यवतमाळ लोकसभा निवडणूक: वैशाली येडे - आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी देतेय दिग्गजांना आव्हान

फोटो स्रोत, Nitesh Raut/BBC
- Author, जयदीप हर्डीकर
- Role, बीबीसी मराठीसाठी यवतमाळहून
या आहेत वैशाली येडे... गावात झपाझप पाय टाकत वैशाली घरोघरी जाऊन लोकांना हात जोडून नम्रपणे त्यांचा पाठिंबा मागत आहेत - 'मी तुमचीच मुलगी आहे.'
आपल्याला मिळणारा पाठिंबा बघून वैशालीला आनंद होत असला तरी काळजीही आहेच. त्या प्रत्येकाला न चुकता आपल्या खास वऱ्हाडी भाषेत सांगतात, "माह्यावर लक्ष असू द्या जी." मताचा जोगवा मागताना त्यांच्या या वाक्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा, त्यांना ज्या भावनिक आणि आर्थिक धक्क्याला सामोरं जावं लागलं, त्या सर्व वेदनांची आर्जवही आहे.

फोटो स्रोत, Jaideep Hardikar
वैशाली गावातील म्हाताऱ्या-कोताऱ्यांना वाकून नमस्कार करतात. तरुण मुलींशी हस्तांदोलन करतात. हँडपंपवर पाणी काढणाऱ्या बायकांकडे हात उंचावून त्यांचे लक्ष वेधतात. यानंतर त्या वाट बघत उभ्या असणाऱ्या गाडीत जाऊन बसतात. त्यांच्या ताफ्यात सहा-सात छोट्या गाड्या आहेत. गाडीत बसून हा ताफा 42 अंशाच्या रणरणत्या उन्हात पुढच्या गावासाठी रवाना होतो.
वैशाली या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून 2019च्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. इथे जवळपास 17.5 लाख मतदार 11 एप्रिलला मतदान करतील.
वैशाली 48 वर्षीय ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांचा स्थानिक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार आहेत. बच्चू कडू स्वतः अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमधून आमदार आहेत. त्यांचा पक्ष विदर्भात हळूहळू लोकप्रिय होऊ लागला आहे आणि शेतकरी, शेतमजुरांच्या मुद्द्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
गेल्या जवळपास दोन दशकांपासून यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्येचे केंद्र बनला आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी, मंदावलेली ग्रामीण अर्थव्यवस्था या आणि शेतीशी संबंधित अशा अनेक समस्यांमुळे इथे शेकडो कापूस आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं आहे.
आपल्या मतदारसंघातील सर्वच्या सर्व 2,000 गावं आणि शहरांमध्ये जाणं शक्य नसल्याने वैशाली या काही ठिकाणी प्रचार सभादेखील घेत आहेत. "आज आम्ही राळेगाव पूर्ण केलं. उद्या आम्ही वाशीमला जाणार आहोत," त्या सांगतात.

फोटो स्रोत, Jaideep Hardikar
2009 साली वयाच्या अठराव्या वर्षीच त्यांचं सुधाकर येडे यांच्याशी लग्न झालं. नवऱ्याने आत्महत्या केली तेव्हा त्या अवघ्या 20 वर्षांच्या होत्या.
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा हे वैशाली यांचं गावं. याच तालुक्यातील राजूर गावात सुधाकर यांची तीन एकर कोरडवाहू शेती होती. त्यांनी 2 ऑक्टोबर 2011 रोजी आत्महत्या केली, त्यावेळी वैशाली आपल्या वडिलांकडे होत्या. तेव्हा त्यांचा पहिला मुलगा कुणाल जेमतेम दीड वर्षांचा होता तर त्यांची मुलगी जान्हवीचा नुकताच जन्म झाला होता.
"त्या संध्याकाळी बातमी आली की माझ्या नवऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. माझा, आमच्या मुलांचा कसलाही विचार न करता ते आम्हाला सोडून गेले," त्या सांगतात. त्या सांगतात की नेमकी कोणत्या कारणामुळे नवऱ्याने आत्महत्या केली, हे त्यांना अजूनही कळलेलं नाही. त्यांच्यावर कर्ज होतं आणि त्यावर्षी पीक हाती आलंच नव्हतं, एवढंच त्यांना ठाऊक.
यवतमाळमधील शेतकऱ्यांचं दुःख, नापिकी आणि शेतकरी आत्महत्या या सर्वांमध्ये त्यांची बातमी दुर्लक्षित राहिली. गेल्या वर्षी वैशाली यांना 'तेरावं' या नाटकात काम करण्यासाठी विचारणा करण्यात आली. नागपुरातील प्रसिद्ध कथाकार आणि ज्येष्ठ पत्रकार श्याम पेठकर यांनी हे नाटक लिहिलं आहे. शेतकरी विधवांसाठी विदर्भात काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ते वैशालीच्या संपर्कात आले.
'तुमचा नवरा आज आत्महत्या करणार असेल तर तुम्ही त्याला काय सांगाल?' - हा प्रश्न नाटकात उपस्थित करण्यात आला आहे. या एका प्रश्नाभोवती या नाटकाचं कथानक गुंफलं आहे. पेठकर यांनी या विधवांची कहाणी लोकांसमोर आणली. विशेष म्हणजे या नाटकात विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांनी काम केले आहे.

