भारतात शेकडो बळी घेणारा उन्हाळा नैसर्गिक आपत्तीच्या यादीत नाही?

उन्हाळा

फोटो स्रोत, Getty Images

मध्य आणि उत्तर भारतामध्ये आणि शेजारी पाकिस्तानात तापमानाने 45 डिग्री सेल्सियसची पातळी ओलांडलेली आहे.

भारताचं सगळ्यांत उष्ण शहर असणाऱ्या चुरूमध्ये रविवारी तापमान 50.8 सेल्सियस पर्यंत गेल्याचं हवामान खात्याने सांगितलं.

पण उष्णतेची इतकी भयंकर लाट असूनही रोजचे व्यवहार थांबलेले नाहीत. फेरीवाले, ट्रॅफिक पोलिस आणि रिक्षावाल्यांना उन्हा उभं राहण्यावाचून काही पर्याय नाही.

किमान अन्न-पाणी मिळावं यासाठी ग्रामीण भागातल्या स्त्री-पुरुषांना भर उन्हात राबावं लागतंय.

चार भिंतींच्या आत येऊनही दिलासा मिळेलच असं नाही कारण घरात गारवा आणणारं तंत्रज्ञान सर्वांना परवडणारं नाही.

उष्णतेच्या या लाटेचे परिणाम आता दिसायला लागले आहेत.

उन्हाळा

फोटो स्रोत, Getty Images

उष्माघाताच्या बळींच्या बातम्या आता देशभरातून येऊ लागल्या आहेत. पण नेमका हा आकडा किती आहे, हे सांगणं कठीण आहे. फक्त माणसंच नाही तर प्राण्यांनाही या फटका बसतोय. उन्हामुळे पक्षी आकाशातून पडत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या.

जगभरामध्ये कमी जास्त प्रमाणात दरवर्षी हे दृश्यं पहायला मिळतं.

लोकांना सजग करण्यासाठी त्यांनी भरपूर पाणी प्यावं आणि उन्हात जाणं टाळावं अशा सूचना अधिकाऱ्यांकडून देण्यात येतात.

पण जगभरातला उन्हाळा येत्या काही वर्षांमध्ये अधिक प्रखर होण्याची शक्यता असताना अधिकाऱ्यांकडून एवढीच पावलं उचलली जाणं पुरेसं आहे का?

सायलेंट किलर

2018मध्ये जगभरातल्या अनेक देशांमध्ये उन्हाळ्यात आतापर्यंतचं सर्वोच्च तापमान नोंदवण्यात आलं.

युनायटेड किंग्डम, स्कॅण्डेनेव्हिया (विशेषतः नॉर्वे आणि स्वीडन). पूर्व कॅनडा, सैबेरियातला काही भूभाग, जपान आणि कॅस्पियन समुद्राच्या बाजूचा भाग या काही ठिकाणी नेहमीपेक्षा किती तरी जास्त उकाडा जाणवला.

या देशांपैकी जपानने उष्णतेची ही लाट ही नैसर्गिक आपत्ती असल्याचं जाहीर केलं. जपानमध्ये हजारो लोकांना उष्माघात झाला होता.

पण बहुतेक देशांमध्ये अजूनही उन्हाळा हा 'सायलेंट किलर' आहे.

मुलगी

फोटो स्रोत, Getty Images

''चक्रीवादळ किंवा भूकंप किंवा पुरासारखी नैसर्गिक आपत्ती आली, तर लगेचच त्याचे परिणाम पहायला मिळतात. गोष्टी वाहून जातात, लोकं वाहून जातात. पण उष्णतेच्या लाटेचे परिणाम असे लगेच दिसून येत नाही. उन्हाळा हा सायलेंट किलरसारखा आहे.''

हवामानातील बदलांवर ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स विद्यापीठात अभ्यास करणाऱ्या सारा ड्राऊन यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं.

तज्ज्ञांच्या मते उन्हाचा फटका हा गरीब, उष्ण देशांना या अधिक बसतोय.

''श्रीमंत देशामध्येच दरवर्षी हजारो लोकांचा उष्माघातामुळे बळी जातो,'' जिसुंग पार्क म्हणतात. गरम हवामानामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासाची क्षमता किती घटते यावर त्यांनी अभ्यास केला आहे.

उष्म्याचे जीवघेणे परिणाम युरोप आणि अमेरिकेत यापूर्वीही पाहायला मिळालेले आहेत.

''पण बळींचा आकडा हा गरीब देशांमध्ये अनेक पटींनी जास्त असण्याची शक्यता आहे.''

