नितीन गडकरी: भाजप केवळ नरेंद्र मोदी - अमित शाह यांचा पक्ष नाही #5मोठ्याबातम्या

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर आज प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत :

1) भाजप केवळ मोदी-शाह यांचा पक्ष नाही - नितीन गडकरी

भारतीय जनता पक्ष हा एका विचारसरणीवर आधारित पक्ष आहे. त्यामुळे तो मोदींभोवती केंद्रित झाला असं म्हणता येणार नाही, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी दिल्लीत PTI वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे विधान केल्याची बातमी सकाळनं दिली आहे.

"भाजप आणि पंतप्रधान हे एकमेकांना पूरक आहेत. भाजपात कधीही एका कुटुंबाची सत्ता नव्हती. सर्व महत्त्वाचे निर्णय संसदीय मंडळ घेत असतं," असं गडकरी यांनी सांगितलं.

यावेळी, मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. "तसा माझा हेतूही नाही," असं ते म्हणाले.

2) रफाल प्रकरणी अजून FIR का नाही? - सुप्रीम कोर्ट

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये CBIनं दाखल केलेल्या तक्रारीनंतर सरकारनं अजूनपर्यंत FIR का दाखल केली नाही, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने सरकारला केला आहे. द हिंदूनं ही बातमी दिली आहे.

भारत सरकार फ्रान्सकडून 36 विमान विकत घेत आहे. त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांनंतर CBIनं चौकशी सुरू केली होती, पण अजूनही FIR दाखल केली नसल्यानं न्यायमूर्ती के.एम. जोसेफ यांनी शुक्रावारी नाराजी व्यक्त केली आहे.

"तक्रार दाखल झाल्यानंतर कायद्यानुसार तुम्ही FIR दाखल करणं हे बंधनकारक आहे की नाही, हा प्रश्न आहे?" असं न्यायमूर्ती जोसेफ यांनी महाअधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांना विचारलं.

दोन तास चाललेली सुनावणी ही सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली चालली. गोगोई यांनी रफाल प्रकरणातली फेरविचार याचिका राखून ठेवली आहे.

3. अजॉय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

लोकसभा निवडणूक सुरू असल्याने सध्या आचारसंहिता लागू आहे. यामुळे राज्य सरकारने अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव स्वीकारला आहे.

मेहता हे 1984च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत.

मेहता यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्याने मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची बदली करण्यात आली.

4) पाकच्या हद्दीतून घुसलेले विमान जयपूरला उतरवले

शुक्रवारी पाकिस्तानच्या हद्दीतून चुकीच्या मार्गाने भारतीय हद्दीत विमान दाखल झालं होतं. भारतीय हवाई दलाने तत्काळ कारवाईचे पाऊल उचलत हे विमान जयपूर विमानतळावर उतरवण्यास भाग पाडलं. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

ते मालवाहू विमान जॉर्जियाचे असल्याचे आणि कराचीतून दिल्लीला येत होते. हे विमान निर्धारित हवाईमार्गाऐवजी चुकीच्या मार्गाने का आणण्यात आलं, म्हणत वैमानिकाची कसून चौकशी सुरू आहे.

हे विमान कच्छच्या वाळवंटात असलेल्या हवाईदलाच्या तळापासून 70 किलोमीटर अंतरावरून भारतीय हवाई हद्दीत दाखल झालं होतं. या विमानाने निषिद्ध क्षेत्रात प्रवेश केल्याने त्यावर लगेचच कारवाई करण्यात आली, असंह या बातमी म्हटलं आहे.

5) मराठवाड्यातल्या छावण्यात तब्बल 5 लाख जनावरं दाखल

मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी उभारलेल्या छावण्यांत आतापर्यंत 5 लाख जनावरं दाखल झाली आहेत. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.

दुष्काळामुळं शेतकरी जनावरांना पुरेसं पाणी आणि खाद्य देऊ शकत नाहीत. त्यामुळे जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद याठिकाणी छावण्या उभारल्या आहेत.

अधिकृत माहितीनुसार या भागात 1,066 छावण्यांना परवानगी दिली आहे. त्यापैकी 707 छावण्या चार जिल्ह्यात उभारल्या आहेत. बीडमध्ये सगळ्यात जास्त 601 छावण्या आहेत. उस्मानाबादमध्ये 86, जालान्यात 11 आणि औरंगाबादमध्ये 9 छावण्या उभारल्या आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)