एव्हरेस्टवर वितळत चाललेल्या हिमनद्यांमुळे दिसू लागले आहेत मृतदेह

पर्यावरण, माऊंट एव्हरेस्ट

फोटो स्रोत, frank bienewald

फोटो कॅप्शन, माऊंट एव्हरेस्ट
    • Author, नवीन सिंह खडका
    • Role, पर्यावरण प्रतिनिधी, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टवर हिमनद्या वितळत असल्याने पर्वतावर गाडले गेलेले मृतदेह उघडे पडू लागले आहेत. यातले बहुतांश मृतदेह गिर्यारोहकांचे असल्याने गिर्यारोहणाच्या मोहिमा आखणारे टूर ऑपरेटर्स काळजीत पडले आहेत.

एव्हरेस्टवर पहिल्यांदा यशस्वी चढाई झाली तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 300 गिर्यारोहकांचा चढाईदरम्यान मृत्यू झाला आहे. यातील दोन तृतियांश मृतदेह अजूनही बर्फाखाली गाडले गेले आहेत.

एव्हरेस्टच्या चीनकडील भागात सध्या वसंत ऋतूतील गिर्यारोहण मोहिमा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे त्या बाजूने हे मृतदेह खाली आणण्याचे काम सुरू झाले आहे.

आजतागायत 4,800 हून जास्त गिर्यारोहकांनी जगातील हे सर्वात उंच शिखर सर केले आहे.

"जागतिक तापमानवाढीमुळे एव्हरेस्टवरील बर्फाची चादर आणि हिमनद्या वेगाने वितळू लागल्या आहेत आणि इतकी वर्ष या बर्फाखाली गाडले गेलेले मृतदेह उघडे पडू लागले आहेत", असे नेपाळ माउंटेनिअरिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष अँग शेरिंग शेर्पा यांनी सांगितले.

"गेल्या काही वर्षात मृत्यू झालेल्या काही गिर्यारोहकांचे मृतदेह आम्ही खाली आणले आहेत. मात्र अनेक वर्षांपासून बर्फात पुरले गेलेले मृतदेह आता दिसू लागले आहेत."

एव्हरेस्टवर लायझनिंग अधिकारी म्हणून काम करणारे सरकारी अधिकारी सांगतात, "गेल्या काही वर्षात मी स्वतः एव्हरेस्टच्या वेगवेगळ्या भागातून जवळपास दहा मृतदेह बाहेर काढले आहेत आणि आता तर अधिकाधिक मृतदेह दिसत आहेत."

पर्यावरण, माऊंट एव्हरेस्ट

फोटो स्रोत, Doma Sherpa

फोटो कॅप्शन, हिमनद्या वितळू लागल्याने गिर्यारोहकांचे मृतदेह हाती लागले आहेत.

पर्वतारोहणाच्या या हंगामात एव्हरेस्ट आणि ल्होत्से शिखरावरील कॅम्पवरचे दोरखंड खाली आणण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र मृतदेहांना खाली आणणे सोपे नाही, असे एक्सपेडिशन ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ नेपाळचे (EOAN) अधिकारी सांगतात.

मृतदेह खाली आणायचे असेल तर नेपाळच्या कायद्यानुसार या कामात सरकारी संस्थांना सहभागी करून घ्यावे लागते आणि या संस्थांना सहभागी करून घेणे जिकीरीचे आहे.

"सरकार आणि पर्वतारोहण उद्योग दोघांनीही हा मुद्दा गांभीर्याने घ्यायला हवा", असे EOANचे अध्यक्ष दाम्बर पाराज्युली म्हणतात.

"हे तिबेटकडील एव्हरेस्टवर होऊ शकते तर आपणही करू शकतो." असं त्यांचं मत आहे.

उघडे पडलेले मृतदेह

2017 साली कॅम्प-1वरील जमिनीतून एका मृतदेहाचा हात बाहेर आला होता.

शेर्पा समुदायातील व्यावसायिक गिर्यारोहकांना पाठवून तो मृतदेह बाहेर काढल्याची माहिती पर्वतारोहण मोहिमा आखणाऱ्या टूर ऑपरेटर्सने दिली.

त्याचवर्षी खुंबू प्रदेशात आणखी एक मृतदेह दिसला.

पर्यावरण, माऊंट एव्हरेस्ट

फोटो स्रोत, C. SCOTT WATSON/UNIVERSITY OF LEEDS

फोटो कॅप्शन, हवामान बदलामुळे हिमनद्या वितळू लागल्या आहेत.

एव्हरेस्टवरील या खुंबू प्रदेशात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर मृतदेह उघडे पडत असल्याचे गिर्यारोहक सांगतात.

याशिवाय कॅम्प-4 भागातही मोठ्या प्रमाणावर मृतदेह बाहेर येत आहेत. हा पर्वतावरचा त्या तुलनेत सपाट असा भाग आहे. त्याला साऊथ कोलही म्हणतात.

"बेस कॅम्पच्या परिसरातही गेल्या काही वर्षात मृतदेहांचे हात आणि पाय दिसत आहेत", अशी माहिती या परिसरात सक्रीय असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीने दिली.

