पुलवामा : अभिनंदन यांच्या सुटकेबाबत मृत्युमुखी पडलेल्या जवानांचे कुटुंबीय काय म्हणतात?

सीआरपीएफ जवान

फोटो स्रोत, Getty Images

भारतीय हवाईदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची पाकिस्तानातून सुटका झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं नवं सत्र सुरू झालं आहे.

दोन दिवसांमध्ये अभिनंदन वर्तमान परतल्याचं श्रेय भाजपाचे समर्थक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देत आहेत. तर जहालवाद्यांविरोधात आणखी पावलं उचलावीत अशी मागणी विरोधी पक्ष करत आहेत.

मात्र पुलवामा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांचे कुटुंबीय या राजकारणामुळे दुःखी झाले आहेत.

बीबीसीने पंजाबपासून बिहार आणि उत्तर प्रदेशपर्यंत पुलवामा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांचं या स्थितीवर मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

निवडणुकीपुर्वी तपास व्हावा

उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये राहाणारे रंजीत कुमार गौतम यांचे मोठे भाऊ अजित कुमार गौतम यांचा पुलवामा हल्ल्यात मृत्यू झाला.

पुलवामा हल्ल्यात मारले गेलेले सीआरपीएफ जवान अजीत कुमार गौतम

फोटो स्रोत, SAMIRATMAJ MISHRA/BBC

फोटो कॅप्शन, पुलवामा हल्ल्यात मारले गेलेले सीआरपीएफ जवान अजीत कुमार गौतम

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन परतल्यामुळं आम्हाला त्याचा आनंद झाला आहे. मात्र पुलवामा घटनेचा तपास पूर्ण होण्याची आम्ही वाट पाहात आहोत असं ते म्हणाले.

बीबीसीचे समीरात्मज मिश्र यांच्याशी बोलताना ते म्हणाले, "या घटनेचा तपास झाला पाहिजे आणि राजकीय पक्षांनी त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये.

ते म्हणाले, "हा हल्ला कसा झाला, कोणी केला याचा तपास झाला पाहिजे. तो निवडणुकीच्या आधी झाला नाही तर त्याचं श्रेय एखाद्या व्यक्तीला मिळेल किंवा एखाद्या राजकीय पक्षाला मिळेल."

ते म्हणाले, "या घटनेच्या तपासाची मागणी आमच्या कुटुंबानं केलं आहे. आधीपासून या हल्ल्याचा इशारा मिळाला होता हे सगळ्यांना माहिती आहे. त्या दिवशी जम्मू बंद होतं असंही आम्ही ऐकलं. याचा अर्थ आधीपासूनच इथं काहीतरी होणार हे निश्चित होतं. तरीसुद्धा संरक्षणाविना तिथं एवढ्या सगळ्या गाड्या पाठवण्यात आल्या."

'कायमस्वरुपी शांततेसाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत'

भारत सरकारने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शांततेच्या संदेशावर विचार करून संपूर्ण प्रदेशात कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रत्येक प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

असं मत पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सुखजिंदर सिंह यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलं. तसेच पुलवामा दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली.

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सीआरपीएफ जवानांमध्ये सुखजिंदर सिंह यांचाही समावेश होता.

त्याचं गाव तरनतारनपासून २० किलोमीटर अंतरावर गंढीविंड धॉतल हे आहे.

सुखजिंदर सिंह यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, एक आठ महिन्यांचा मुलगा, आई-वडिल आणि एक मोठा भाऊ आहे.

जवानाचे कुटुंबीय

फोटो स्रोत, RAVINDER SINGH ROBIN/BBC

सुखजिंदर सिंह यांचे भाऊ गुरजंट बीबीसीचे सहकारी रबिंदर सिंह रॉबिन यांच्याशी बोलताना म्हणाले, "माझा लहान भाऊ पुलवामा दहशतवादी हल्ल्यात मारला गेल्याचं समजल्यापासून युद्ध सुरू झाल्यासारखं वाटलं होतं. युद्ध काय असतं हे आमच्या कुटुंबाला माहिती आहे. इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची मुक्तता करून भारतासाठी एक शांततेचा संदेश दिला आहे. मला वाटतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या या शांतता संदेशाला समजून घ्यावं आणि शांतता प्रक्रिया पुढे न्यावी."

