Child Adoption: महाराष्ट्र दत्तक घेण्यात देशात अव्वल, पण मुलांपेक्षा मुलींना अधिक पसंती का दिली जाते?

दत्तक प्रातिनिधिक

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, कमलेश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

सविताला अपत्य नव्हतं, असं नाही. मात्र, तिला मुलगी हवी होती. ती पुन्हा गरोदर होऊ शकत नव्हती, अशातलाही भाग नव्हता. मात्र तिला एक मुलगी दत्तक घ्यायची होती.

मुलीचं संगोपन करण्याच्या आनंदाच्या शोधात उत्तर प्रदेशात राहणारी सविता आणि तिचे पती एका अनाथालयात गेले. तिथे त्यांना एका गोड मुलीच्या रूपात नवं जगच मिळालं. एकमेकांसाठी अनोळखी असलेले हे आईवडील आणि ती मुलगी आता एकमेकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेत.

उत्तर प्रदेशात राहणारी सविता आपल्या आयुष्यात या नव्या पाहुणीला आणण्याचं कारण सांगते, "मी अशा ठिकाणाहून आले आहे जिथे मुलीला ओझं मानलं जातं. तिच्या जन्मापूर्वी लपून-छपून गर्भलिंगनिदान केलं जातं. तिचा जन्मा झाला फक्त तिच्या सासरी पाठवायचं असतं.

"मात्र ही मानसिकता बदलून स्वतःच्या मुलीचं संगोपन करण्याची माझी इच्छा होती. प्रेम आणि आदर यावर मुलीचाही तेवढाच हक्क आहे जेवढा मुलाचा. त्यामुळेच एक मुलगा असूनही मी एका मुलीला समानता आणि प्रेम असलेलं आयुष्य देण्याचा निर्णय घेतला. आज माझी मुलगी पिहू सर्वांची लाडकी झाली आहे," ती सांगते.

या देशात 'मुलगी नको' असं म्हणणारे अनेक आहेत. तसंच काही जण असेही आहेत जे मुलगी दत्तक घेऊन स्वतःच्या आणि त्यांच्या आयुष्यातली पोकळी दूर करत आहेत. इतकंच नाही तर मुलांच्या तुलनेत मुलींना दत्तक घेणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.

महाराष्ट्र अव्वल

सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स एजेंसी (CARA) या संस्थेच्या 2018-19च्या आकडेवारीनुसार या वर्षभरात लोकांनी जवळपास 60% मुली दत्तक घेतल्या आहेत. मुलांपेक्षा मुलींना दत्तक घेण्याचं प्रमाण जास्त आहे. 2018-19 साली भारतात एकूण 3,374 बाळं दत्तक घेण्यात आलं. यापैकी 1,977 मुली होत्या आणि 1,397 मुलं.

सविता पाटील

फोटो स्रोत, Savita Patil

फोटो कॅप्शन, सविता पाटील त्यांची मुलगी पिहू आणि मुलासह

दत्तक प्रक्रियेत CARA नोडल संस्थेची भूमिका बजावते. ही संस्था प्रामुख्याने अनाथ, सोडलेल्या आणि आत्मसमर्पण करणाऱ्या मुलांना दत्तक देण्यासाठी काम करते.

नव्या आकडेवारीनुसार भारताबाहेरून 653 मुलं दत्तक घेण्यात आली. यात 421 मुली आणि 232 मुलं आहेत. अशाप्रकारे यावर्षी एकूण 4,027 मुलं दत्तक घेण्यात आली.

दत्तक घेण्याच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात एकूण 477 मुलं दत्तक घेण्यात आली.

ही आकडेवारी अनेक वर्षांपासून अशीच आहे. 2016-17 साली भारतात 3,210 मुलं दत्तक घेण्यात आली. यात 1,975 मुली तर 1,295 मुलं होती. 2015-16 साली 3,011 मुलं दत्तक घेण्यात आली. यात 1,855 मुली तर 1,156 मुलं होती. 2017-18 साली 3,276 मुलं दत्तक घेण्यात आली. मात्र त्यावर्षी किती मुलं आणि किती मुली दत्तक घेण्यात आला, त्याची आकडेवारी उपलब्ध नाही.

