देशात मान्सूनपूर्व दुष्काळ, 65 वर्षांतील दुसरा कोरडा हंगाम : #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. देशात मान्सूनपूर्व दुष्काळ : 65 वर्षांतील दुसरा कोरडा हंगाम

देशातील बहुतांश भागाला तीव्र उष्णतेचे चटके सहन करावे लागत आहेत. भारतीय हवामान खात्यानं ही मान्सूनपूर्व दुष्काळाची स्थिती असल्याचं म्हटलं आहे.

गेल्या ६५ वर्षांत मान्सूनपूर्व दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची ही दुसरी वेळ असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

हवामानाविषयी अंदाज वर्तविणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेनंही मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या पूर्व-पावसाच्या हंगामात २५ टक्के कमी पाऊस झाल्याचं म्हटलं आहे.

उत्तर-पश्चिम भारत, मध्य भारत, पूर्व-ईशान्य भारत आणि दक्षिण भारत या चार हवामान विभागांमध्ये ३० टक्के, १८ टक्के, १४ टक्के आणि ४७ टक्के कमी पाऊस नोंदविला गेल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे.

2. 'आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला सर्वसाधारण प्रवर्गातून नोकरी नाही'

आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला केवळ आरक्षित श्रेणीमध्येच सरकारी नोकरी मिळेल. आरक्षित प्रवर्गात जागा न मिळाल्यास संबंधित उमेदवाराला सर्वसाधारण प्रवर्गातून नोकरी मिळणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. लोकमतनं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

न्यायमूर्ती आर. भानुमती आणि ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला.

आरक्षित प्रवर्गातील उमेदवार आरक्षित जागेवरुनच नोकरीसाठी आपला अर्ज भरतात. मात्र, आरक्षित प्रवर्गातील जागा भरल्यानंतर त्यांच्याकडून सर्वसाधारण प्रवर्गातून नोकरी देण्याची मागणी केली जाते. त्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारापेक्षा अधिक गुण मिळवल्याचे कारणही सांगण्यात येते. पण ही प्रकिया चुकीची असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे.

3. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा

राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसेना पुन्हा एकदा आग्रही होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांसह शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे 15 जूनला अयोध्येचा दौरा करणार आहेत. एबीपी माझानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेनेच्या खासदारांनी एकवीरा देवीचं तसंच कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं होतं. आता त्यानंतर शिवसेनेनं आपला मोर्चा पुन्हा एकदा अयोध्येकडे वळवला आहे.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबरमध्ये अयोध्या दौरा केला होता. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे तसंच पक्षाचे अन्य नेतेही उपस्थित होते.

4. पवारांच्या दाव्यावर राष्ट्रपती भवनाचं स्पष्टीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात शिष्टाचारानुसार बसण्याची जागा न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अवमान झाल्याच्या चर्चेवर राष्ट्रपती भवनाकडून खुलासा देण्यात आला आहे.

मोदींच्या शपथविधी सोहळ्यात अतिमहत्त्वाच्या मान्यवरांसाठी राखीव असलेल्या पहिल्या रांगेतच शरद पवार यांच्या बसण्याची सोय करण्यात आली असल्याचं राष्ट्रपती भवनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.

राष्ट्रपती भवनाचे माध्यम सचिव अशोक मलिक यांनी यासंबंधी ट्वीट केलं आहे. 30 मे रोजी झालेल्या शपथविधी सोहळ्यासाठी पवारांना V सेक्शनमध्ये बसण्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. या सेक्शनमध्ये वरिष्ठ नेते आणि पाहुण्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

त्यांना पहिल्या रांगेतच स्थान दिलं गेलं होतं. पवार यांच्या कार्यालयात या आसन व्यवस्थेतील रांगेवरून गोंधळ झाल्यानेच ही गडबड झाल्याचं मलिक यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

5. रोजगारनिर्मितीसाठी केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

आर्थिक विकासाचा मंदावलेला वेग आणि वाढती बेरोजगारी या दोन प्रमुख समस्यांवर मार्ग काढण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय मंत्र्यांच्या दोन समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

गुंतवणूकवाढ आणि रोजगार निर्मितीतील वाढ यासाठी संबंधित समिती काम करतील. स्वतः पंतप्रधान या दोन्ही समित्यांचे अध्यक्ष असतील. द इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत विकासदर ५.५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत विकासदर ६.६ टक्के होता.

सांख्यिकी विभागानं देशातील बेरोजगारीचे प्रमाणही जाहीर केलं आहे. बेरोजगारीचा दर गेल्या ४५ वर्षांमधील सर्वांत जास्त असल्याचं सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. त्यानंतर केंद्रानं हे पाऊल उचललं आहे.

सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांत गुंतवणूक वाढीसाठी नेमलेल्या समितीमध्ये अमित शाह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल हे मंत्री सदस्य असतील.

रोजगार निर्मितीसाठी नेमलेल्या समितीत अमित शाह, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, नरेंद्र सिंह तोमर, रमेश पोखरियाल 'निशंक', धर्मेद्र प्रधान, महेंद्रनाथ पांडे, संतोष गंगवार, हरदीपसिंग पुरी या मंत्र्यांचा समावेश आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)