You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा 2019: राज ठाकरे अचानक उदारमतवाद्यांचे हिरो कसे झाले?
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या पक्षाने देशाला कसं फसवलं, याचं वर्णन करणारी भाषणं ते दररोज करत आहेत. मुलाखतीही देत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला पूरक भूमिका घेतली आणि नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर आजवर राज यांना विरोध करणारी माणसं त्यांचं कौतुक करू लागली आहेत.
राजकीय बदलांनुसार किंवा बदलत्या परिस्थितीनुसार राजकारण करण्याचा पूर्ण अधिकार राजकीय नेत्यांना आणि पक्षांना असतो. तो भारतीय राजकीय नेत्यांनी वेळोवेळी भरपूर वापरलेला आहे. राज ठाकरे यांनाही तो अधिकार आहे.
परंतु ते केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात उभे ठाकले म्हणून त्यांना पाठिंबा देणं सर्वांना कोड्यात टाकणारं आहे. व्यंगचित्रकार मंजूल यांनी यावर भाष्य करणारं एक कार्टून काढलं आहे. विरोधी पक्षांकडे पंतप्रधानांच्या विरोधात बोलण्यासाठी एक खंबीर आवाज नसणं यातून अधोरेखित होतं.
राज ठाकरेंच्या या बदललेल्या भूमिकेविषयी महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ पत्रकारांना आणि जाणकारांना काय वाटतं, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
धक्कातंत्राच्या प्रेमात
लोकसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या विशेष शैलीला आणखी एका वेगळ्या वळणावर नेलं आहे.
शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे विविध खात्यांमधील, कंपन्यांमधील अमराठी लोकांची नावं वाचून दाखवणं, मराठी लोकांच्या अल्प प्रमाणाची टक्केवारी वाचून दाखवणं, अशा तेव्हा नव्या असणाऱ्या तंत्राचा वापर करत, त्याच तंत्राचा वापर राज ठाकरे यांनीही केला आहे.
त्यानंतर लॅपटॉप वापरणं, स्लाईड-शो प्रेंझेंटेशन करणं, व्हीडिओ दाखवणं, अशी एकेक मजल मारत आता ते थेट जिवंत माणसांनाच पुराव्यादाखल व्यासपीठावर बोलवू लागले. हे धक्कातंत्र आज महाराष्ट्रात चांगलंच लोकप्रिय झालं आहे. हा प्रयोग महाराष्ट्राबाहेरील लोकही उत्सुकतेनं पाहू लागले आहेत.
राज ठाकरे मराठीमध्ये भाषणं देत असले तरी त्यांची भाषणं हिंदी-इंग्रजी सबटायटल्समध्ये देशभरात जाऊ लागली. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या झंझावती प्रचारापुढे आजवर दीपून गेलेल्या विरोधकांसाठी मात्र ही संजीवनी ठरत असल्याचं जाणकार सांगत आहेत.
...म्हणून ते मित्र झाले
मोदी-शाह यांना शिंगावर घेण्याची किमान भाषा तरी करणारा माणूस मिळाला, असं वाटून राज यांचं जोरदार स्वागत होऊ लागलं. काही काँग्रेसचे उमेदवार तर जाहीररीत्या राज ठाकरेंनी आपल्या मतदारसंघात एक तरी सभा घ्यावी, अशी इच्छा व्यक्त करत आहेत.
पण जे लोक राज ठाकरेंच्या भूमिकेवर जोरदार टीका लोक करायचे, आणि जी हिंदी इंग्रजी माध्यमं त्यांच्या पक्षाच्या 'खळ्ळ-खटॅक'वर तुटून पडायची, ते सर्वजण आज 'लाव रे तो व्हीडिओ'च्या प्रेमात पडले आहेत का? हे असं का झालं असावं?
मोदी-शहा यांच्याविरोधात कसं लढायचं, असा प्रश्न पडलेल्या विरोधकांना 'माझा लढा फक्त मोदी-शहा या दोघांविरोधात आहे' म्हणणारा नेता, तेही उत्तम भाषणं करणारा, अगदी वेळेवर मिळाला असं म्हणावं लागेल.
'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' या नात्यानं राज ठाकरेंना जवळ केलं जाऊ लागलं आहे. त्यांच्या भाषणांच्या व्हीडिओ क्लिप्स ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केल्या जात आहेत. मात्र आज राज ठाकरे आवडू लागलेल्या लोकांना त्यांच्या पूर्वीच्या मताबद्दल बोलावं लागलं तर ते पेचात सापडण्याची स्थिती येईल.
