पश्चिम बंगालमध्ये ज्युनिअर डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल, परिस्थिती चिघळली

पश्चिम बंगालमध्ये ज्युनिअर डॉक्टरांनी संप पुकारल्याने परिस्थिती बिकट झालीय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आवाहन आणि इशाऱ्यानंतरही डॉक्टर आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. आतापर्यंत राज्यातल्या वेगवेगळ्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधल्या 406 डॉक्टरांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ राजीनामे दिले आहेत.

अपर्णा सेन यांच्यासह सिनेसृष्टीतले अनेकजण आणि विचारवंतांनीदेखील डॉक्टरांच्या मागण्यांना पाठिंबा देत मुख्यमंत्र्यांनी तातडीने पावलं उचलण्याचं आवाहन केलंय.

चौथ्या दिवशीही संप सुरूच असल्याने राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या रुग्णांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे हाल होत आहेत. संपामुळे आतापर्यंत दोन नवजात बालकांसह पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

या संपाचं राजकारणही सुरू झालं आहे. भाजपने या प्रकरणाला धार्मिक रंग दिल्याचा आणि डॉक्टरांना मुस्लीम रुग्णांना तपासू नये, असं सांगितल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

विशेष म्हणजे स्वतः ममता यांचे पुतणे आबेश बॅनर्जी यांनी देखील डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा देत रस्त्यावर उतरून आंदोलनात भाग घेतला. शिवाय, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि कोलकात्याचे महापौर फिरहाद हकीम यांची डॉक्टर मुलगी शब्बा हकीम यांनी देखील ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने संप हाताळत आहेत, त्यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.

उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

दुसरीकडे कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिका फेटाळली आणि राज्य सरकारनेच तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना सुरक्षा द्यावी आणि दोन ज्युनिअर डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी, या संपकरी डॉक्टरांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संपकरी डॉक्टरांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. तसं न करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचा आणि त्यांना हॉस्टेलमधून काढून टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्याने आगीत तेल ओतण्याचंच काम केलं आहे.

रुग्णांचे हाल

शुक्रवारी कोलकात्यातल्या नील रतन मेडिकल कॉलेजसह केवळ दोनच हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी सेवा सुरू होती. सरकारी हॉस्पिटलव्यतिरिक्त अनेक खाजगी हॉस्पिटल्समध्येही ओपीडी बंद आहेत.

आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या ज्वाईंट फोरम ऑफ ज्युनिअर डॉक्टर्सचे प्रवक्ते डॉ. अरदिंम दत्त सांगतात, "मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन सुरूच राहील. मुख्यमंत्र्यांची ज्यापद्धतीने काल धमकावलं, ते आम्हाला मान्य नाही. हा आमच्या व्यवसायाचा अपमान आहे आणि त्यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागायला हवी." तिकडे वरिष्ठ डॉक्टरांनीही संपाला पाठिंबा दिला आहे.

या सर्व प्रकरणाची सुरुवात एनआरएस मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये झाली. या कॉलेजचे प्राचार्य शैबाल मुखर्जी आणि मेडिकल सुप्रिटेंडंट प्रोफेसर सौरभ चॅटर्जी यांनी देखील राजीनामे दिले आहेत.

आंदोलनाला धार्मिक रंग

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्याने या प्रकरणाला धार्मिक रंग दिला आहे. त्यांनी भाजपवर सीपीएमच्या मदतीने आंदोलनाला हवा दिल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, "भाजप या संपाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहे आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा त्याला पाठिंबा आहे."

भाजप आणि सीपीएमने या आरोपांचं खंडन केलं आहे. तृणमूल काँग्रेसशी संबंधितच एका गटाच्या लोकांनी डॉक्टरांवर हल्ला केला होता, असा आरोप भाजप नेते मुकूल रॉय यांनी केला आहे. तर सीपीएमच्या केंद्रीय समितीचे सदस्य सुजन चक्रवर्ती म्हणतात, "मुख्यमंत्र्यांकडे बघून वाटत नाही की त्यांना हा संप मिटवण्यात रस आहे."

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी दिलेल्या इशाऱ्यानंतर त्या पुढे काय करणार, याचा खुलासा केलेला नाही. मात्र, राज्य सरकार आणि संपकरी डॉक्टर आपापल्या मुद्द्यावर अडून बसल्याने पश्चिम बंगालमधली आरोग्य सेवा लवकरात लवकर सुरळीत होण्याची शक्यता धूसरच आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)