फोटो स्रोत, Jaideep Hardikar
त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये यवतमाळमध्ये भरलेल्या साहित्य संमेलनामुळेही वैशाली प्रकाशझोतात आल्या. या साहित्य संमेलनाचं उद्घाटन प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल करणार होत्या. मात्र स्थानिक आयोजकांनी त्यांच्या नावावर आक्षेप घेतल्यामुळे वैशाली यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू सांगतात, त्यांच्या पक्षाने केवळ यवतमाळ-वाशीम या एकमेव लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभा केला आहे. ते पुढे सांगतात, "राज्यभरातून शेतकरी वैशाली ताईसाठी देणगी पाठवत आहेत."
कडू आणि त्यांचे कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागले आहेत. आपल्या प्रचारात ते हमी भाव, राजकीय नेत्यांकडून होणारं दुर्लक्ष इथपासून ते वाढत्या शेतकरी आत्महत्यापर्यंत सारे प्रश्न लोकांसमोर मांडत आहेत. 2017 साली त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने भाजप आणि काँग्रेसला धक्का देत यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा नगर परिषदेच्या 19 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या.
वैशाली यांना मैदानात उतरवून यवतमाळ आणि वाशीम या दोन जिल्ह्यांमधील ग्रामपंचायती, नगर परिषदा आणि जिल्हा परिषदांमध्ये पक्षासाठी जमीन तयार करण्याचा कडू यांचा मानस आहे. जेवढी मतं वैशाली यांना मिळतील, ज्या मतदान केंद्रांमधून मतं पडतील, त्यावरून जनता या पक्षाला पाठिंबा द्यायला तयार आहे का, याचा अंदाज बांधता येईल. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणता उमेदवार उतरवायचा, हेही कळेल.

फोटो स्रोत, Jaideep Hardikar
वैशाली सांगतात, "मला हे करायचं नव्हतं. मात्र बच्चू भाऊंनी जेव्हा सांगितलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होत नाहीयेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मी निवडणुकीत उतरलं पाहिजे, तेव्हा मी हा निर्णय घेतला. मी निवडणुकीत राजकारण करण्यासाठी नाही तर समाजकारण करण्यासाठी आले आहे."
प्रचार रॅली आणि सभांमध्ये भाषण करताना वैशाली पिकाला योग्य हमी भाव, महिला शेतमजुरांना योग्य मजुरी, तसंच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब आणि विधवांचे प्रश्न संसदेत उपस्थित करण्यासाठी आपल्याला निवडून देण्याचं आवाहन करतात.
गावात शेतकऱ्यांमध्ये दारूचं वाढतं व्यसन हीदेखील मोठी समस्या असल्याचे त्या सांगतात. महिलांवर होणारा घरगुती हिंसाचार आणि तिला घ्यावे लागणारे परिश्रम कमी करायचे असतील तर जिल्ह्यात दारुबंदी व्हायला हवी, असं त्यांचं मत आहे.
याशिवाय पुरुषांकडून लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या आणि त्यानंतर टाकून दिलेल्या आदिवासी समाजातील तरुण मुलींचं पुनर्वसन, या मुद्द्यालाही त्या प्राधान्य देणार आहेत. (स्थानिक पातळीवर अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.)

