बंगाल, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा: लोकसभा निकालांत प्रादेशिक पक्षांचे गड शाबूत

फोटो स्रोत, Twitter
लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधीक जागा जिंकून भाजपने पुन्हा सत्ता मिळवली आहे. मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील. परंतु काही राज्यांमध्ये जनादेशाची लाट प्रादेशिक पक्षांच्या बाजूने दिसून आली.
तामिळनाडूमध्ये द्रमुक, ओडिशामध्ये बिजू जनता दल आणि आंध्रप्रदेशात YSR काँग्रेस अशा प्रादेशिक पक्षांनी निकालात वेगळेपण दाखवून दिलं. काही निकाल धक्कादायकही होते.
1. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू पराभूत
बुधवारी लोकसभा निवडणुकांबरोबरच आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभेचे निकालही जाहीर झाले.
आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीचा अत्यंत दारुण पराभव झाला. माजी मुख्यमंत्री YSR रेड्डी यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांच्या YSR काँग्रेसचा एकतर्फी विजय झाला.

फोटो स्रोत, M. K. STALIN @FACEBOOK
आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण 175 जागा आहेत. त्यातील 151 जागा YSR काँग्रेसने जिंकल्या तर तेलुगू देसमला केवळ 23 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. जनसेना पक्षाला एक जागा मिळाली आहे.
मतमोजणीपूर्वीच्या काही दिवसांमध्ये चंद्राबाबू देशभरात फिरून विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र त्यांना स्वतःच्या राज्यातच पराभवाचा सामना करावा लागला.
2. बिजू जनता दलाच्या नवीन पटनायक यांनी राखलं राज्य
ओडिशामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाचा विजय झाला आहे. एकूण 146 जागांपैकी 112 जागांवर बिजू जनता दलाचा विजय होत असल्याचं स्पष्ट झालं असून भाजपला 24 जागांसह विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. काँग्रेसच्या खात्यात केवळ 8 जागा आहेत.
2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बिजू जनता दलाला 117 जागा मिळाल्या होत्या.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
नवीन पटनाईक वर्ष 2000 पासून ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. सलग 19 वर्षं मुख्यमंत्रिपदी राहिल्यानंतर त्यांना आणखी एक टर्म मिळाली आहे.
बिजू जनता दलाने गेली अनेक वर्षं राज्य विधानसभेत आणि राज्यातील लोकसभा मतदारसंघात सातत्य राखलं आहे. या निवडणुकीत मात्र भाजपने राज्यात 8 जागांवर यश मिळवलं आहे.
3. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा मोठा विजय
आधीच भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांनी एकमेकांवर झाडलेल्या फैरी, त्यानंतर बंगालमध्ये मतदानादरम्यान फेरफारीचे आरोप आणि प्रचारादरम्यान उफाळलेला हिंसाचार, यांमुळे साऱ्या देशाचं लक्ष बंगालवर लागून होतंच. आणि तिथले निकालही तसेच लागले.
पश्चिम बंगालमध्ये भाजपची मतांची टक्केवारी 40 वर पोहोचली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 17 टक्के मतं मिळाली होती.

फोटो स्रोत, Reuters
आता भाजपला 42 पैकी 18 जागांवर विजय मिळाला असून तृणमूल काँग्रेसला 23 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाली आहे. हा निकाल तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपा मोठी भूमिका बजावेल, अशी चर्चा तज्ज्ञ करत आहेत.
4. तामिळनाडूमध्ये द्रमुकची आघाडी
द्रमुकचे नेते एम. करुणानिधी आणि अण्णाद्रमुकच्या अध्यक्ष जे. जयललिता यांच्या पश्चात झालेली ही पहिली लोकसभा निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र या निवडणुकीमुळे द्रमुकचे नेते स्टॅलिन यांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवल्याचे दिसून आले.
द्रमुक आणि काँग्रेसच्या आघाडीला 30 हून अधिक जागांवर यश मिळालं आहे.

फोटो स्रोत, M. K. STALIN @FACEBOOK
तर लोकसभेबरोबर तामिळनाडू विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्येही द्रमुकचा वरचष्मा दिसून आला. द्रमुकला 23 तर काँग्रेसला 8 जागा मिळाल्या आहेत.
पोटनिवडणुकांमधील 22 जागांपैकी 13 जागांवर द्रमुक आणि 9 जागांवर अण्णाद्रमुकला यश मिळालं आहे. अण्णाद्रमुकची राज्यातील सत्ता कायम राहिली असून आगामी काळात द्रमुकचे मोठे आव्हान भाजप - अण्णाद्रमुकसमोर आहे.
5. केरळमध्ये काँग्रेसप्रणित आघाडीला यश
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDFला केरळमध्ये चांगली आघाडी मिळाली असून 20 पैकी 19 जागांवर या आघाडीच्या उमेदवारांना यश मिळत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठी राखण्यात अपयश आलं तरी वायनाडमधून विजयी होऊन ते लोकसभेत जाणार आहेत.
केरळमध्ये सर्वात मोठा फटका डाव्या पक्षांना बसला आहे. केरळमध्ये भाजपला आपलं खातं उघडता आलं नाही.
राज्यात मोदींविरोधी लाट असल्याचं केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेनिथला यांनी म्हणणं पडलं. देशभरात सर्वत्र पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेसला केरळच्या निकालांमुळे दिलासा मिळाला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








