वनबीबी : अशी देवी जिची पूजा हिंदू-मुस्लीम हे दोन्ही समुदाय करतात

वनबीबी

फोटो स्रोत, KALPANA PRADHAN

    • Author, कल्पना प्रधान
    • Role, बीबीसी ट्रॅव्हल

तसं पाहिलं तर मुस्लीम लोक मूर्तिपूजेच्या विरोधात आहेत. मूर्तिपूजा करणाऱ्या व्यक्तीला ते काफिर संबोधतात. पण, भारतात अशी एक जागा आहे जिथं हिंदू आणि मुसलमान एकाच देवीची पूजा करतात. ही जागा हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक आहे.

भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर सुंदरबन नावाचा परिसर आहे. हे जगातील सर्वांत मोठं दलदलीचं जंगल आहे. युनिस्कोनं याचा समावेश जगभरातल्या आश्चर्यांमध्ये केला आहे.

बांगला भाषेत सुंदरबनचा अर्थ होतो, सुंदर जंगल. जवळपास 10,000 वर्ग किमी एवढा या जंगलाचा परिसर आहे. या जंगलात शेकडो द्वीप आहेत. तसंच वेगवेगळ्या प्रकारची जनावरं या जंगलात आढळतात. सस्तन जनावरांच्या इथं 50 प्रजाती पाहायला मिळतात. तर 315 प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. तर सापाचे वेगवेगळे 315 प्रजाती इथं वास्तव्यास आहेत.

पण, सुंदरबन जंगल हे रॉयल बंगाल टायगरसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे. घनदाट जंगलात राहणारे रॉयल बंगाल टायगर आता फक्त याच परिसरात पाहायला मिळतात. अनेकदा त्यांनी पर्यटकांवर जीवघेणे हल्ले केले आहेत. असं असलं तरी, कित्येक वर्षांपासून माणसं आणि हे प्राणी सुंदरबनमध्ये एकत्र राहत आहेत.

सुंदरबन परिसरात जवळपास 45 लाख लोक राहतात. मासेमारी तसंच जंगलातील मध गोळा करणं आणि लाकूड तोडणं हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. जंगलात काम करणं या सर्वांसाठी धोकादायक असतं. कारण पाण्यातून मगर, साप अथवा वाघ कधी हल्ला करेल सांगता येत नाही. पण स्थानिक लोक या गंभीर परिस्थितीतही काम करतात.

इथं दरवर्षी जवळपास 60 जण रॉयल बंगाल टायगरच्या हल्ल्यात जीव गमावतात.

हिंदू-मुस्लिमांची देवी

दोन्ही समुदायाच्या लोकांना ही देवी एकत्र आणते अशी या लोकांच श्रद्धा आहे. या देवीला भारतीय आणि बांगलादेशी असे दोन्ही लोक मानतात. यात हिंदू आणि मुसलमान दोघांचाही समावेश होतो. श्रीमंत असो अथवा गरीब, सुंदरबनच्या जंगलात कूच करण्याअगोदर लोक या देवीसमोर नतमस्तक होतात.

या देवीला वनबीबी या नावानं ओळखलं जातं. सुंदरबनमध्ये 3 प्रमुख नद्या समुद्रास मिळतात. त्यापूर्वी त्यांच्या छोट्या छोट्या शाखा दलदली प्रदेशातून वाहतात. प्रत्येक वादळानंतर नदींमधील अंतर कमी होत जातं. याचप्रकारे सुंदरबनमध्ये वनबीबीसमोर हिंदू-मुसलमान हा फरक मिटतो. शेकडो वर्षांपासून दोन्ही समाजाचे लोक सुंदरबनमध्ये गुण्यागोविंदानं राहत आहेत.

सुंदरबन

सुंदरबनमधील शंभूनाथ मिस्त्री सांगतात, "प्राणी हल्ला करतात तेव्हा ते हिंदू मुस्लीम असा भेदभाव करत नाहीत. त्यामुळे इथं दोन्ही समाजाचे लोक वनबीबीची पूजा करतात. वनबीबीला सुंदरबनची संरक्षक देवी म्हटलं जातं. हिंदू-मुस्लीम एकत्रितपणे तिची पूजा करतात."

या परिसरात मध गोळा करणारे हसन मुल्ला सांगतात, "वनबीबी सुंदबरनच्या मुस्लिमांच्या जीवनाचा अतूट भाग आहे. हिंदू-मुसलमान एकमेकांच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये एकमेकांना बोलावतात."

वाघ

फोटो स्रोत, ARINDAM BHATTACHARYA / ALAMY STOCK PHOTO

वनबीबी आमचं प्राण्यांपासून रक्षण करते, असं दोन्ही समाजाच्या लोकांना वाटतं. जंगलात तुमची गरज पूर्ण झाली, तर तुम्ही परत घराकडे या, याची ती त्यांना शिकवण देते. जास्त लालूच दाखवू नका, याची शिकवण देते.

वाघाचा हल्ला होण्याची शक्यता असेल तर दोन्ही समाजाचे लोक एकत्र येत त्याचा सामना करतात. कधीकधी वन विभागाचे कर्मचारी वाघांना पकडून जंगलात सोडतात.

रॉयल बंगाल टायगर खूप बुद्धिमान आणि आक्रमक प्राणी आहे. ते पाठीमागून वार करतात. सुरुवातीला ते माणसाचा एक हात तोडतात. नंतर हाड, गळा आणि फुप्फुसावर हल्ला करतात. वाघाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी मध गोळा करणारे आणि मच्छिमार डोक्यामागे एक मुखवटा लावतात, जेणेकरून माणसाच्या समोर उभे आहोत, असं वाघाला वाटावं.

