अफगाणिस्तानातल्या या महिलांनी आपले ओठ शिवून का घेतलेत?

- Author, खुदा-ए-नूर-नासिर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप काही महिला उमेदवारांनी केला आहे. या कथित गैरप्रकाराविरोधात अफगाणिस्तानातील राष्ट्रपती भवनासमोर ओठ शिवून या महिला निदर्शनं करत आहेत.
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत अफगाणिस्तानातील अनेक प्रांतांमध्ये या महिला उमेदवार पराभूत झाल्या होत्या.
निदर्शन करणाऱ्या महिला उमेदवारांपैकी डीवा नयाजी यांनी इतर पाच महिला उमेदवारांसोबत मंगळवारी राष्ट्रपती भवनासमोर ओठ शिवून निदर्शनं केली.
बीबीसीशी बोलताना डीवा नयाजी म्हणाल्या, "ओठ शिवून निदर्शनं करणं ही आमची हतबलता आहे. कारण हे सरकार बहिरं आणि मुकं आहे."
या महिला उमेदवार गेल्या तीन महिन्यांपासून धरणं आंदोलन करत आहेत. या महिलांचा आरोप आहे की, "गेल्यावर्षी पार पडलेल्या संसदीय निवडणुकीत महिला उमेदवारांबाबत गैरप्रकार झाला आणि आमच्या जागांवरून असे उमेदवार संसदेत निवडून गेले, ज्यांनी लाच आणि दबावाने निवडणुकीचे निकाल बदलले."

नयाजी म्हणाल्या, "आम्ही सर्व अफगाणी महिला गेल्या तीन महिन्यांपासून धरणं आंदोलन करत आहोत. मात्र, आमच्या मागण्या ऐकून त्यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रपतींकडे तीन मिनिटांचाही अवधी नाही."
आमचं धरणं आंदोलन शेवटच्या श्वासापर्यंत सुरुच राहील, असेही नयाजी यांनी ठणकावून सांगितलं.
नजीबा फैज हेलमंदी या नयाजी यांच्यासोबत निदर्शनं करणाऱ्या आणखी एक महिला उमेदवार आहेत. बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "महिला उमेदवारांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी अफगाणिस्तान सरकारने एक विशेष समिती स्थापन करावी."

डॉ. जाहिदा फैजान सांगतात, "आम्ही तीन महिन्यांपासून धरणं आंदोलन करत आहोत. आम्ही याआधी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. मात्र, राष्ट्रपतींचे सल्लागार हमदुल्लाह मुहीब यांनी आमची भेट घेतली आणि आमच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे आम्ही अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं. मात्र, 25 दिवस उलटल्यानंतर सरकारने आपलं आश्वासन पूर्ण केलं नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे.
डॉ. जाहिदा फैजान यांचाही आंदोलनकर्त्या महिलांमध्ये समावेश आहे.

अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनासमोर निदर्शनं करणाऱ्या या महिलांच्या म्हणण्यानुसार, "आम्ही आमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलनं केली. ईदच्या दिवशी कफन परिधान करून निदर्शनं केली होती. मात्र, तरीही आमचा आवाज कुणीही ऐकला नाही."
दुसरीकडे, अफगाणिस्तानातील निवडणूक आयोग आणि सरकारने महिला उमेदवारांचे आरोप फेटाळले आहेत.
"अफगाणिस्तानात गेल्यावर्षी झालेली निवडणूक पूर्णपणे निष्पक्ष होती. राष्ट्रपती भवनासमोर निदर्शनं करणाऱ्या महिला उमेदवार आपापल्या जागांवर पराभूत झाल्या आहेत", असे निवडणूक आयोग आणि सरकारचं म्हणणं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








