजार ट्वीट्स करण्यात आली होती.
याविषयीच्या ट्वीटसचं प्रमाण सात ऑगस्टपर्यंत प्रचंड वाढलेलं होतं. इतकं की आतापर्यंत जे लोक सरकारचं समर्थन करत नव्हते, त्यांनीही हा निर्णय 'गेम चेंजर' असल्याचं ट्वीट केलं.
अनेक ट्विटर युजर्सनी तिरंग्याच्या रंगांतल्या भारतीय संसदेचे फोटोदेखील शेअर केले.

फोटो स्रोत, @ANSUMANSINGHBA1
कलम 370 नुसार आतापर्यंत जम्मू-काश्मीर बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तिथे संपत्ती विकत घेता येत नव्हती. हे कलम हटवण्यात आल्यानंतर आता कोणालाही तिथं मालमत्ता घेता येणार आहे.
या विषयीचे विनोद आणि मीम्सही सोशल मीडियावर फिरत होते. शिवाय काश्मीरमध्ये तैनात असणाऱ्या सुरक्षादलांसाठीचे संदेशही यात होते.
काश्मीरसोबत सहानुभूती
पण यासोबतच सोशल मीडिया आणि ट्विटरवर वर अनेक युजर्सनी सरकारची ही घोषणा आणि त्यांच्या कारवाईविषयीची काळजी व्यक्त केली.

फोटो स्रोत, BBC MONITORING
अनेक युजर्सनी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरून काश्मिर आणि तिथल्या जनतेसोबत सहानुभूती दाखवण्यासाठी आपला डिस्प्ले फोटो बदलून लाल रंगाचा केला होता.
सोशल मीडियावर अनेकांनी जम्मू-काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या लोकांना मदत करण्याविषयीही लिहिलेलं आहे. जर कोणाला भीती वाटत असेल किंवा कोणी त्यांना धमकावत असेल तर आपल्याकडे मदत मागता येईल, असं ट्वीट अनेक युजर्सनी केलं होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