कोण आहे वनबीबी?

"दोन्ही समाजाचे लोक जंगलात एकत्र राहतात, तेव्हा वाघसुद्धा त्यांच्यावर हल्ला करण्याची हिम्मत दाखवत नाही, त्यामुळे मग ते वनबीबीला मानतात," असं शंभूनाथ मिस्त्री सांगतात.

वनबीबीचा अर्थ जंगलातली महिला. वनबीबीला आपल्या सुरक्षेसाठी पृथ्वीवर पाठवण्यात आलं आहे, असं दोन्ही समाजाच्या लोकांना वाटतं.

सुंबरबन

फोटो स्रोत, KALPANA PRADHAN

वनबीबीचा जन्म सौदी अरेबियामधील एका मुस्लीम कुटुंबात झाला, ती हजसाठी मक्का इथे गेली, तेव्हा तिला देवत्व प्राप्त झालं. यानंतर ती 5 हजार किमीचं अंतर पार करत सौदी अरेबियावरून सुंदरबनमध्ये पोहोचली, असा एक किस्सा सुंदरबनमध्ये प्रसिद्ध आहे.

ती सुंदरबनमध्ये पोहोचली तेव्हा तिनं पाहिलं की, इथं माणसांची शिकार करणारे वाघ मोठ्या प्रमाणावर आहेत. जंगलावर दक्षिण राय नावाच्या राक्षसाचं राज्य आहे. वनबीबीनं दक्षिण रायचा पराभव केला. पण त्यानं दयेची भीक मागितली, तेव्हा त्याला माफही केलं. वाघांना माणसांवर हल्ले करण्यापासून रोखेल, असं त्यानं आश्वासन दिलं. यानंतर मग वनबीबी सुंदरबनची शासक बनली. दक्षिण राय पळाला आणि जंगलात लपला होता, असं म्हटलं जातं. आता तोच वाघाचं रुप धारण करून लोकांवर हल्ले करतो.

इथले मुसलमान देवीच्या समोर डोकं टेकवत नाहीत. पण, भारत असो की बांगलादेश सुंदरबन परिसरातल्या प्रत्येक गावात प्रवेश करताच वनबीबीचं मंदिर दिसतं. मुस्लीम समाजाचे लोक देवीपुढे दूध, फळ, मिठाई आणि इथर गोष्टी ठेवतात.

मुस्लीम समाजात महिलांना बीबी म्हटलं जातं. याचा अर्थ वनबीबीचं नावसुद्धा हिंदू-मुसलमान यांच्या सहभागी वारशाचा भाग आहे.

जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात वनबीबीचा वार्षिक उत्सव असतो. तेव्हा दोन्ही समाजाचे लोक मंदिराबाहेर जमा होतात. तेथे पूजा होते. पुजारी लोकांना दक्षिण रायचा किस्सा ऐकवतात. महिला वनबीबीच्या सन्मानासाठी व्रत ठेवतात.

सुंदरबन

वनबीबीच्या अनेक प्रतिमा सुंदरबनच्या जंगलात पाहायला मिळतात.

मासेमार आणि मध गोळा करणारे जंगलात जाण्यापूर्वी वनबीबीची पूजा करतात आणि तिच्याकडे सुरक्षेसाठी याचना करतात.

पण आधुनिकतेच्या विस्तारासोबत वनबीबीच्या प्रती असलेली हिंदू-मुस्लिमांची सामूहिक श्रद्धा धोक्यात आल्याचं दिसून येतं.

मुसलमान आमच्या देवीची पूजा का करत आहेत, ही बाब अनेक हिंदूंना खटकते. त्यांना देवीचं मुस्लीम पद्धतीचं नाव (वनबीबी) असण्यावरही आक्षेप आहे. दुसरीकडे मुस्लीम समाजाच्या काही लोकांना देवीची पूजा म्हणजे मूर्तिपूजा करण्याविषयी तक्रार उत्पन्न होत आहे.

लोक वनबीबीची शपथ तोडून जंगलातून गरजेपेक्षा अधिक सामान आणत आहेत, अशी चिंता स्थानिक लोकांना सतावत आहेत. या लालसेपोटी नैसर्गिक संसाधनासाठी रस्सीखेच होत आहे. जंगल आक्रसत चालले आहेत आणि वाघांच्या हल्ल्यात वाढ होत आहे.

सुंदरबन

मित्रवाडी गावात अनेक महिलांनी वाघांच्या हल्ल्यात पती गमावले आहेत. घरातल्या लहानग्यांचं पोट कसं भरावं, हा त्यांच्यासमोरील प्रश्न आहे.

जंगलं संपुष्टात येत असल्यामुळे वाघ मानवी वस्तींमध्ये घुसत आहेत. वन विभागाचे कर्मचारी या वाघांना पकडून पुन्हा जंगलात सोडतात.

आधुनिकतेच्या वेगामुळे आज सुंदरबनमधील जंगल इथले वाघ धोकादायक परिस्थितीत आहेत. यासोबतच हिंदू आणि मुस्लिमांच्या सामूहिक श्रद्धेची प्रतीक वनबीबी.

असं असलं तरी आशा आहे की, जोवर मनुष्य आणि जंगली प्राणी सुंदरबनमध्ये एकत्र राहत आहेत, तोवर वनबीबीसुद्धा त्यांच्या सुरक्षेसाठी उपस्थित राहील.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)