पुण्यातील शास्त्रज्ञांनी शोधल्या प्लास्टिकचं विघटन करणाऱ्या बुरशी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, हलिमा कुरेशी
- Role, बीबीसी मराठीसाठी
पुण्यातल्या काही शास्त्रज्ञांनी प्लॅस्टिक विघटन करणाऱ्या बुरशी शोधल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बॉटनी डिपार्टमेंटमध्ये डॉ. अडे यांच्या मार्गदर्शनाखली आणि डॉ शहानवाझ यांच्याबरोबर डॉ मनीषा सांगळे यांनी ही कामगिरी केली आहे.
29 मार्च 2019 रोजी प्रतिष्ठित नेचर मासिकाच्या 'सायंटिफिक रिपोर्ट्स'मध्ये हे संशोधन प्रकाशित झालं आहे. या संशोधनासाठी सहा वर्षांचा कालावधी लागला.
जगात प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या सध्या सर्वांत मोठी डोकेदुखी ठरलीय. प्लास्टिक कचरा खाल्ल्याने अनेक जनावरांचा मृत्यू होतोय. तसाच समुद्री जीवांना देखील त्याचा मोठा धोका आहे.
तर प्लॅस्टिकच्या कचऱ्याने जमीनचं देखील प्रदूषण वाढलं आहे. जगभरात या प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची या संदर्भात संशोधन सुरू आहे.

भारतीय शास्त्रज्ञांनी अव्हीना मरीना (Avicennia Marina) या खारफुटी वनस्पतीच्या मुळा सभोवतालच्या (Rhizosphere) मातीतून प्लास्टिकचं विघटन करणाऱ्या बुरशीच्या (Fungi) दोन जाती शोधल्या आहेत.
प्लास्टिकचं नैसर्गिकरीत्या विघटन (Degradation) व्हायला सुमारे एक हजार वर्षांचा काळ लागतो. जगात एकूण कचऱ्याच्या ६४ टक्के कचरा हा प्लास्टिकच्या पिशव्यांचा असतो.
आशिया खंडात सगळ्यांत जास्त प्लास्टिकचा वापर होतो. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खारफुटीच्या जंगलांतल्या (Mangove) डंपिंग ग्राउंडवरच्या मातीतून या बुरशींचा शोध लागला आहे.
सुमारे १०९ बुरशी मातीच्या वेगवेगळ्या सँपलमध्ये आढळून आल्या. त्यातून सर्वांत चांगला परिणाम दाखवणाऱ्या दोन बुरशी शोधण्यात आल्या.
बुरशी नेमक्या कसं विघटन करतात?
नेचर मासिकाच्या 'सायंटिफिक रिपोर्ट्स'नुसार,
बुरशींमध्ये असणाऱ्या शक्तिशाली विकरांमुळे (Enzyme) बुरशी अनेक रसायनांचं विघटन करू शकते. आपल्याला अनेकदा जुन्या लाकडांच्या ओंडक्यावर बुरशी उगवलेल्या दिसतात.
त्या आपल्या विकरांच्या साहाय्याने लाकडातील कार्बन संयुगांचं रूपांतर छोट्या छोट्या कार्बनमध्ये करतात. त्यामुळे बुरशी वाढलेलं लाकूड झिजायला लागतं या बुरशीला (wood rotting fungi) म्हणतात.

प्लास्टिकच्या पॉलीथिन पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. महाराष्ट्रात ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे, मात्र तरीही या पिशव्यांचा छुप्या पद्धतीने वापर होत असतो.
अशा पॉलीथिनच्या पिशव्यांच्या विघटनाचा प्रश्न मोठा आहे. या पिशव्या जलचर प्राणी खातात आणि त्यांचा मृत्यू होतो.
संशोधक मनीषा सांगळे सांगतात, "जगातल्या मोठ्या समस्येवर काम करायला मिळालं या भावनेने सगळ्या पैलूंवर काम केलं. प्लास्टिकचं विघटन का होत नाही या बरोबरच ते कसं होऊ शकतं या मुद्द्याकडे जास्त लक्ष दिलं."
डॉ. अविनाश अडे यांनी खारफुटी वनस्पती निवडण्यामागे कारण सांगितलं, "खारफुटी वनस्पती ज्या ठिकाणी असतात तिथं सागरी आणि फ्रेश ( गोडं पाणी) पाणी याचं मिश्रण असतं. बुरशी म्हंटल की बाष्प आलं. कारण बाष्प असणाऱ्या ठिकाणी बुरशी जास्त असते. त्याच बरोबर या मुळांच्या मधून तयार होणारी अन्नद्रव्यं शोषण्यासाठी त्याठिकाणी बुरशी वाढते."
"तसंच या खारफुटी जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचं प्रदूषण असतं. मुळांशी अनेक प्लास्टिकच्या कॅरीबॅग आणि इतर कचरा असतो.
पाणथळ जागेत कुजण्याची प्रक्रिया जास्त असते. म्हणून या ठिकाणी मातीचे नमुने गोळा करून बुरशी शोधण्यात आल्याच," डॉ अडे यांनी सांगितलं.
अतिशय मर्यादित साधनांमध्ये हे संशोधन केल्याचं डॉ. अडे सांगतात.
कसं केलं संशोधन?
खारफुटी वनस्पती ज्या समुद्र किनाऱ्यांजवळ वाढतात. त्या वनस्पतींच्या मुळांजवळच्या मातीचे नमुने घेण्यात आले. पश्चिम किनारपट्टी लगत १२ ठिकाणांवरून हे नमुने गोळा करण्यात आले. गुजरात ,महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांच्या समुद्र किनारपट्टीवरून नमुने घेण्यात आले.