त्यांचे वडील गुरमेज सिंह शेती करतात. ते म्हणाले, प्रत्येक माणसाची विचार करण्याची आपापली पद्धत असते. मी जरी या दहशतवादी हल्ल्यात माझा मुलगा गमावला असला तरी भविष्यात कोणाच्याही कुटुंबातला माणूस दहशतवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडावा असं मला वाटत नाही. शांततेला शांततेनं उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं.

सरकार आणि सीआरपीएफ आपली पूर्ण काळजी घेत असल्याबद्दल सुखजिंदर यांच्या परिवारानं समाधान व्यक्त केलं.

पुलवामा

फोटो स्रोत, Getty Images

युद्धावर बोलताना गुरजंट सिंह म्हणतात, "आम्ही गाव-खेड्य़ात राहणारी माणसं आहोत. त्यातलं आम्हाला फारसं कळत नाही. पण घरात झालेलं भांडण निस्तरण्यासाठीही मोठं नुकसान होतं आणि हे तर दोन देशांमधलं भांडण आहे, विचार करा त्यामुळं किती नुकसान आपल्याला सहन करावं लागेल?"

आपल्या भावाच्या मृत्यूमुळं दुःखात असलेले गुरजंट सिंह म्हणाले, "आज त्यांनी आपले 40 मारले म्हणजे आपण त्यांचे 400 लोक मारू, उद्या ते आपले 800 मारतील आणि आपण त्यांचे 8 हजार लोक मारू. आणखी किती घरं उद्ध्वस्त् होतील.. हे सगळं बंद झाल पाहिजे."

पाकिस्तानला शिव्या देणं अयोग्य

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये पुलवामा हल्ल्याच्या तपासाचा मुद्दा विरून जाण्यामुळे या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजय यांचे वडील अत्यंत दुःखी झाले आहेत.

संजय यांची शोकाकुल पत्नी शकुंतला

फोटो स्रोत, NEERAJ PRIYADARSHI/BBC

फोटो कॅप्शन, संजय यांची शोकाकुल पत्नी शकुंतला

बीबीसीचे सहकारी नीरज प्रियदर्शी यांना संजय यांचे वडील महेंद्र प्रसाद म्हणाले, "हे सर्व पाहून दुःख होतं. चांगलं काहीच घडताना दिसत नाही. अशा घटना कमी होण्याऐवजी वाढत चाललेल्या दिसतात. सरकारचं यावर लक्ष तर आहे पण पूर्ण लक्ष नाही. जेव्हा हल्ला होतो तेव्हा हे लोक त्याचा सामना करतात पण नंतर विसरून जातात. परत एखादा हल्ला होतो. मात्र आता सरकारनं यावर गांभीर्यानं विचार करायला हवा. हे सर्व समूळ नष्ट करावं अशी माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे."

"ज्या प्रकारे हवाईदलानं आणि लष्करानं हल्ला करून जहालवाद्यांची प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केली तशा कारवाया आणखी व्हायला हव्यात. पूर्ण पाकिस्तानात जिथं-जिथं अशी प्रशिक्षण केंद्रं आहेत ती सगळी नष्ट करायला हवीत."

युद्ध झाल्यावर पुन्हा एखाद्या पित्याला आपल्या मुलाला गमवावं लागू शकतं असं महेंद्र प्रसाद यांना सांगितल्यावर ते म्हणाले

हो. तसं होईल. पण दुसरा उपायच काय आहे? पाकिस्तान तर ऐकत नाही. तडजोड करायला ते तयार नाहीत. ते तिथून दहशतवाद संपवताना दिसत नाही. आणि शहीद होण्याबद्दल बोलायचं झालं तर तसेही आमची मुलं शहीद होतंच आहेत मग त्यांना मारुन शहीद होणं चांगलंच."

पण लगेच स्वतःला थोडसं सावरून महेंद्र प्रसाद म्हणाले, " आता का बोलायचं? पाकिस्तानसुद्धा आपलाच भाग आहे. (पाकिस्ताननं) भारताबरोबर मिळून मिसळून राहावं. एका भावानं दुसऱ्या भावाला समजून घेतलं पाहिजे. जे लोक पाकिस्तानच्या बाबतीत उलटसुलट बोलत आहेत, शिव्या देत आहेत ते चूक आहेत. काही लोक अफवाही पसरवत आहेत. पण एका देशाचे नागरिक म्हणून दुसऱ्या देशाबद्दल तितक्याच सन्मानपूर्वक दृष्टीनं पाहिलं पाहिजे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)