काश्मीर : राज्यपाल म्हणतात राज्यघटनेत काही बदल झाल्याची मला कल्पना नाही

जम्मू काश्मीरमध्ये सध्या अतिरिक्त जवानांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यामुळे राज्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर नॅशनल काँफरन्सच्या प्रतिनिधी मंडळांने राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली.

"देशात कुठलाही बदल झालेला नाही, देशाची स्थिती जैसे थे आहे. राज्यघटनेत काही बदल झाल्याची निदान मला तरी कल्पना नाही. तेव्हा तुम्ही घाबरून जाऊ नका. सबुरीने घ्या," असा सल्ला राज्यपालांनी प्रतिनिधी मंडळाला दिला आहे.

राज्यात मोठ्या घातपाताची शक्यता आहे अशी माहिती गुप्तहेर खात्याला मिळाली होती. त्यानुसारच राज्यात अतिरिक्त जवानांच्या तुकड्या तैनात केल्या गेल्या आहेत, असं राज्यपालांनी सांगितलं.

"नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. त्याला भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं," मलिक यांनी सांगितलं.

भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. लष्कराने केलेल्या कारवाईत मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती राज्यपालांनी दिली.

राज्यातील लोकांची सुरक्षा डोळ्यासमोर ठेऊनच राज्यात फौजा तैनात करण्यात आल्या आहेत. या फौजा लोकांचं संरक्षण करण्यासाठी आहेत. त्यामुळे याचा संबंध इतर कुठल्याही मुद्द्याशी जोडू नये असं आवाहन मलिक यांनी केलं.

संरक्षणासाठी करण्यात आलेल्या उपायांचा संबंध अनावश्यक गोष्टींशी जोडण्यात आल्यामुळे राज्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भाविकांच्या सुरक्षेचा विचार करून सरकारनं त्यांना आपल्या राज्यात परतण्याचं आवाहन केलं आहे.

या भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही आमची आहे. या भाविकांना राज्याच्या भौगोलिक परिस्थितीची माहिती नाही तेव्हा त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा दहशतवादी संघटना घेऊ शकतात. म्हणून त्यांना सुरक्षितरीत्या परत जाण्याचं आवाहन आम्ही केलं आहे, असं मलिक म्हणाले.

भाविकांना परतण्याचे आव्हान राज्यपालांनी केल्यानंतर राज्यात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं ओमर अब्दुल्ला यांनी राज्यपालांना सांगितलं. स्थिती चिघळण्याची भीती लोकांना वाटत आहे ते किराणा माल भरून ठेवत आहेत. असं अब्दुल्ला यांनी राज्यपालांना सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)