तोकड्या कपड्यांनी बलात्कार होतो का? काहीतरीच काय आंटी! - ब्लॉग

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी
YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

"तू कमी कपडे घातलेस ना, बघ आता तुझ्यावर बलात्कार होईल. ए धरा रे तिला आणि करा बलात्कार."

तुम्ही जर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी कशाबद्दल बोलतेय. आणि जर नसाल, तर ही गोष्ट आहे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या एका व्हीडिओची.

सोशल मीडिया व्हायरल व्हीडिओ

फोटो स्रोत, Facebook

फेसबुक युजर शिवानी गुप्ताने हा व्हीडिओ आपल्या अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हीडिओतली घटना दिल्लीजवळच्या गुरुग्राममध्ये घडली आहे.

नऊ मिनिटाच्या या व्हीडिओत एका शॉपिंग सेंटरमध्ये एक महिला आणि काही मुलींमध्ये जोरदार वाद चालू आहे. या व्हीडिओतल्या मुली त्या महिलेला माफी मागण्यासाठी सांगत आहेत. असं काय केलं या महिलेने?

हा व्हीडिओ शेअर करणाऱ्या शिवानी गुप्ताचं म्हणणं आहे की "आम्ही काही मैत्रिणी एका रेस्तराँमध्ये जेवायला गेलो असताना या बाईंनी माझ्या मैत्रिणीच्या तोकड्या कपड्यांवरून तिला हटकलं. तू असे कपडे घातलेस, तुला लाजलज्जा नाही का असंही त्या माझ्या मैत्रिणीला म्हणाल्या," असं शिवानीने एका interview मध्ये सांगितलं.

त्या बाईंनी रेस्तराँमध्ये बसलेल्या पुरुषांना आमच्यावर बलात्कार करायला सांगितला, असंही शिवानीचं म्हणणं आहे.

व्हीडिओत या मुली संतापून त्या महिलेला आपली माफी मागायला सांगत आहेत. त्यांचा आवाजही चढलाय. मला विचाराल तर साहजिक आहे. उद्या एखाद्या सार्वजनिक ठिकाणी एखाद्या अनोळखी बाईने माझ्या आसपासच्या पुरुषांना सांगितलं की 'हिच्यावर बलात्कार करा' तर मीही संतापेन.

संताप

या व्हीडिओत आणखी एक महिला बोलताना दिसतेय. ती म्हणते की मला दोन मुली आहेत. माझ्या मुलींनी काहीही कपडे घातले तरी कुणा पुरुषाला त्यांच्यावर बलात्कार करण्याची सूट मिळत नाही. वाट्टेल ते बोलू नका. तुम्ही या मुलींची माफी मागितलीच पाहिजे.

या घटनेने एका जुन्या वादाला नव्याने तोंड फुटलं आहे.

तोकड्या कपड्यांमुळे बलात्कार?

'बलात्कार होऊ द्यायचा नसेल तर व्यवस्थित कपडे घातले पाहिजेत.' हे मी, तुम्ही, बाकी महिलांनी हजार वेळा ऐकलं असेल. काही जणींनी अनेकींना ऐकवलंही असेल. 'बलात्कारासाठी मुळात बाई जबाबदार, पुरुष बिचारे महिलांच्या तोकड्या कपड्यांना बळी पडतात' असं म्हणणारे 100 पैकी 80 लोक आजही सापडतील.

पण महिलांच्या तोकड्या कपड्यांना जबाबदार धरणारे हे सोईस्करपणे विसरतात की बलात्कार 80 वर्षांच्या गावखेड्यातल्या म्हातारीवर होतो, 10 वर्षांच्या चिमुरडीवर होतो आणि 8 महिन्यांच्या बाळाला तर आपण काय कपडे घातले हे कळतही नसतं तरीही होतो. मग इथे महिलांच्या कपड्यांचा संबंध काय?

लहान मुलगी

फोटो स्रोत, Reuters

मेकअप केला तर 'she is asking for it', शॉर्ट ड्रेस घातला तर ती 'तसलीच' आहे! 11 महिन्यांच्या बाळावर बलात्कार झाला होता तीन वर्षांपूर्वी दिल्लीत. तिच्यावर 2 तास सतत अत्याचार होत होते, but she was asking for it नाही?

बलात्काराची कारणं काय मग?

अनेक अभ्यासांतून हे सिद्ध झालंय की बलात्कारसाठी स्त्रीचे कपडे, तिचं वागणं बोलणं किंवा तिचं एकटं असणं कारणीभूत नसतं तर बलात्कारी पुरुषाची मानसिकता कारणीभूत असते.

म्हणजे समजा एखादी स्त्री रात्री एकटी सुनसान रस्त्यावरून जात असली तरी तिला पाहणारा प्रत्येक पुरुष तिच्यावर बलात्कार करेल असं नाही, पण ज्याची मानसिकता तशी आहे, ज्याला महिलांना कमी लेखणं योग्य वाटतं, जो महिलांना उपभोग्य गोष्ट समजतो तो नक्कीच करेल.

पुरुषांना बलात्कार करावासा वाटणं हे नॉर्मल आहे, असा म्हणणाऱ्यांचा मला प्रचंड राग येतो.

मानसशास्त्रज्ञ म्हणतात की बलात्कार करण्याची इच्छा असणं कोणत्याही परिस्थितीत नॉर्मल नाहीये.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मानसशास्त्रज्ञ म्हणतात की बलात्कार करण्याची इच्छा असणं कोणत्याही परिस्थितीत नॉर्मल नाहीये.