शिवाय, उद्या जर मनसैनिकांनी पुन्हा परप्रांतीय विद्यार्थ्यांना मारहाण करणं, काही ठराविक सिनेमांना विरोध करणं, हिंदीमधून शपथ घेतली म्हणून आमदारास मारणं, फेरीवाल्यांना मारहाण करणं, या आपल्या जुन्या कार्यक्रमांना सुरुवात केली तर आज त्यांच्या भाषणावर टाळ्या वाजवणारे लोक कशी भूमिका घेतील, हा प्रश्न उरतोच.
ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांना वाटतं की "पूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदी हा फॅक्टर सर्वत्र आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोकळी तयार झाली असताना राज ठाकरे यांच्या प्रचाराकडे सर्वांचे लक्ष गेले आहे."
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "My brother and I against my cousin; my cousin and I against strangers अशी एक अरबी म्हण आहे. त्याप्रमाणेच राजकारणात वर्तन होतं. तसंच महाराष्ट्रासह देशभरात विविध पक्ष अनेकदा एकमेकांच्या जवळ आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळणं त्याचाच एक भाग आहे."
यशवंत सिन्हा, अरुण शौरी, शत्रुघ्न सिन्हा यांच्यानंतर राज?
एकेकाळी भारतीय जनता पार्टीमध्ये वरिष्ठ पदांवरती कार्यरत असणारे तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातही राहिलेल्या काही नेत्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात भूमिका घेतली. उदारमतवादी नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या समूहाने त्यांना आपलंसं केलं.
यशवंत सिन्हा यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलण्याची एकही संधी सोडली नाही. तसंच या काळात अर्थव्यवस्था कशी रसातळाला गेली, हे सांगणारं पुस्तकही लिहिलं.
बिहारच्या पाटणा साहीबमधून भाजपचे मावळते खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनाही काँग्रेस आणि विरोधकांकडून नेहमीच पाठिंबा मिळत गेला. आता तर ते काँग्रेसमध्येच सामील झाले आहेत आणि इथूनच आता काँग्रेसचे उमेदवार आहेत.
अरुण शौरी यांनी भाजप सरकारचं वर्णन 'काँग्रेस + काऊ' असं केल्यावर आजवर त्यांना केलेला विरोध विसरून एक मोठा वर्ग त्यांच्यामागे जाऊन उभा राहिला.
पण राज ठाकरे यांच्याबाबतीत स्थिती वेगळी आहे. या तीन नेत्यांना पाठिंबा देणं आणि राज यांची 'खळ्ळ-खटॅक'ची शैली स्वीकारणं यात नक्कीच मोठा फरक आहे.
ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर यांच्यामते राज ठाकरे यांना केवळ उदारमतवाद्यांचा नाही तर इतर गटांचाही पाठिंबा मिळत आहे. ते म्हणाले, "उदारमतवाद्यांमध्ये त्यांची भूमिका न पटणारे लोकही आहेत. राज ठाकरे भाजपला विरोध करत नसून ते मोदी-शहा जोडीला विरोध करत आहेत, हे त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये मांडलं आहे. त्यामुळे केवळ या एका मुद्द्यावर त्यांना विविध गटांचा पाठिंबा मिळत आहे."
'विरोधकांचं काम राज ठाकरे करत आहेत'
राज ठाकरे यांच्या सध्याच्या भाषणांमुळे एका मोठ्या वर्गावर का परिणाम झाला असावा, याबद्दल ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी 'बीबीसी मराठी'कडे आपलं मत मांडले.
ते म्हणाले, "राज यांना या निवडणुकीत पाठिंबा का मिळतो, याचा विचार केला तर मोदी-शहा यांच्याविरोधात त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे. ज्या पद्धतीने विरोधी पक्षांनी प्रचार करायला हवा होता तो त्यांनी केला नाही, परंतु राज ठाकरे नेमक्या त्याच पद्धतीनेच प्रचार करत आहेत. त्यामुळेच केवळ महाराष्ट्रातून नाही तर देशभरात ते मोदी-शहा विरोधकांच्या गळ्यातील ताईत बनले."
"मोदी-शहा यांचा खोटेपणा ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमाच्या आधारे चव्हाट्यावर आणण्याची शैली भारतीय राजकारणात अभूतपूर्व आहे. यापूर्वी कोणत्याही नेत्याने असं तंत्र वापरलं नव्हतं. साहजिकच विरोधी पक्षांना आणि मोदी विरोधकांना राज यांच्या रूपाने rallying point (लढायला एक मुद्दा) मिळाला आहे."
'आंधळेपणाने राज ठाकरे यांच्या प्रेमात पडल्यास...'