फोटो स्रोत, Jaideep Hardikar
वैशाली ताईंसमोर दिग्गज प्रतिस्पर्ध्यांचं आव्हान आहे. शिवसेनेकडून चार वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी पुन्हा एकदा रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे विधान परिषदेचे उपाध्यक्ष आणि माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे मैदानात आहेत.
"तुम्ही या दिग्गज नेत्यांना निवडून दिलं तर निवडून आल्यावर ते तुम्हाला विसरतील," डोंगरखर्डामधील मुक्कामात बच्चू कडू गावकऱ्यांशी बोलत होते. "मात्र तुम्ही तुमच्या मुलीला निवडून दिलं तर ती दिवसरात्र तुमच्यासाठी काम करेल."
वैशाली सकाळी शेतात मजुरी करतात, दुपारी राजुरा गावातील अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करतात आणि संध्याकाळी घरी आपल्या मशीनवर शिवणकाम करतात. या सर्वांतून त्यांना महिनाकाठी सात ते आठ हजार रुपये मिळतात. वैशालीचे मोठे भाऊ संजय हेच सध्या त्यांचा भक्कम आधार आहेत. ते म्हणतात, "गेली नऊ वर्षं तिने खूप संघर्ष केला आहे."
वैशालीच्या सासरची मंडळी येडे यांचं राजूर गावात मोठं कुटुंब आहे. सर्व मिळून जवळपास 50 घरं असल्याचं वैशालीचे चुलत सासरे माणिक येडे सांगतात.
वैशालीच्या माहेरच्यांकडे शेतजमीन नाही. तिचे वडील माणिकराव धोटे गवंडीकाम करतात तर आई चंद्रकला शेतमजुरी करते. मोठा भाऊ संजय आणि लहान भाऊ विनोद रोजंदारीवर काम करतात.
धोटे कुटुंबाचं डोंगरखर्डामध्ये एक पडकं घर आहे. घराच्या एका भागात वैशालीचे मोठे भाऊ त्यांची बायको आणि मुलगा राहतो तर दुसऱ्या भागात वैशाली तिचे आई-वडील आणि लहान भावाच्या कुटुंबासोबत राहते. वैशालीची मुलगी आता पहिलीत जाते आणि ती वैशालीच्या सासू पंचफुला यांच्यासोबत राजुऱ्याला राहते.
"वैशाली निवडणुकीत उभी राहील, हे आमच्या कल्पनेच्या पलीकडचं आहे," वैशालीचे वडील सांगत होते. "तिला चांगली मतं पडतील, याची मला खात्री आहे. शेतकरी तिला मतं देतील."

फोटो स्रोत, Jaideep Hardikar
मात्र, वैशाली यांच्या उमेदवारीमुळे अनेकांना कोंडीत टाकलं आहे.
"मी तर फार पेचात सापडलो आहे," डोंगरखर्डाचे 30 वर्षांचे सरपंच निश्चल ठाकरे सांगत होते. वैशाली गावची मुलगी आहे म्हणून भावनिक विचार करून तिच्यासाठी मतं मागायची की व्यावहारिकदृष्ट्या गावातील रस्ते, पाणी पुरवठा, सिंचनाच्या सोयी यासारख्या गावाच्या विकासाच्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं, हा त्यांचा पेच आहे. ते म्हणतात, "कारण मी जेव्हा सरपंचपदाच्या निवडणुकीला पुन्हा उभा राहेन त्यावेळी तुम्ही गावासाठी काय कामं केलीत, असा प्रश्न गावकरीच मला विचारतील."
त्यांच्या म्हणण्याचा अर्थ ज्याचं पारडं जड तोच उमेदवार निवडून येणार आणि या निकालाचा परिणाम सहाजिकच पुढच्या सहा महिन्यात येऊ घातलेली विधानसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होणार. ते म्हणतात, "तुम्ही प्रवाहासोबत वाहत असाल तर गावातील विकासकामांसाठी सहज निधी मिळतो."
ठाकरे स्थानिक शिवसेना-भाजप नेत्यांचे जवळचे मानले जातात. मात्र वैशाली ही त्यांच्याच खैरे कुणबी जातीची आहे, हेही विसरता येत नाही आणि हा समाज यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे.
दिग्गजांच्या या लढाईत वैशालीकडे पैसा नाही आणि पॉवरही नाही. निवडणुकीनंतर आपल्याला कदाचित पुन्हा तेच मजुराचं आयुष्य जगावं लागेल, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. मात्र सध्यातरी त्या आपल्या मतदारसंघातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्या म्हणतात जोवर आमच्यापैकी कुणी आवाज उठवणार नाही तोवर शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कुणीच लक्ष देणार नाही.
"शेतकरी आणि महिला यांच्या समस्या माझ्यापेक्षा जास्त चांगल्या कुणाला माहिती असणार? मी निवडून आले तर मी माझ्या लोकांच्या समस्या संसदेत मांडेन."
(ही बातमी People's Archive of Rural India वरून परवानगीने इथे प्रकाशित करण्यात येत आहे.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








