उन्नाव बलात्कार प्रकरण: कार क्रॅशप्रकरणी कुलदीप सेंगर यांच्यावर हत्येचा आरोप नाही

फोटो स्रोत, facebook
उन्नाव रस्त्यावर झालेल्या एका घटनेत बलात्कार पीडिता आणि तिचं कुटुंब जात असताना अपघात झाला होता. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात बलात्काराचा आरोप असलेले भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्याकडे संशयाची सुई वळली होती.
सीबीआयनं भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यासह इतर आरोपींविरोधात कोर्टात चार्जशीट दाखल केलं. या चार्जशीटमध्ये हत्येचा प्रयत्न किंवा कट असा उल्लेख नसून, केवळ एक अपघात असं नमूद करण्यात आलंय.
याच वर्षी जुलै महिन्यात घडलेल्या या दुर्घटनेत बलात्कार पीडित तरूणी आणि तिचा वकील गंभीररीत्या जखमी झाले होते. तसेच, दुर्घटनाग्रस्त कारमध्ये पीडितेचे दोन नातेवाईक मृत्यूमुखी पडले होते.
या प्रकरणात आरोपींविरोधातील हत्येचे आरोप हटवण्यात आल्याची माहिती सीबीआयच्या प्रवक्त्यांनी दिलीय.
"कुलदीप सिंह यांच्याविरोधात आयपीसी कलम 120 (बी) अन्वये गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे आणि ट्रक ड्रायव्हर आशिष कुमार पाल यांच्याविरोधात कलम 304, 279 आणि हलगर्जीपणानं गाडी चालवण्यासारखे आरोप लावण्यात आले आहेत," असं सीबीआयच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
या प्रकरणात हत्येचा प्रयत्न किंवा हत्येचा कट रचल्याचे सीबीआयला कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, असंही सीबीआयच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
काय आहे घटना?
उन्नाव बलात्कार पीडित मुलगी 28 जुलै 2019 रोजी रायबरेलीला जात असताना एका ट्रकने तिच्या कारला धडक दिली होती. त्यात पीडित मुलगी गंभीररीत्या जखमी झाली तर तिच्या दोन नातेवाईकांचा मृत्यू झाला. या कारमध्ये असणारे पीडितेचे वकीलही जखमी झाले होते.
या ट्रक-कार धडक घटनेची सात दिवत चौकशी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने CBIला दिले होते. CBIला गरज पडल्यास ते एखादा आठवडा जास्त वेळ घेऊ शकतात, असंही कोर्टाने म्हटलं होतं.
कार-ट्रक धडकेची ती घटना अपघात आहे की घातपात, याची चौकशी होत होती. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने हा तपास CBIकडे सोपवला होता.
या प्रकरणी कुलदीप सिंह सेंगर यांच्यासह 10 लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पीडितेला 25 लाखाची नुकसानभरपाई देण्याचा तसंच पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याचे आदेशही दिले होते.
दरम्यान, उन्नाव बलात्काराची सगळी प्रकरणं उत्तर प्रदेशातून दिल्लीला वळते करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. पीडितेच्या कुटुंबाने लिहिलेल्या चिठ्ठीवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने आता या प्रकरणी 45 दिवसांत सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, उन्नाव बलात्कार प्रकरणात आरोपी असलेले आमदार कुलदीप सिंह सेंगर यांची भाजपने हकालपट्टी केली आहे. त्यांच्यावर सध्या पाच खटले सुरू आहेत, ज्यापैकी बलात्काराच्या प्रकरणाची कोर्टात रोज सुनावणी होणार आहे.
कोण आहेत कुलदीप सिंह सेंगर?
2002 साली कुलदीप सेंगर बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून आमदार झाले. उन्नावमधून बसपाला हे पहिल्यांदाच मिळालेलं यश होतं. त्यानंतर सेंगर यांनी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आणि 2007 साली ते बांगरमाऊ येथून आमदार म्हणून निवडून गेले.
2012 साली त्यांनी भाजपाच्या तिकिटावर भगवंतनगर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. तीन पक्षांमधून विजय मिळवणाऱ्या सेंगर यांचा त्यांच्या जिल्ह्यात चांगलाच प्रभाव आहे.
उत्तर प्रदेशातील ज्येष्ठ पत्रकार शरद गुप्ता यांच्यामते "कुलदीप सेंगर इतके प्रभावी नेते झाले आहेत की ते कोणालाही पराभूत करू शकतात किंवा कोणालाही जिंकून आणू शकतात. ते त्यांच्या कार्यक्षेत्रात अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे ते पक्षश्रेष्ठींचा कधीच मुलाहिजा ठेवत नाहीत. समाजवादी पक्षामध्ये असताना त्यांनी पक्षाध्यक्षांची इच्छा डावलून आपली पत्नी संहीता सेंगरला जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवायला सांगितले होते. संगीता सेंगर यांना पराभूत करण्यासाठी सपा सरकारने पूर्ण प्रयत्न केले होते मात्र तरिही त्या विजयी झाल्या. आता राजीनामा देऊनही त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली तर ते विजयी होऊ शकतात."