राज ठाकरे यांनी भविष्यात पुन्हा 'खळ्ळ-खटॅक'ची भूमिका स्वीकारली तर आज त्यांची वाहवा करणारा वर्ग अडचणीत सापडेल का, असं विचारलं असता वागळे म्हणाले, "राज ठाकरे यांनी भाषणातून आपल्या पूर्वीच्या भूमिका बदलल्या आहेत, असं कुठेही म्हटलेलं नाही. त्यांची हिंदुत्ववादी भूमिका किंवा उत्तर भारतीयांविरोधी भूमिका आजही कायम आहे. पण काळाच्या ओघात ती थोडी मवाळ झालेली दिसते.
"पुढच्या काळात राज ठाकरे काय करतील, यावर त्यांचं राजकारण ठरेल. पण सेक्युलर किंवा लिबरल आज आंधळेपणाने प्रेमात पडले तर भविष्यात त्यांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही," ते म्हणाले.
'हे नातं वैचारिक नाही तर रणनीतीवर आधारलेलं आहे'
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावीकडे झुकलेले मध्यममार्गी, उदारमतवादी यांना राज ठाकरे यांचं सर्व म्हणणं पटतंय, राज ठाकरेंच्या ते प्रेमात पडलेले आहेत, असं आजिबात नसल्याचं ज्येष्ठ पत्रकार स्मृती कोप्पीकर सांगतात. "हे नातं विचारसरणीवर आधारित नसून ही एक रणनीती आहे, त्याला non-ideological kinship (विचारसरणीवर आधारीत नसलेलं नातं) म्हणता येईल," असं त्या म्हणाल्या.
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांचा भूतकाळ आणि त्यांनी आजवर घेतलेली भूमिकाही येते. ती हा उदारमतवर्ग (liberals) विसरला असेल असं आजिबात नाही. तसेच राज ठाकरे कितीही मोदींच्या विरोधात बोलले तरी त्यांच्या आणि उदारमतवादी वर्गामध्ये असणारी दरी भरून येणारी नाही. ती भरून कशी काढणार, याचं उत्तर राज ठाकरे यांना द्यावं लागेल."
राज ठाकरे यांच्या बदललेल्या भाषेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "राज ठाकरे यांचा मूळ सिद्धांत मराठी उपराष्ट्रवाद(subnationalism), मराठी अस्मिता, मराठी माणूस यावर आधारित आहे. परंतु या भाषणांमध्ये त्यांनी याचा उल्लेखही केलेला नाही.
"'परप्रांतीय' हा नेहमीचा शब्द त्यांनी उच्चारलेला नाही. आता ते मराठीत बोलत असले तरी राष्ट्रीय मुद्द्यांवर बोलत आहेत. पण निवडणुकीनंतर त्यांच्या मूळ मराठी सिद्धांताचं काय झालं, याचं उत्तर मिळालं तरच विधानसभेसाठी महाराष्ट्राचे राजकीय चित्र स्पष्ट होईल," त्या सांगतात.
'हे उपासाचं खाणं'
"आपण ज्या प्रमाणे उपवासाच्या दिवशी आपण रोजचं जेवण सोडून दुसऱ्या प्रकारचं अन्न खातो. तसा प्रकार सध्या राज ठाकरे आणि राष्ट्रवादी, काँग्रेस करत आहेत," असं मत कोप्पीकर मांडतात. याबाबत त्या सांगतात, "राज ठाकरे यांनी त्यांचे नेहमीचे शब्द उच्चारलेले नाहीत. हा त्यांचा उपवास कधीतरी संपेलच. तेव्हा खरी भूमिका समजेल. उदारमतवादी वर्ग राज यांची मूळ भूमिका विसरून गेले असावेत असं वाटत नाही."
"राजकारण किंवा व्यवसायामध्ये Quid pro quo केलेल्या कामाबाबत काहीतरी नुकसानभरपाई असतेच. जर राज यांच्यामुळे राष्ट्रवादीला फायदा होणार असेल तर त्यासाठी काय Quid pro quo असेल हा प्रश्न उरतोच," असं स्मृती कोप्पीकर यांचं मत आहे.
"विधानसभा निवडणुकांसाठी त्यांना मदत मिळणार का? हे नंतर समजेल. सध्या महाराष्ट्राच्या विरोधीपक्षाच्या जागेबाबत बराच गोंधळ होता. ही जागा शिवसेनेने सत्तेत असूनही व्यापली होती. तर ही जागा काँग्रेस-राष्ट्रवादीने व्यापणं आवश्यक होतं, ते प्रभावीपणे झालेलं नाही. त्यामुळे आता मनसेनं विरोधी पक्षाचा आवाज बनून ही जागा घेतली आहे. येत्या काळात महाराष्ट्राचा राजकीय पट कसा बदलत जाईल हे काही महिन्यांमध्ये कळेल," असं त्या म्हणाल्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)