पुणे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मोहन जोशी लढणार #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Facebook/Mohan Joshi
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात:
1. मोहन जोशी पुण्यातून काँग्रेसचे उमेदवार
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा पुण्यातून कुणाला तिकिट देणार याविषयी दिवसांपासून चर्चा सुरू होती. या चर्चांना पूर्णविराम देत काँग्रेसने मोहन जोशी यांना तिकीट दिलं आहे, असं वृत्त लोकसत्ताने दिलं आहे.
चर्चेत असलेल्या चेहऱ्यांना उमेदवारी न देता काँग्रेस नेतृत्वाने वेगळ्याचा नावाची निवड केली आहे. माध्यमात आणि जनसामन्यात चर्चेत असलेल्या सुरेखा पुणेकर, प्रविण गायकवाड आणि अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र गेल्या 40 वर्षांपासून काँग्रसचे निष्ठावान कार्यकर्ते असलेल्या दादांनाच काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे.
भाजपकडून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे रिंगणात आहेत. पुण्यात मतदान तिसऱ्या टप्प्यात, म्हणजे 23 एप्रिल रोजी होत आहे.
मोहन जोशी यांनी काही काळ पत्रकारिता केली आहे. याआधी त्यांनी पुणे युवा काँग्रस आणि महाराष्ट्र युवा काँग्रसचं अध्यक्षपद भूषवलं आहे तसंच 1999 आणि 2004 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली आहे.
2. नमो टीव्ही विरोधात केजरीवाल यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
नमो टीव्ही विरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे समन्वयक केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. याबाबतची बातमी NDTV च्या वेबसाईटने दिली आहे.
गेल्याच आठवड्याच लॉन्च झालेलं नमो टीव्ही हे चॅनल पंतप्रधानांची भाषणं तसंच त्यांच्या सभा यांना सविस्तर वृत्तांकन करतं. याविरोधात केजरीवालांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून म्हटलं आहे की हा आचारसंहितेचा भंग आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि 'सामना' वृत्तपत्राला नोटीस बजावली आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
31 मार्चच्या सामना वृत्तपत्रात रोखठोक या सदरात एक लेख होता, ज्यामध्ये EVMवर संशय व्यक्त करण्यात आला होता. यावरच आक्षेप घेत निवडणूक आयोगाने ही नोटीस बजावली आहे. आचारसंहिता सुरू असताना वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख या नोटीशीत करण्यात आला आहे.
या पूर्वीही 2017 मध्ये 'सामना'वर तात्पुरती बंदी घालावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली होती. भाजपने केलेल्या मागणीनंतर राज्य निवडणूक आयोगाने 'सामना'ला नोटीस बजावली होती.
3. काश्मीरमध्ये वेगळा PM या विधानावरून मोदींचा ओमर अब्दुलांवर हल्ला
जम्मू आणि काश्मीरचा वेगळा पंतप्रधान आणि राष्ट्रपती असेल अशी व्यवस्था आम्हाला पुन्हा एकदा प्रस्थापित करायची आहे, असे जाहीर वक्तव्य करणारे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार शब्दांत हल्ला चढवला.
याविषयीची बातमी News18च्या वेबसाईटने दिली आहे.
'नॅशनल कॉन्फरन्स' हा महागठबंधनच्या सूत्रधारांपैकी एक प्रमुख पक्ष आहे. फारूख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यांची खासगी कंपनी असलेल्या या पक्षाला जम्मू-काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान हवा आहे, असं मोदी यांनी नमूद करताना "काँग्रेसच्या मित्रपक्षाची ही मागणी तुम्हाला मान्य आहे का?" असा सवाल मोदींनी सभेत लोकांपुढे मांडला.
दुसरीकडे, पंतप्रधांनांचं माझ्या भाषणाकडे एवढं लक्ष असतं, हे पाहून मी भारावून गेलो आहे, असा टोमणा ओमर अब्दुल्ला यांनी मारला.

दुसरीकडे मोदी माझ्यासमोर पाच मिनिटेही टिकणार नाहीत, असं विधान खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी केलं आहे. याविषयीची बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांसाठी पुन्हा एकदा हिंदुत्वाचे कार्ड बाहेर काढलं आहे. त्यांनी आपल्या भाषणात हिंदू-मुस्लीम भाषा वापरणं योग्य नाही," अशी टीका ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (MIM) अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांनी केली.

"संविधान कमजोर करण्याचे सर्वाधिक काम हे गेल्या पाच वर्षांतच झाले आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पत्रपरिषद घेऊन देशाचे संविधान आणि लोकशाही वाचविण्याचं आवाहन करावं लागतं, हे देशाचं दुर्भाग्य आहे. अशा परिस्थितीत मोदी द्वेष पसवित आहेत. मोदी दहशतवाद संपविण्याची भाषा करतात. मात्र, नथुराम गोडसे दहशतवादी होता, हे कधीच मान्य करीत नाहीत. सावरकर हेसुद्धा गांधी हत्येत सहभागी होते, असे कपूर आयोगाद्वारे नमूद करण्यात आले आहे. मात्र याबाबत मोदी भाष्य करीत नाहीत. मोदींनी माझ्याशी चर्चा करावी, ते पाच मिनिटेसुद्धा टिकाव धरणार नाहीत," असंही ते पुढे म्हणाले.
4. पाकिस्तानच्या चार F-16 विमानांचा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न
पाकिस्तानच्या चार F-16 आणि एक मोठ्या आकाराचं UV या विमानांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला आहे, याविषयीचं वृत्त ABP माझाच्या वेबसाईटने दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे 3 वाजता पाकिस्ताने पंजाबच्या खेमकरण सेक्टरमध्ये चार F-16 लढाऊ विमानं घुसवण्याचा प्रयत्न केला.

फोटो स्रोत, Getty Images
याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाच्या सुखोई आणि मिराज विमानांनी उड्डाण घेतलं. भारतीय विमानं आपल्या दिशेने येताना पाहून पाकिस्तानी विमानं मागे फिरली.
5. निवडणूक आयोग आता खुर्च्या मोजणार
निवडणूक आयोगाने उमेदवारांवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. आयोग आता उमेदवारांच्या जाहीर सभा, मेळावे, कार्यालय यासह प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या खुर्च्यांची मोजदाद करत असल्याची बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रचारात लागणारी साधनं, वस्तू, उपकरणं वा इतर अनुषंगिक खर्चाचे दर निश्चित केले आहेत. त्यासंबंधीची दरसूचीही प्रत्येक उमेदवाराला देण्यात आली आहे. त्याप्रमाणेच खर्च होतो आहे की नाही, हे पाहाण्यासाठी निवडणूक आयोगाने ही मोहीम हाती घेतली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