भारतात उष्णतेची लाट सातत्याने येत असते.

उन्हाळा

फोटो स्रोत, Getty Images

उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यात आपल्याला यश आलं असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, पण यावर सगळ्यांचा विश्वास नाही.

''असा अंदाज आहे की अशाच प्रकारे प्रदूषण होत राहिल्यास पुढल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतील उष्णतेची लाट इतकी प्रखर होईल की माणसांना तिथे जगणं अशक्य असेल,'' युएस थिंक टँक रँड कॉर्पोरेशनचे गुलरेज शाह अजहर सांगतात.

''भारतासारखा देश जिथे तीव्र पाणी टंचाई आहे, वीज पुरवठा अनियमित आहे अशा परिस्थितीत काय करणार आहे?''

1100 लोकांचा उष्माघाताने बळी गेल्यानंतर उष्णतेच्या लाटेला नैसर्गिक आपत्ती मानलं जावं अशी विनंती भारत सरकारकडे 2015मध्ये करण्यात आली होती.

उन्हाळा

फोटो स्रोत, Getty Images

पण भारत सरकारने उष्णतेच्या लाटेला एकूण 12 नैसर्गिक आपत्तींच्या यादीमध्ये स्थान दिलेलं नाही आणि म्हणूनच या उष्णतेच्या लाटेचा फटका बसलेल्यांना राष्ट्रीय किंवा राज्य आपत्ती निवारण निधीतून मदत मिळत नाही.

उष्णतेच्या लाटेचे बळी

इतरही अनेक देशांमध्ये उष्णतेच्या लाटेला नैसर्गिक आपत्तीचा दर्जा देण्यात आलेला नाही. उष्णतेच्या लाटेचे परिणाम हळूहळू होतात आणि नजरेला दिसून येईल अशी हानी वा नुकसान यामध्ये होत नाही.

''या गोष्टीकडे फारसं गांभीर्याने पाहिलं जात नाही याचं कारण कदाचित सामाजिक दरी हे देखील असू शकतं,'' जिसंग म्हणतात.

''जर तुमच्या घरी, कारमध्ये, कामाच्या ठिकाणी AC असेल तर उष्मा किती भयंकर ठरू शकतो, त्याची तुम्हाला कल्पना येणं कठीण आहे.''

अति-उष्ण हवामानाचे परिणाम फक्त शारीरिक आरोग्यावरच होतात असं नाही. याचा परिणाम मुलांच्या अभ्यास करण्याच्या क्षमतेवर किंवा परीक्षेतल्या कामगिरी, नोकरदारांची काम करण्याची क्षमता आणि जननक्षमतेवरही होऊ शकतो.

'गरीब आणि उपेक्षितांना कोणीही वाली नाही'

''बळी जाणाऱ्यांमध्ये तळागाळातल्या व्यक्तींचं प्रमाण अधिक आहे. यात म्हातारे, बेघर, ज्यांना AC परवडत नाहीत किंवा असे लोक ज्यांच्या जवळ काहीच साधन-संपत्ती नाही या लोकांचा समावेश होतो. शिवाय बळींची आकडेवारी नेमकी कशी गोळा करायची याच्याही अडचणी आहेतच,'' गुलरेज शाह अजहर म्हणतात.

उन्हाळा

फोटो स्रोत, Getty Images

सप्टेंबर 2017मध्ये पुएर्तो रिको बेटांवर धडकलेल्या मारिया चक्रीवादळाचं उदाहरण गुलरेज देतात. या आपत्तीमध्ये 1400 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेले.

सरकारने मान्य केलेल्या अधिकृत आकडेवारीपेक्षा हा आकडा 20 पटींनी अधिक आहे. ज्या लोकांचा विषाणू संसर्गाने मृत्यू झाला, वैद्यकीय मदत न मिळाल्याने किंवा आत्महत्या वा इतर काही कारणांनी मृत्यू झाला, त्या सगळ्यांचाही यात समावेश आहे.

''उष्णतेची लाट येते तेव्हा थेट उष्माघातानेच ज्यांचा बळी गेला आहे त्यांची गणना केली जाते. पण संपूर्ण परिस्थितीची यावरून कल्पना येत नाही,'' गुलरेज म्हणतात.

''उष्णतेच्या लाटेदरम्यान एखाद्या वृद्धाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला तर त्याची नोंद ही हृदयविकाराचा मृत्यू म्हणून होते. कदाचित इतका उष्मा नसता तर त्या व्यक्तीला असा झटका आलाही नसता,'' शेवटी तुम्ही बळींची गणना कशी करतात यावर सगळं अवलंबून असल्याचं ते म्हणतात.