अमेरिकेतल्या एका कंपनीने असे स्त्री रोबोट आणलेत ज्यांना हात लावला की ते 'वाचवा', 'मला सोडा,' 'मला हात लावू नका' असं ओरडतात. कंपनीचं म्हणणं आहे पुरुषांच्या आंतरिक इच्छा पूर्ण करण्यासाठी हे रोबोट बनवले आहेत. बाईवर बलात्कार करण्याची ही कसली आंतरिक इच्छा?

मानसशास्त्रज्ञ म्हणतात की बलात्कार करण्याची इच्छा असणं कोणत्याही परिस्थितीत नॉर्मल नाहीये.

सेक्शुअल डिसऑर्डर्सवर काम करणारे दिल्लीतले मानसशास्त्रज्ञ प्रवीण त्रिपाठी म्हणतात, "कोणीही बलात्कार करून आपली लैंगिक इच्छा पूर्ण करू शकत नाही. असं करणाऱ्याचा एकच उद्देश असतो. तो म्हणजे आपल्यापेक्षा कमजोर स्त्रीवर जबरदस्ती करून आपल्या ताकदीचं वर्चस्व प्रस्थापित करणं."

'तू काय घातलं होतंस?'

जगाच्या पाठीवर कोणत्याही बलात्कारित पीडितेला विचारला जाणारा हा प्रश्न: 'तू काय घातलं होतंस?'

या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न झाला तो अमेरिकेतल्या कॅनसस विद्यापीठात आयोजित केलेल्या एका प्रदर्शनात. बलात्कार झाला तेव्हा पीडितांनी जे कपडे घातले होते त्या प्रदर्शनात मांडले होते.

प्रदर्शन

पिवळा बंद गळ्याचा टी शर्ट, सैल लाल शर्ट आणि खाकी पँट, स्पोर्ट्स जर्सी, घरात घालायचा पायजमा असे कपडे या प्रदर्शनात मांडले होते. एका पीडितेने सांगितलं, "मी छानसा गुलाबी रंगाचा सनड्रेस घातला होता. त्या घटनेनंतर माझ्या आईने कितीवेळा विचारलं की मी तो ड्रेस परत का घातला नाही? माझी हिंमतच झाली नाही तो ड्रेस घालायची. मी सहा वर्षांची होते तेव्हा."

आपणही 'रेप कल्चर'चा भाग?

स्पष्ट सांगायचं तर रेप कल्चर म्हणजे बलात्काराचं उदात्तीकरण. बाईने ऐकलं नाही, समाजाने घालून दिलेले जाचक नियम पाळले नाहीत तर तिला अद्दल घडवायला तिच्यावर बलात्कार करायला लागणारी संस्कृती म्हणजे रेप कल्चर.

साहजिक आहे की बलात्कार पीडितेलाच ही संस्कृती दोषी मानते. तिनेचं काहीतरी केलं म्हणून तिचा बलात्कार झाला असं म्हणते. आणि अशा बलात्कारांचं गांभीर्यही कमी करते.

रेप कल्चर

फोटो स्रोत, Getty Images

सध्या व्हायरल झालेल्या व्हीडिओत त्या बाईंनी पुरुषांना जेव्हा म्हटलं की 'या मुलीने तोकडे कपडे, तुम्ही तिच्यावर बलात्कार करा,' तेव्हा ही शिक्षा ठोठावण्याची मनोवृत्तीही रेप कल्चरचाच भाग आहे.

संस्कृतींचा फरक

तोकडे कपडे म्हणजे काय याच्या व्याख्या जगभरात वेगवेगळ्या आहेत. पाश्चिमात्य देशात गुडघ्यापर्यंत ड्रेस असणं नॉर्मल समजलं जातं, पण पोट दाखवणं मात्र कॉमन नाही. उलट आपल्याकडे साडी नेसली की पाठ, पोट आणि कंबर दिसतेच पण साडीला आपण अंगभर कपडे समजतो.

मग हाच न्याय लोकांच्या मानसिकतेला पण लागू पडतो ना. एखाद्याला जे कपडे तोकडे वाटतात, ते दुसऱ्याला नाही वाटणार. आपल्या समाजात अनेकदा साडी अंगभर आणि लूज टीशर्ट आणि जीन्स उत्तेजक कपडे समजले जातात. मग बलात्कार करणाराच कोणते कपडे तोकडे आणि कोणते नाही हे ठरवणार का?

तेच लॉजिक महिलांच्या रात्री उशीरापर्यंत बाहेर असण्यालाही लागू पडतं. कोणाला रात्री 10 म्हणजे अपरात्र वाटेल, पण काही म्हणतील बाई म्हटली की 7च्या आत घरात हवी. खरं तर आपण कोणते कपडे घालावेत, कितीपर्यंत बाहेर असावं, कसं वागावं, हे ठरवण्याचे अधिकार बाईला हवेत, पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही.

नो मीन्स नो

फोटो स्रोत, Getty Images

गुरुग्राममधल्या घटनेनंतर आपल्या समाजातलं अस्वस्थ करणारं वास्तव पुन्हा एकदा पुढे आलं आहे. बलात्कार होण्यासाठी मुलीच जबाबदार आहेत, असं अनेक महिलांनाही वाटतं, हे यातून दिसतं.

प्रॉब्लेम मुलींमध्ये नाही, तर काही मुलांच्या डोक्यात आहे, हे लक्षात घ्यायला हवं. ज्या बाई मुलींना कपड्याचे सल्ले देत आहेत, त्यांनी खरं तर मुलींची छेड काढणाऱ्या मुलांना सल्ले देण्याची गरज आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)