भारतात स्त्री आणि पुरुष यांचं प्रमाण कधीच समान होऊ शकलेलं नाही. शिवाय, स्त्री भ्रृणहत्या एक मोठी समस्या आहे. 2011 सालच्या जनगणनेनुसार भारतात 1,000 पुरुषांमागे 943 स्त्रिया आहेत.

हरियाणा, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, चंदीगड आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये हे प्रमाण 900च्याही खाली आहे. अशावेळी दत्तक घेण्याची ही आकडेवारी बघून थोडं आश्चर्य वाटतं.

वंशाचा दिवा हवा, ही मानसिकता असणाऱ्या या समाजात मुलींना अधिक दत्तक घेतलं जात आहे. या परिवर्तनाचं कारण काय?

संवेदनशील लोकांना हव्या मुली

याविषयी सविता सांगते, "मी अशा अनेकांना भेटली आहे ज्यांना मूल दत्तक घ्यायचं आहे. अनेकदा अशीच जोडपी मूल दत्तक घेतात, ज्यांना स्वतःचं अपत्य नाही. यापैकी ज्यांना आपला वंश पुढे न्यायचा आहे, ते त्यांच्या नातेवाईकांकडूनच मुलगा दत्तक घेतात. मात्र ज्यांना केवळ अपत्य हवंय, ते मुलगी दत्तक घेण्यावर भर देतात."

मूल

फोटो स्रोत, Getty Images

"जे संवेदनशील असतात तेच दत्तक घेतलेल्या अपत्याला स्वीकारतात. त्यामुळेच मुलींकडे त्यांचा अधिक कल असतो. कारण समाजात त्यांची परिस्थिती वाईट आहे. पूर्वीच्या तुलनेत आता समाजातही बराच बदल झाला आहे. मुली त्यांची जास्त काळजी घेऊ शकतात. वाढत्या वयात त्यांना मुलीची साथ अधिक समाधान आणि सुरक्षा प्रदान करते. ही त्यामागची महत्त्वाची कारणं आहेत."

संपत्ती एक मोठं कारण

जामिया मिलिया इस्लामियामध्ये महिला विषयक अभ्यासांच्या सहप्राध्यापिका फिरदौस अजमत काही वेगळी कारणंही सांगतात.

त्या म्हणतात, "यामागे मालमत्ता एक मोठं कारण आहे. अपत्य दत्तक घेतल्यानंतर तो कायद्याने तुमच्या मालमत्तेतला भागीदार बनतो. मुलगा दत्तक घेतल्यास तुमची सगळी संपत्ती पूर्णपणे त्याच्याकडे जाईल. मात्र मुलगी दत्तक घेतल्यास ती लग्न करून तुमच्या घरातून निघून जाईल. संपत्तीत ती आपला पूर्ण वाटा मागेलच किंवा घरात व्यवसाय असेल तर त्याची जबाबदारी ती सांभाळेलच, असं नाही.

मुलगी

फोटो स्रोत, Getty Images

"अशा परिस्थितीत मुलगा दत्तक घेतल्यास कुटुंब आणि आप्तेष्टांमध्ये त्याला सहजासहजी स्वीकारलं जात नाही. बाहेरच्या मुलाकडे सगळी संपत्ती जावी, हे अनेकांना पटत नाही. अशावेळी मुलगी चांगला पर्याय असतो," असं त्या सांगतात.

यामागे मुलींची तस्करी हेदेखील एक कारण असल्याचं फिरदौस यांना वाटतं. त्या म्हणतात, "हे कितपत घडतं, हे मला फार माहिती नाही. मात्र मुलींच्या बाबतीत ही भीती नेहमीच असते. अशी माणसं असू शकतात जे चुकीच्या कारणासाठी मुली दत्तक घेत असावी. दत्तक प्रक्रियेत पूर्ण चौकशी होतच असते. मात्र ही शक्यता पूर्णपणे फेटाळता येत नाही."

मूल

फोटो स्रोत, Getty Images

कचऱ्याच्या पेटीत किंवा नाल्यात तान्हुल्या मुली सापडण्याच्या बातम्या तर अधूनमधून येतच झाल्या आहेत. जन्म होताच त्यांना मरण्यासाठी सोडून दिलं जातं. त्यामुळेच अनाथ मुलांमध्ये मुलींची संख्या जास्त असते.

