तिहेरी तलाक: घटस्फोटाचा लढा ती स्वतः लढली आणि आता इतरांनाही मदत करतेय

    • Author, हलिमा कुरेशी
    • Role, बीबीसी मराठीसाठी पुण्याहून

तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत 99 विरूध्द 84 अशा मतांनी विधेयक मंजूर झालं. हे विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल. राष्ट्रपतींच्या सहीनंतर त्याचं कायद्यात रुपांतर होईल.

तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर मुस्लीम महिलांनी या विधेयकाचं स्वागत केलं. काही जणींनी कायदा हवा मात्र मुस्लीम पुरुषाला शिक्षेची तरतूद असण्याला आक्षेप घेतला आहे. मात्र शहनाझ शेख यांनी या विधेयकाचं स्वागत केलंय. "यापुढे कोणताही मुस्लिम पती आपल्या पत्नीला उठसूठ तलाक देणार नाही, तीन वर्षांपर्यंतची तरतूद असल्याने तलाक देण्याआधी तो विचार करेल तलाक देऊ की नको?"असं म्हटलं आहे.

तिहेरी तलाक (तलाक-ए-बिद्दत) म्हणजे एकाच दमात पती आपल्या पत्नीला तीन वेळा तलाक म्हणत घटस्फोट देतो, मग लिखित स्वरूपात, बोली स्वरूपात, पत्राद्वारे आणि फोनवर देखील अशा पद्धतीने दिला जाणाऱ्या तलाकने अनेक महिलांचं आयुष्य पोळलं गेलं आहे. भविष्याची कसलीही सुरक्षितता नाही, सतत तलाकची टांगती तलवार यामुळे मुस्लिम महिला दडपणात जगत आल्या आहेत.

कराडमध्ये राहणाऱ्या शहनाझ शेख या सगळ्याला अपवाद आहे. त्या आत्मविश्वासाने समाजात वावरत आहे. पतीने दिलेल्या तिहेरी तलाक विरोधात त्यांनी कोर्टात खटला दाखल केला आणि पतीने दिलेला तलाक अवैध आहे हे सिद्ध करून दाखवलं.

"निकाहच्या वेळेस मुलीची परवानगी घेतली जाते तिचं मत विचारलं जातं मग घटस्फोटाच्या वेळेस का विचारलं जात नाही" या विचारातून त्या पेटून उठल्या. पतीने दिलेला तलाक आपल्याला नामंजूर असल्याचं म्हणत त्यांनी न्यायालयात केस दाखल केली. एवढंच नाही तर न्यायालयात त्यांनी हा लढा जिंकला देखील. पण ही सगळी प्रक्रिया त्यांच्यासाठी सोपी नक्कीच नव्हती. शहनाझ यांनी पॅरामेडिकल सायन्स आणि पत्रकारितेचं शिक्षण घेतलंय. लग्नानंतर काही महिन्यातच त्यांच्या डॉक्टर पतीने त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. हा त्रास त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याइतपत होता असं त्या सांगतात.

मात्र त्या या सगळ्यातून बचावल्या, पतीने त्यांना रमझान ईदचं निमित्त करून माहेरी पाठवलं आणि काही दिवसात त्यांच्या हातात पतीने तलाक दिल्याची नोटीस दिली. हा तलाक त्यांना न विचारता, त्यांच्या गैरहजेरीत काही साक्षीदारांच्या समोर तीन वेळा तलाक उच्चारून देण्यात आला होता. मात्र त्या खचून गेल्या नाहीत. "आपण एवढ्या सुशिक्षित असताना आपल्याला हा त्रास होतोय तर सर्वसामान्य मुस्लीम मुलींचं, महिलांचं काय , आपण यासाठी उभा राहिलं पाहिजे " हा विचार करून त्या पाय घट्ट रोवून उभ्या राहिल्या.

कायद्याच्या शिक्षणाचं अस्त्र

शहनाझ यांनी कायद्याचं शिक्षण घेण्याचं ठरवलं. कराडच्या यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेजमध्ये त्यांनी एलएलबीला प्रवेश घेतला. इथेच त्यांना मुस्लिम धर्मातील घटस्फोटाचे कायदे, शरियत याबद्दल कळलं. एकतर्फी दिला जाणारा तलाक-ए-बिद्दत यापूर्वी ग्राह्य धरला जायचा. मात्र आता तो ग्राह्य धरला जात नाही, आणि याच्या विरोधात न्यायालयात जाता येतं हे कायदा शिकविणाऱ्या शिक्षकांनी सांगताच शहनाझसमोर आशेचा किरण दिसला. त्यांनी कराड कोर्टात (प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी) केस दाखल केली. कोर्टात केस दाखल करत असताना इतर मुस्लीम वकिलांनी तुमचा तलाक झालेला आहे, उगाचच तुम्ही तुमचा पैसा, वेळ वाया घालवू नका असं म्हटलं, मात्र त्यांनी या कोणत्याही बाबींचा स्वतःवर परिणाम होऊ दिला नाही.