या मातीच्या नमुन्यातील १०९ बुरशी वेगळ्या करण्यात आल्या. पेट्री प्लेट( छोट्या काचेच्या प्लेट ज्यात बुरशींसाठी अन्नाचा स्त्रोत दिला जातो.) मध्ये पॉलीथिनच्या पिशवीचे तुकडे ठेवण्यात आले. वेगवेगळ्या तापमानात, तसंच पीएच (PH) बदलून नोंदी घेण्यात आल्या.
त्याचबरोबर शेकिंग दिलं गेलं. एका नोंदीसाठी किमान ६० दिवस प्रयोग करण्यात आला. अशा पद्धतीने १०९ बुरशींच्या नोंदी घेण्यात आल्या. त्यापैकी सगळ्यांत जास्त रिझल्ट मिळालेल्या दोन बुरशी निवडण्यात आल्या.
Aspergillus terreus strain आणि Aspergillus sydowii या दोन बुरशींमध्ये प्लास्टिक विघटनाची क्षमता अधिक असल्याचं लक्षात आलं.
प्लास्टिक पिशव्यांची निर्मिती करताना त्यांची टेंसाईल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी अनेक रसायनांचा (Adetives) वापर होतो. ही रसायनं अतिशय घातक असतात. जेव्हा प्रयोगादरम्यान विघटन झालं त्यात हे पदार्थ वेगळे झाले.

या दोन्ही बुरशी प्लास्टिकची टेंसाईल स्ट्रेंथ ९४% कमी करतात. तर प्लॅस्टिकच्या वजनात 50% इतकी घट होते.
डॉ शहानवाज खाकी सांगतात, "खरंतर प्लास्टिकच्या वजनात १००% घट हे आमचं उद्दिष्ट आहे. आता आम्हाला ५०% टक्के घट मिळाली आहे. तर टेंसाईल स्ट्रेंथ 94% इतकी कमी झाली आहे."
डॉ. अविनाश अडे, डॉ. मनीषा सांगळे आणि डॉ. शहानवाझ ही टीम आता प्लास्टिक विघटन करणाऱ्या विकारांवर संशोधन करणार आहे.
या संशोधनाचा काय फायदा?
बुरशी प्लास्टिक विघटन करू शकतात या संदर्भात यापूर्वीही संशोधन झालं आहे. मात्र पुण्यातल्या संशोधकांना मिळालेली वजनातील घट (५० टक्के) आणि टेंसाईल स्ट्रेंथ (९४%)पहिल्यांदा मिळाली आहे. कशाप्रकारे विघटन झालं ही प्रक्रिया शोधल्यास मोठं यश मिळेल अशी आशा संशोधकांना आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर बुरशींवर अभ्यास करणारे मायकोलॉजिस्ट डॉ. किरण रणदिवे यांनी प्लास्टिक विघटन करणाऱ्या बुरशींच संशोधन अतिशय महत्त्वाच असून भारतीय शास्त्रज्ञांनी हे शोधून काढणं अतिशय आनंदाची बाब असल्याचं म्हटलं आहे.
तसंच बुरशींच वर्गीकरण अद्याप दुर्लक्षित आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. भारतात हवामानाचं वैविध्य असल्याने बुरशींच्या वेगवेगळ्या जाती उपलब्ध आहेत. मात्र बऱ्याच बुरशींचं अजूनही वर्गीकरण झालं नसल्याने त्या अज्ञात आहेत. यासाठी सरकारच्या पाठबळाची गरज असल्याचं रणदिवे म्हणतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