सविता सांगते की मुलींच्या बाबतीत आई-वडिलांसमोर अधिक पर्याय असतात. उदाहरणार्थ बऱ्याचशा पालकांना खूप लहान मुल हवं असतं जेणेकरून ते घरात सहज मिसळू शकेल आणि या वयाच्या मुलीच जास्त असतात.

ती म्हणते की कारण काहीही असो मात्र ती मुलं एका वेगळ्याच दुनियेत असतात. तुम्ही जेव्हा त्या मुलांच्या दुनियेत जाता तेव्हा त्यांच्या खऱ्या परिस्थितीची जाणीव तुम्हाला होते. प्रत्येकानेच बाळ दत्तक घ्यावं, हे गरजेचं नाही. मात्र त्यांचं आयुष्य जाणून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करायला हवा. जेणेकरून उपेक्षितांचं जिणं काय असतं, ते तुम्हाला कळावं.

दत्तक प्रक्रिया कशी असते?

व्हीडिओ कॅप्शन, मूल दत्तक घेण्याचा विचार करत आहात? मग हा व्हीडिओ पाहाच

बाळ दत्तक घेण्यासाठी केंद्र सरकारने सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटीची (CARA) स्थापना केली आहे. ही संस्था महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करते.

2015 साली दत्तक प्रक्रियेच्या नियमात बदल करण्यात आले. मूल दत्तक घेण्यासाठी पालकांना काही अटी पूर्ण कराव्या लागतात.

  • इच्छुक पालकांचं शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे.
  • स्वतःचं अपत्य असणारे किंवा नसणारे कोणतेही इच्छुक आई-वडील मूल दत्तक घेऊ शकतात.
  • लग्नाला दोनहून अधिक वर्षं झालेलेच इच्छुक माता-पिता मूल दत्तक घेण्यासाठी पात्र असतात.
  • मूल दत्तक घेण्यासाठी आई-वडिलांचं वय एक महत्त्वाचा घटक आहे. जोडप्यांच्या बाबतीत इच्छुक माता-पित्याचं संयुक्त वय गृहित धरलं जातं.
  • मूल आणि भावी दत्तक आईवडील यापैकी प्रत्येकाच्या वयातलं किमान अंतर 25 वर्षांहून कमी असायला नको.
  • मात्र दत्तक घेणारे इच्छुक आई-वडील नातेवाईक किंवा सावत्र असल्यास हा नियम लागू होत नाही.
  • ज्यांना आधीच तीन किंवा त्याहून जास्त अपत्यं आहेत ते मूल दत्तक घेण्यासाठी पात्र नसतात. मात्र, विशेष परिस्थितीत तेदेखील मूल दत्तक घेऊ शकतात.

सर्व अटी आणि कागदपत्रं पूर्ण केल्यानंतरच दत्तक प्रक्रिया सुरू होते. यासाठी CARAच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेला फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करावं लागतं. दोन साक्षीदारही हवे असतात.

त्यानंतर भावी पालकांच्या शहरात पोलीस व्हेरिफिकेशन होतं. वैद्यकीय आणि विवाहाचा दाखला द्यावा लागतो. आधीचं अपत्य असल्यास त्याचीही परवानगी घेतली जाते.

त्यानंतर पालकांचा राज्याच्या संस्थेशी संपर्क साधला जातो. ही संस्था तुमच्या संपर्कात असते आणि संस्थेत लहान बाळ आल्यावर ती तुम्हाला कळवते. मोठं मूल हवं असल्यास तुम्ही संस्थेत जाऊन मुलं बघू शकता.

मूल काही दिवस पालकांकडे राहतं. त्यानंतर आई-वडील आणि मूल एकमेकांसोबत आनंदी आहे की नाही, याचा आढावा घेतला जातो. काही अडचण जाणवल्यास मुलाला परत घेतलं जातं. सगळं व्यवस्थित असेल तर शेवटच्या औपचारिकता पूर्ण करून मूल पालकांना सुपूर्द करण्यात येतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)