फोटो स्रोत, Anubhav swarp yadav
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये उन्नाव बलात्कार प्रकरण उघडकीस आलं होतं. भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्यावर माखी गावातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. हीच पीडित मुलगी रविवारी झालेल्या अपघातात गंभीररित्या जखमी झाली आहे.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीने त्यांच्यावर आरोप केले होते आणि या प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBIने कुलदीप सेंगर यांना अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.
याप्रकरणावरून उत्तर प्रदेशातील राजकारण पेटलं होतं. याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होईल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं होतं.
जून 2019 मध्ये भाजप खासदार साक्षी महाराज यांनी सीतापूर जिल्ह्यातील तुरुंगात कुलदीप सेंगर यांची भेट घेतली होती. या भेटीवरून वादंग निर्माण झाला होता.
"कुलदीप सेंगर उत्तर प्रदेशातील लोकप्रिय नेते आहेत. निवडणुकीनंतर त्यांना धन्यवाद देण्यासाठी मी त्यांची भेट घेतली," असं साक्षी महाराज यांनी सांगितलं होतं.
उन्नाव प्रकरण काय आहे?
जून 2017 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप कुलदीप सेंगर यांच्यावर आहे.
"नोकरी मागण्यासाठी नातेवाईकांबरोबर कुलदीप यांच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी माझ्यावर बलात्कार केला," असा आरोप पीडित मुलीने केला.
पीडित मुलीची तक्रार सुरुवातीला पोलिसांनी नोंदवून घेतली नाही. कुलदीप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर तक्रार नोंदवून न घेण्याचा दबाव आणल्याचा आरोप मुलीच्या घरच्यांनी केला होता आणि त्यानंतर पीडित मुलीच्या घरच्यांनी न्यायालयीन लढाईचा मार्ग स्वीकारला होता.
दरम्यान, पीडित मुलीच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला.

फोटो स्रोत, AFP
मृत्यूआधीचा त्यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता, ज्यात कुलदीप यांचा भाऊ आणि अन्य काही लोकांनी पोलिसांच्या उपस्थितीत आपल्याला मारहाण केल्याचं म्हणताना दिसत होते. ही घटना 3 एप्रिलची होती.
पोलिसांच्या निष्क्रियतेला आणि कुलदीप आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या दंडेलशाहीला कंटाळून पीडित मुलीने मुख्यमंत्री योगी यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं.
त्यानंतर कुलदीप सेंगर यांच्याविरोधात उन्नावमधील माखी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली. प्रशासनाने याप्रकरणाचा तपास CBIने करावा, असे आदेश दिले होते. CBIने कुलदीप यांना अटक केली होती.
याप्रकरणाच्या तपासात होत असलेल्या दिरंगाईबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने खेद व्यक्त केला होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