केस दाखल झाली खरी पण त्यांच्या वकिलाचं मुस्लीम घटस्फोट, कुराणात असलेल्या तरतुदी, यापूर्वी तलाक संदर्भातील महत्वाचे निकाल याच ज्ञान कमी पडत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर शहनाझ यांनी अभ्यास सुरू केला. शेकडो पुस्तकं धुंडाळत त्यांनी विविध केसेसचे संदर्भ, कुराणात शिफारस असलेल्या तलाक-ए-हसन,आयाती यांचा शोध घेतला. कोर्टासमोर कुराणातील शिफारशी इंग्रजी आणि मराठी कुराणच्या प्रती सादर केल्या. कोर्टाने या सगळ्या बाबी ग्राह्य धरत शहनाझचं लग्न अबाधित असल्याचा निकाल दिला. याचाच अर्थ त्यांना दिला गेलेला तलाक हा बेकायदेशीर ठरला. हा निर्णय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी जुलै 2015 मध्ये दिला.

खरंतर सायराबानो यांच्या सुप्रीम कोर्टातील याचिका आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाचा निर्णय येण्याआधीच शहनाझ ने आपल्या कायद्याच्या अभ्यासाच्या बळावर पतीने दिलेल्या तिहेरी तलाकला अवैध ठरवण्यात यश मिळवलं होतं.

मीच केस लढली

अप्रत्यक्षरित्या आपणच केस लढल्याचं शहनाझ सांगतात. पतीची साक्ष जेव्हा तपासण्याची संधी होती तेव्हा शहनाझ यांनी आपल्या वकीलाला विविध केसेसचा संदर्भ, कुराणातील आयाती यांचा संदर्भ असलेली प्रश्नावली दिली, आणि त्या वकिलांना विनंती केली की यानुसार प्रश्न विचारावेत, वकिलांनी देखील सहकार्य करत तसेच प्रश्न विचारले. शहनाझ यांनी कुराणातील आयात सुरे-अल-बकर, सुरे-निसा- सुरे तलाक यांचा संदर्भ ,त्यातील शिफारशी कोर्टासमोर मांडल्या , तसेच सुप्रीम कोर्टातील शमीम आरा आणि मुंबई उच्च न्यायालयातील दगडू पठाण केस यांच्या संदर्भात दिलेले महत्वपूर्ण निकालांचे संदर्भ , कोर्टाची टिपण्णी सादर केली. यामुळे शहनाझ यांची बाजू कोर्टात ग्राह्य धरली गेली. शहनाझ यांनी पोटागीसाठी देखील दावा केला होता त्यात देखील कोर्टाने पोटगी मंजूर केली.

एकामागोमाग केसेस जिंकत असताना शहनाझ समाजासाठी असलेले कर्तव्य विसरल्या नाहीत. त्यांनी संजीवन हेल्पिंग हॅण्ड सोशल ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना केली. समाजातील सर्व महिलांसाठी आपल्या ज्ञानाचा वापर व्हावा यासाठी प्रयत्न करत अनेक जणांना मदतीचा हात देत आहे. शहनाझ यांनी पाच वर्ष पतीच्या विरोधात तलाक ,पोटगी आणि कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्या अंतर्गत विविध केसेस दाखल केल्या त्या स्वतः पुढाकार घेत वकिलाच्या मदतीने लढल्या. या सगळ्या काळात मानसिक, आर्थिक या सगळ्या आघाड्या सांभाळत महिलांना मार्गदर्शन,विविध प्रकारे मदत करणं सुरू ठेवलंय. एवढंच नाही तर बेकायदेशीररित्या तलाक दिल्या गेलेल्या महीलांसाठी समुपदेशन, सल्ला आणि कायद्यांची माहिती दिली जाते.

कोणत्याही मुलीने खचून न जाता आलेल्या आव्हानांना सामोरे जाणं महत्वाचं असल्याचं त्या सांगतात.

पुण्यात एका महिलेची केस त्यांच्याकडे नुकतीच आलीय. शहनाझ त्यांना मार्गदर्शन करत आहेत. या महिलेच्या लग्नाला 23 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पतीने तलाक दिला आहे. राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्याचं कळताच दोघींच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. हे विधेयक केवळ मुस्लिम महिलांसाठी नाही तर सर्व महिलांसाठी आनंदाची गोष्ट असून ,या कायद्यामुळे समानतेचा अधिकार अबाधित राहील. तसंच कोणताही नवरा आपल्या पत्नीला तलाक देताना विचार करेल असं शहनाझ सांगते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)