लोकसभा निकाल: या निवडणुकीत मुस्लिमांनी भाजपला भरभरून मतं दिलीत?

मुस्लीम

फोटो स्रोत, Reuters

    • Author, संजय कुमार
    • Role, राजकीय विश्लेषक आणि CSDSचे संचालक

जेव्हा एखादा विजय भाजपच्या लोकसभा निवडणुकीतल्या विजयाएवढा मोठा असतो, तेव्हा त्या विजयी पक्षाचीच सर्वत्र लाट आहे आणि पराभूत पक्षाच्या बाजूने काहीच नाही, असं सर्वत्र चित्र निर्माण केलं जातं.

भाजपचा या निवडणुकीतला हा विजय राष्ट्रीय स्तरावर एवढा प्रचंड होता, विशेषत: उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाची युती असतानासुद्धा, की एकच समज सर्वत्र दृढ होताना दिसतोय - की या निवडणुकीत मुस्लिमांनीही भाजपलाच मतं दिली.

या युक्तिवादाला आकडेवारीचाही आधार होता. 2014 मध्ये उत्तर प्रदेशात भाजपला 40 टक्के मतं मिळाली होती, जी यंदाच्या निवडणुकीत 49 टक्के झाली आहेत. टक्केवारीत झालेली ही वाढ मुस्लीम मतांमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे.

मुस्लीम पुरुषांच्या मतदानामध्ये हे एवढं स्पष्टपणे दिसून येत नसलं तरी उत्तर प्रदेशसकट अनेक राज्यातील मुस्लीम स्त्रियांची मतं भाजपला गेल्याचं दिसून येतं. भाजपच्या पहिल्या कार्यकाळात संमत झालेल्या तिहेरी तलाक कायद्यामुळे मुस्लीम महिला खूश होत्या, असं यामागचं कारण दिलं जातं.

मतांची वाढलेली टक्केवारी

हा समज अधिक दृढ झाला जेव्हा हे लक्षात आलं की मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्येसुद्धा भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. ज्या मतदारसंघांमध्ये 10% पेक्षा कमी मुस्लीम आहेत, तिथे भाजपला 34.9% मतं मिळाली. आणि जिथे 10% ते 20% मुस्लीम आहेत, तिथे हे प्रमाण 39.2% आहे. ज्या मतदारसंघांमध्ये 20-40% मुस्लीम लोकसंख्या आहे, तिथे हे प्रमाण 43.8% पर्यंत पोहोचलं आहे.

मात्र मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये मुस्लिमांनी भाजपच्या उमेदवारालाच मतं दिली, म्हणून हा टक्का वाढला, हे इतक्या सहजतेने म्हणता येणार नाही.

साधारणपणे तिहेरी तलाकच्या कायद्याला मुस्लीम स्त्रियांचा पाठिंबा भाजपला लाभला, हे खरं. पण फक्त याच कारणामुळे त्यांनी भाजपला मतं दिली, याचे फारसे पुरावे उपलब्ध नाहीत.

निवडणुकांनंतर केलेल्या सर्वेक्षणातून असं लक्षात येतं की 1996-2014 या दरम्यान झालेल्या विविध लोकसभा निवडणुकांमध्ये 7-8% मुस्लीम मतं भाजपला गेली. 2009ची लोकसभा निवडणूक याला अपवाद होती, जेव्हा भाजपला फक्त 4% मुस्लीम मतं मिळाली होती.

CSDSने केलेल्या सर्वेक्षणातून लक्षात येतं की यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला आणि काँग्रेसला मिलालेली मुस्लीम मतं जवळजवळ 2014 सारखीच होती. 2019च्या सर्वेक्षणात असं लक्षात येतं की 8% मुस्लिमांनी भाजपला मतं दिली आणि 33% लोकांनी काँग्रेसला मतं दिली. तसंच अनेक राज्यांमध्ये मुस्लिमांनी स्थानिक प्रादेशिक पक्षांना मत दिलं.

या निवडणुकीत मुस्लीम महिलांची मतं पूर्णपणे भाजपकडे वळली, असं म्हणणं अतिशयोक्ती होईल. मतदानाच्या आकडेवारीवरून सिद्ध होतं की भाजपला मतं देण्याच्या बाबतीत मुस्लीम पुरुष आणि मुस्लीम स्त्रिया यांच्या मतदानात फारसा फरक पडलेला नाही.

पण हा फरक छोटी शहरं आणि खेड्यांमध्ये राहणाऱ्या मुस्लिमांच्या बाबतीत जाणवतो. शहरी मुस्लिमांनी काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांनाच प्रामुख्याने मतं दिली तर त्यांच्यात्यांच्या प्रादेशिक पक्षांना कमी मुस्लीम मतं मिळाली.

मुस्लीम

फोटो स्रोत, Reuters

राष्ट्रीय पातळीवर भाजपाकडे मुस्लीम मतं वळल्याचे फारसे पुरावे नाहीत. मात्र विविध राज्यांचे आकडे पाहिले तर असे पुरावे आहेत. हे तिथल्या लढतींवरही अवलंबून आहे.

ज्या राज्यात गेल्या काही वर्षांत प्रादेशिक पक्षांची वाढ झाली आहे, ते वगळता जिथे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होती, तिथे भाजपला मुस्लिमांनी जास्त प्रमाणात मतं दिली आहेत.

राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, आणि इतर काही राज्यात 15-20% मुस्लिमांनी भाजपला मत दिलं. हे फारसं आश्चर्यकारक नाही, कारण यापूर्वीच्या मतदानाच्या आकड्यांमधूनही असं लक्षात येतं की जिथे भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत असते, तिथे मुस्लिमांचा भाजपला जास्त पाठिंबा असतो. पण जिथे प्रादेशिक पक्षांचं प्रबळ अस्तित्व असतं, तिथे हा पाठिंबा कमी होताना दिसतो.

(लेखक हे प्राध्यापक आणि Centre for the Study of Developing Societies (CSDS) संस्थेचे संचालक आहेत. (लेखात व्यक्त केलेली मतं लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत. हा लेखातील तथ्य आणि मतं बीबीसीचीनाहीत आणि बीबीसी या आकड्यांसाठी जबाबदार नाही.)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)