"बेस कॅम्पमधील आणि आजूबाजूच्या परिसरातील बर्फ वितळत आहे आणि म्हणूनच हे मृतदेह दिसू लागलेत."

आकसणाऱ्या हिमनद्या

हिमालयातील अनेक हिमनद्या वेगाने आकसत असल्याचे अनेक अभ्यासामधून दिसून आले आहे.

एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी खुंबू हिमनदी ओलांडावी लागते. मात्र या हिमनदीतील तळी मोठी होत असून ती एकमेकांशी जोडली जात आहेत, असे 2015 साली करण्यात आलेल्या एका अभ्यासात समोर आले आहे.

2016 साली एव्हरेस्टजवळील इम्जा सरोवरातील पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत वाढले होते. त्यामुळे नेपाळच्या सैन्याच्या मदतीने हे पाणी काढण्यात आले होते.

गेल्या वर्षी ब्रिटनच्या लीड्स आणि अॅबरिस्विथ विद्यापीठातील संशोधकांच्या एक चमूने खंबू ग्लेशिअरचा दौरा केला होता. त्यावेळी या ग्लेशिअरमधील बर्फ अपेक्षेपेक्षा जास्त गरम असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.

त्यावेळी बर्फाचे तापमान केवळ -3.3 अंश सेल्सिअस होते. इतकेच नाही तर तेथील सर्वात थंड बर्फाचे तापमान हे मीन अॅन्युअल एअर टेम्परेचर म्हणजेच जमिनीखालील तापमानापेक्षा (कुठलाही बाह्य हस्तक्षेप नसल्यास हे तपामान वर्षभर जवळपास सारखंच असते) तब्बल दोन अंश जास्त होते.

बर्फाखाली गाडले गेलेले मृतदेह वर येण्यामागे केवळ हिमनद्या वितळणे हे एकमेव कारण नाही. तर खुंबू ग्लेशिअर सरकत चालल्यानेही हे मृतदेह दिसू लागले आहेत.

"खुंबू ग्लेशिअर सरकत असल्यानेही वेळोवेळी आपल्याला मृतदेह दिसत असतात", अशी माहिती नेपाळच्या नॅशनल माउंटेन गाईड्स असोसिएशनचे शेरिंग पांडे भोटे यांनी दिली आहे.

"मात्र अशी काही दृश्य दिसतील, याची अनेक गिर्यारोहकांना माहिती असते आणि त्यांच्या मनाची तशी तयारीही असते."

मृतदेह ठरत आहेत 'लँडमार्क'

एव्हरेस्टच्या वरच्या भागात दिसणारे मृतदेह हे गिर्यारोहकांसाठी लँडमार्क्स ठरू लागले आहेत.

समिटजवळ असेच एक ठिकाण आहे. त्याला 'ग्रीन बुट्स' म्हणतात.

येथील एका खडकाखाली एका गिर्यारोहकाचा मृत्यू झाला होता. त्याच्या पायातले त्याचे हिरवे बूट आजही गिर्यारोहकांना मार्ग दाखवतात.

पर्यावरण, माऊंट एव्हरेस्ट

फोटो स्रोत, ANG TASHI SHERPA

फोटो कॅप्शन, गिर्यारोहकांचे मृतदेह हाती लागले आहेत.

काही गिर्यारोहकांच्या मते तो मृतदेह नंतर काढण्यात आला. मात्र तो मृतदेह अजूनही दिसतो का, याची ठोस माहिती आपल्याकडे नसल्याचे नेपाळच्या पर्यटन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

वरच्या कॅम्प परिसरात मृतदेहांचा शोध घेणे आणि त्यांना खाली आणणे, दोन्ही खूप खर्चिक आणि कठीण कार्य आहे.

मृतदेह खाली आणण्यासाठी चाळीस ते ऐंशी हजार डॉलरपर्यंत खर्च येतो.

NMA चे माजी अध्यक्ष अँग शेरिंग शेर्पा म्हणतात, "समिटजवळून म्हणजे जवळपास 8,700 मीटर उंचीवरून एक मृतदेह खाली आणण्यात आला होता. ती आतापर्यंतची सर्वात आव्हानात्मक मोहीम होती."

"तो मृतदेह पूर्णपणे थिजला होता आणि त्याचे वजन 150 किलो होते. अतिशय खडतर ठिकाणाहून तो मृतदेह काढण्यात आला होता."

पर्वतावर मृतदेहाचे काय करायचे, ही अत्यंत खाजगी बाब असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

गिर्यारोहणावर बरंच लिखाण करणारे एक प्रसिद्ध गिर्यारोहक अॅलन आर्नेट म्हणतात, "गिर्यारोहण करताना मृत्यू आला तर आपल्याला पर्वतावरच राहू द्यावे, अशी अनेक गिर्यारोहकांची इच्छा असते."

"त्यामुळे त्यांची स्वतःची किंवा त्यांच्या कुटुंबीयांची तशी इच्छा असल्याखेरीज एखाद्या गिर्यारोहकाचा मृतदेह पर्वतावरून खाली आणणे, हा त्यांचा अनादर ठरू शकतो."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)