लोकसभा 2019 : पुणे मतदारसंघात ब्राह्मण उमेदवारांत थेट लढत असेल तर काँग्रेसचाच उमेदवार जिंकतो - मोहन जोशी

मोहन जोशी आणि गिरीश बापट

फोटो स्रोत, facebook

    • Author, हलिमाबी कुरेशी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

पुण्यातून अखेर काँग्रेसच्या उमेदवाराची प्रतीक्षा संपली, काँग्रेसचे निष्ठावंत मोहन जोशी यांना उमेदवारी देण्यात आली. १९७२ पासून मोहन जोशी काँग्रेस मध्ये आहेत. युवा काँग्रेसपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली आहे. 

गेल्या ४० वर्षांपासून पुणे काँग्रेसमध्ये विविध पदं त्यांनी भूषविली आहेत. लोककलावंत सुरेखा पुणेकर देखील येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. तसंच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मागील आठवड्यात माघार घेतली. त्यामुळे अरविंद शिंदे की मोहन जोशी यापैकी कुणाला मिळेल याबाबत उत्सुकता होती.

'पुणे कट्टा' या उपक्रमात सर्वच इच्छुक एकत्र आले होते, तिथेच भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती.

त्यामुळे पुण्यातून काँग्रेसचा उमेदवार कोण यात चुरस निर्माण झाली होती. मात्र खासदार काकडेंची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली आणि काकडे भाजपमध्येच थांबले. पुणे महापालिकेचे गटनेते अरविंद शिंदे आणि मोहन जोशी यांच्यात शेवटच्या टप्प्यात स्पर्धा होती.

"पुणे लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा प्रभाव राहिला आहे. एकूण १६ पैकी ११ लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. त्यात ब्राह्मण उमेदवाराविरूद्ध ब्राह्मण उमेदवार या सामन्यात काँग्रेसचा उमेदवार जिंकला आहे," असं मोहन जोशी यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

पुणे कट्टा कार्यक्रम
फोटो कॅप्शन, पुणे कट्टा कार्यक्रमाला मोहन जोशी उपस्थित होते.

मोहन जोशी यांना उमेदवारी मिळण्याची प्रमुख कारणं काय असू शकतात याचं विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे करतात.

"भाजपचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांची लढत चुरशीची होईल, जातीय समीकरणं बाजूला ठेवून काँग्रेसने उमेदवारी दिली, भाजपाचा ब्राह्मण उमेदवार असतानाही ब्राह्मण उमेदवाराला काँग्रेसने उमेदवारी दिली. पक्षाशी असलेली निष्ठा, सामाजिक स्थान याचाही विचार केला गेलाय. विधान परिषदेच्या कार्यकाळात पानशेत पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर त्यांनी चांगलं काम केलं होतं," असं मत ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी व्यक्त केलं. 

मोहन जोशी यांची कारकीर्द: 

१९८७ साली मोहन जोशी महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे अध्यक्ष होते. तर १९९७ ते २००५ च्या दरम्यान त्यांनी पुणे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती.

२००८ ते २०१४ दरम्यान ते विधानपरिषदेचे आमदार राहिले आहेत. १९९९ साली लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रदीप रावत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विठ्ठल तुपे आणि काँग्रेसचे मोहन जोशी अशी तिरंगी लढत झाली होती. या निवडणुकीत मोहन जोशी यांनी २ लाख ३ हजार मतं मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

मोहन जोशी

फोटो स्रोत, Mohan Joshi/ Facebook

मोहन जोशी यांची पक्षनिष्ठा त्यांना फायद्याची ठरली असं जाणकार सांगतात.

"महाराष्ट्रातील काँग्रेसची निष्ठावान घराणी भाजपाच्या वाटेवर गेली असताना, निष्ठा या मुद्द्यावर मोहन जोशी यांना संधी मिळाली," असं पुण्यातील वरिष्ठ पत्रकार जितेंद्र अष्टेकर यांनी सांगितलं. पुणे काँग्रेसमध्ये असलेले गटतट एकत्र आणण्याचं आव्हान जोशींच्या समोर असल्याचं जितेंद्र अष्टेकर म्हणाले. 

पुणे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह 

काँग्रेस निष्ठावंताला उमेदवारी मिळाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत, आम्ही निवडणुकीला तयार असून काँग्रेस अंतर्गत असलेले गटतट विसरून सगळे एकत्र येऊ," अशी प्रतिक्रिया पुणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी दिली. 

निष्ठावान कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्याने महाराष्ट्रात सकारात्मक संदेश गेल्याचं मोहन जोशी यांनी सांगितलं.

अरविंद शिंदे आणि माझ्यातही दुरावा नाही. मला उमेदवारी जाहीर झाल्याची घोषणा शिंदे यांनी केली. सर्व मतभेद विसरून आम्ही कामाला लागलो आहोत, असं जोशी सांगतात.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. २०१४ साली पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे अनिल शिरोळे विक्रमी मतांनी निवडून आले होते. त्यांना ५ लाख ६९ हजार ८२५ मते मिळाली होती.

तर काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांना २ लाख ५४ हजार ५६ मते मिळाली होती. तर विधानसभेच्या आठही जागा भाजपाने जिंकल्या, पुणे महानगरपालिकेत देखील भाजप बलाढ्य पक्ष ठरला आहे. 

मोहन जोशी

मात्र पुण्यातील मतांचा पॅटर्न बदलला असल्याचं अष्टेकर यांनी सांगितलं. पुणे मेट्रो सिटी होत असून, आयटी क्षेत्राचा मोठा विस्तार, शिक्षण नोकरीच्या संधी, उपनगरे, उत्तर भारतीय, दाक्षिणात्य मतदारांची वाढती संख्या या बदलेल्या मतांच्या पॅटर्नचा प्रभाव या निवडणुकीवर होऊ शकतो. 

भाजपच्या अनिल शिरोळे यांना उमेदवारी नाकारली गेल्याने काही लोक दुखावले असून त्याचा काँग्रेसला फायदा होऊ शकतो.

तसंच प्रवीण गायकवाड यांच्या पाठिंब्याचा फायदा काँग्रेसला होईल, उपनगरात राष्ट्रवादीच्या प्रभावाचाही फायदा होईल, असा अंदाज ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी वर्तविला. 

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)