कदाचित म्हणून 2003च्या उष्णतेच्या लाटेमध्ये युरोपात नेमका किती जणांचा बळी गेला याविषयी वाद आहेत. असा अंदाज केला जातो की यामध्ये किमान 30,000 जणांचा बळी गेला असावा पण यामध्ये तब्बल 70,000 जणांचा बळी गेला असण्याची शक्यताही त्या काही व्यक्त करतात.

हवामान बदलांशी जुळवून घेणं

एअर कंडिशनिंग (AC) च्या वापराने उष्माघाताचा फटका बसण्याची शक्यता कमी होते हे सगळ्यांनाच माहीत आहे.

सिंगापूरच्या उत्तम आर्थिक उत्पादन क्षमेतेमागचं मुख्य कारण देशातली AC ची उपलब्धता असल्याचं सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली क्वान यू यांनी एकदा म्हटलं होतं.

''AC हा मानवी इतिहासातला एक महत्त्वाचा शोध म्हणावा लागेल. त्याशिवाय उष्ण प्रदेशामध्ये विकास शक्यच झाला नसता. पंतप्रधान झाल्यानंतर मी केलेली पहिली गोष्ट म्हणजे सरकारी कार्यालयात वातानुकूलित यंत्रणा बसवून घेणं," असं ली क्वान यू सांगतात.

पण या मागचं सत्य जरा अडचणीचं आहे. कारण आतील वातावरण थंड करताना बाहेरचं वातावरण अधिक गरम केलं जातं.

शिवाय ACचा वापर करण्यासाठी विजेची गरज असते. ही वीज बहुतेकदा गॅस वा कोळसा जाळल्यावरच मिळते. शिवाय ACमध्ये असणारे अनेक कूलंट हे गळाले तर ग्रीनहाऊस इफेक्ट निर्माण करणारे गॅसेस तयार करतात.

उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्याल?
फोटो कॅप्शन, उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्याल?

AC अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञान कंपन्या करत आहे. दरम्यान यासाठी कोणती अधिक पर्यावरण स्नेही पावलं उचलता येतील याचा शोध जगभरातले देश घेत आहेत.

दारोदार जाऊन लोकांना भेटून, त्यांना वेळीच सावध करून, छप्पर पांढरं रंगवून किंवा बिंल्डिंग बांधतानाच्या सामानात बदल करून पाहण्याचे प्रयोग करण्यात येत आहेत.

पण ज्या वेगाने हवामान बदल घडत आहेत त्या वेगाने आपण काम करत नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्याल?
फोटो कॅप्शन, उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्याल?

पृथ्वीवर राहणाऱ्या भविष्यातल्या मानवजाती समोरचं हे सर्वांत मोठं आव्हान असेल आणि हवामान बदलाचे भयंकर परिणाम होऊ नयेत म्हणून जगभरातल्या तापमानात होणारी वाढ ही 1.5 सेल्सियसपेक्षा कमी ठेवणं गरजेचं असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.

''मध्येमध्ये येणारी उष्णतेची लाट ही आयुष्यात घडणारी नैसर्गिक घटना आहे आणि तिला सामोरं जायलाच हवं, असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं,'' जिसंग म्हणतात.

''पण अडचण अशी आहे की हवामान बदलामुळे जगाच्या अनेक भागामधल्या उष्णतेमध्ये अनैसर्गिक वाढ होत आहे,'' जगातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये ही समस्या अर्बन हिट आयलंड इफेक्टमुळे (शहरी भाग हे अनेकदा जवळपासच्या ग्रामीण भागांपेक्षा उष्ण असतात) कित्येक पटींनी वाढलेली आहे.

उन्हाळ्यामध्ये तापमान दीर्घ कालावधीसाठी वाढलेलं असतं, शिवाय हजारो लोक एका ठाराविक भागामध्येच राहतात, काम करतात आणि प्रवास करतात. यादरम्यान थंडाव्यासाठी AC लावलेलेच असतात. म्हणूनच शहरामध्ये अडकलेली गरम हवा रात्रीच्या वेळीही थंड होत नाही.

''मला वाटतं की हे सगळं पाहता आपण यावर अधिक खुलेपणाने चर्चा करणं गरजेचं आहे. बदलत्या हवामानाशी जुळवून घेणं किती गरजेचं आहे. खासकरून जगभरातल्या गरीबांना हवामान बदलापासून वाचवायला हवं. ते याआधीच या भट्टीत होरपळलेले आहेत,'' जिसंग पार्क म्हणतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)