पार्थ पवार यांच्या उमेदवारीचा राष्ट्रवादी काँग्रेसला कितपत फायदा होणार?

शरद पवार-अजित पवार

फोटो स्रोत, FACEBOOK/ParthPawar

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार, हे आता स्पष्ट झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवीन पिढीला संधी देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं.

"एकाच कुटुंबातून किती जणांनी निवडणूक लढवायची याबद्दल आम्ही चर्चा केली. माझी राज्यसभेची मुदत शिल्लक आहे. त्यामुळे स्वतः निवडणुकीला उभा न राहता नव्या पिढीतले जे लोक काम करताहेत त्यांना संधी द्यावी असा निर्णय मी घेतला," असं शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

"गेल्या सहा महिन्यांपासून पार्थ पवार यांनी मावळ मतदार संघ पिंजून काढलाय. तरुण कार्यकर्त्यांनी पार्थ पवार यांच्या नावाची शिफारस करण्याविषयी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार शेतकरी कामगार पक्षाने शरद पवार यांना त्यासंबंधी सांगितलं. शरद पवार यांनी या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता," असं शेकापचे राज्य अध्यक्ष जयंत पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

पार्थ यांना उमेदवारी मिळाल्यानं आई म्हणून आनंद झाला. त्याला ज्याची आवड होती, जे काम करायचं होतं तेच मिळालं, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

पवार घराण्यातील तिसरी पिढी

पार्थ पवार यांच्या रुपानं पवार घराण्यातली तिसरी पीढी राजकारणात येत आहे. 28 वर्षांचे पार्थ पवार हे अजित पवार यांचे पुत्र आहेत. वाणिज्य शाखेतील पदवी घेतल्यानंतर त्यांनी लंडनमधून बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

पार्थ पवार

फोटो स्रोत, FACEBOOK/ParthPawar

गेल्या दीड वर्षांपासून ते अजित पवार यांच्या सोशल मीडियाचं व्यवस्थापन पाहात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील ते सहभागी झाले होते.

"आज नाही तर उद्या मी राजकारणात येणार याची मला कल्पना होती. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर मी आजीला आणि वडिलांना भेटलो नाहीये. मला सर्वांना भेटायचं आहे," अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी बीबीसी मराठीला दिली.

'राष्ट्रवादीसाठी पार्थ यांची उमेदवारी फायद्याची'

"गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही मावळ मतदारसंघातून हरलो होतो. 2014 च्या निवडणुकीत तर आम्हाला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. त्यामुळे यावेळी तरुण उमेदवार दिल्यानंतर तरुणाईचा पाठिंबा आम्हाला निश्चित मिळेल," असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केला.

"एकाच कुटुंबातून किती जणांनी निवडणूक लढायची हा प्रश्न आहे. त्यामुळे नवीन नेतृत्वाला संधी द्यायला हवी, असं मत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं होते. त्यांनी त्याप्रमाणेच निर्णय घेतला," असंही नवाब मलिक यांनी म्हटलं.

"पार्थ पवार गेल्या सहा महिन्यांपासून मावळच्या सर्व भागात फिरले आहेत. विविध कार्यक्रम, स्थानिक नेत्यांशी भेटींच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे. याचा पार्थ यांना फायदा होऊ शकतो," असं मत मावळमधील लोकमतचे प्रतिनिधी विजय सुराणा यांनी व्यक्त केला.

पार्थ पवार

फोटो स्रोत, FACEBOOK/ParthPawar

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. रायगडमधील पनवेल, उरण आणि कर्जत तर पुण्यातील मावळ, पिंपरी आणि चिंचवडचा समावेश मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये होतो. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बऱ्यापैकी प्रभावी आहे, तर रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला होता.

पार्थ पवार यांना शेकापचा पाठिंबा असल्यानं यंदाच्या लोकसभेसाठी राष्ट्रवादीचं पारडं निश्चित जड होऊ शकतं.

"मावळमध्ये पवार घराण्यातील उमेदवार देणं हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी निश्चितच फायद्याचं ठरू शकेल. या भागात राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजी आहे. मात्र पवार कुटुंबातील उमेदवार असल्यानं सर्वच जण एकत्र येऊन काम करणार. पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी याचा निश्चित फायदा होईल," असं मत ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार यांनी व्यक्त केलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)