'होय, मीच नरेंद्र दाभोळकरांवर दोनदा गोळ्या झाडल्या' : #5मोठ्याबातम्या

नरेंद्र दाभोळकर

फोटो स्रोत, FACEBOOK NARENDRA DABHOLKAR

फोटो कॅप्शन, नरेंद्र दाभोळकर

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. 'होय, मीच दाभोळकरांवर दोनदा गोळ्या झाडल्या'

नरेंद्र दाभोळकर त्यांच्या हत्ये प्रकरणी आरोपी शरद कळसकर याने आपणच त्यांच्यावर दोनदा गोळ्या झाडल्याचा कबुलीजबाब दिला आहे.

एनडीटीव्हीच्या हाती कळसकरच्या 14 पानी कबुलीजबाबाची प्रत आली असून त्यामध्ये गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्येशीही आपला संबंध असल्याचे त्याने म्हटलं आहे.

एनडीटीव्हीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. शरद कळसरकरला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती.

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक झाल्यानंतर कळसकरने दाभोळकरांच्या हत्येबाबत माहिती उघड केली. नालासोपारामधून कळसकरला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती.

2. धनगर आरक्षणावरून गदारोळ, मुस्लीम आरक्षणासाठी नेते आक्रमक

धनगर समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये अनुसुचित जमातींचे आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी एकमेकांवर आरोप करत विधानपरिषदेचे कामकाज बंद पाडलं.

धनगर आरक्षण

फोटो स्रोत, Getty Images

यावेळी विरोधकांबरोबर सत्ताधारीसुद्धा सभापतींच्यासमोरील मोकळ्या जागेत उतरून घोषणाबाजी करू लागले होते. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी या चर्चेत केलेल्या वक्तव्यानंतर सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला.

तालिका सभापतींनी धनगर आरक्षणावरील चर्चेला परवानगी दिल्यानंतर काँग्रेसच्या रामहरी रुपनवार यांनी सरकारने धनगर आरक्षणाच्या बाबतीत समाजाची फसवणूक केली असा आरोप केला. 5 वर्षं सरकारने चालढकल केली असून सर्वेक्षणाचं काम दिलेल्या टाटा समाजविज्ञान संस्थेचा अहवालही दडपल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यानंतर 'धनगर वा मराठा समाज ही कोणाच्या बापाची जहागीर नाही', असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केल्यानंतर भाजप शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले.

जगताप यांनी सभागृहाची माफी मागितल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका आमदार अनिल परब यांनी घेतली. गोंधळ सुरू राहिल्याने सभापती रामराजे निंबाळकर यांनी सभागृह तहकूब केलं. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

मराठा आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवल्यावर मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळावं अशी मागणी सपा नेते अबू आझमी, काँग्रेसचे नेते अमिन पटेल आणि नसिम खान यांनी केली आहे. मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अबू आझमी यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनही केलं.

इम्तियाज जलील, ओवैसी

फोटो स्रोत, Getty Images

मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे. आरक्षणासाठी मराठा समाज आंदोलन करत होता त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे होतो आता मराठा समाजाने आमच्या आरक्षणासाठी साथ द्यावी अशी मागणी, खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

अनेक आयोग, कमिटी यांनी शिफारस करूनही मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न मात्र गांभीर्याने घेतला जात नाही, असा आरोप जलील यांनी केला. एबीपी माझाने वृत्त प्रसिद्ध केला आहे.

3. आता देशात 'वन नेशन वन रेशनकार्ड'

संपूर्ण देशासाठी आता 'वन नेशन वन रेशन कार्ड' या योजनेची घोषणा केंद्र सरकारने गुरुवारी केली. यामुळे संपूर्ण देशात एकच रेशन कार्ड कुठेही वापरता येईल.

एकाच व्यक्तीने अनेक रेशन कार्ड्स बाळगून वेगवेगळ्या राज्यांमध्ये लाभ घेण्याची पद्धत यामुळे बंद होईल, असंही केंद्र सरकारचं याबाबत म्हणणं आहे.

रामविलास पासवान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रामविलास पासवान

राज्य सरकारांच्या सचिवांबरोबर झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी हा निर्णय वेगाने अंमलात येण्यासाठी प्रयत्न होतील, असं सांगितलं.

"स्थलांतर करणाऱ्या मजुरांना आता पूर्ण अन्नसुरक्षा मिळेल. एकाच रेशन दुकानाशी संलग्न राहाण्याची पद्धत बंद झाल्यामुळे त्यांना (स्थलांतर केलेल्या जागी जाऊन धान्य घेण्याचे) स्वातंत्र्य मिळेल. यामुळे भ्रष्टाचारही कमी होईल," असं रामविलास पासवान यांनी सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

4. आदित्य पंचोलीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

एका अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पंचोली यांच्याविरुद्ध गुरुवारी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आदित्य पंचोलीने गुंगीचं औषध देऊन आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीने वर्षभरापूर्वी केला होता.

आदित्य पंचोली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आदित्य पंचोली

अश्लील फोटो आणि व्हीडिओ तयार करून त्याच्याआधारे 2004 ते 2009 या कालावधीत वारंवार अत्याचार केल्याची तक्रार तिने पोलिसात केली होती.

तसंच या फोटो-व्हीडिओच्या आधारे एक कोटी रुपयांची खंडणीही मागितल्याचा आरोप तिने केला होता. या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी आदित्य पंचोलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

5. नीरव मोदी यांच्या कोठडीत वाढ

पंजाब नॅशनल बँकेचे पैसे बुडवणाऱ्या नीरव मोदींच्या कोठडीत वाढ झाली आहे. त्यांना आता 25 जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं.

नीरव मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नीरव मोदी

नीरव मोदींच्या वकिलांनी त्यांच्याविरोधात असलेल्या भारत सरकारने दाखल केलेल्या 5 हजार पानांच्या आरोपपत्राचं पुनरावलोकन तुरुंगातच करता यावं यासाठी लॅपटॉप देण्याची विनंती केली होती.

या महिन्याच्या सुरुवातीलाही नीरव मोदींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. आतापर्यंत 4 वेळा त्यांचा जामीन अर्ज फेटाळला गेला आहे. लोकसत्ताने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)