Asaduddin Owaisi: काश्मिरी तरुणांचं कट्टरतावादाकडे वळणं, हे भाजपचं अपयश

असदउद्दीन ओवैसी

फोटो स्रोत, FACEBOOK/ASADUDDIN OWAISI

फोटो कॅप्शन, असदउद्दीन ओवैसी
    • Author, गुरप्रीत सैनी
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

काश्मिरमध्ये तणावाची परिस्थिती असताना राजकीय प्रचार करत असल्याबद्दल विरोधक भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहेत. AIMIMचे नेते आणि खासदार असदउद्दीन ओवेसी यांनीही या मुद्द्यावर केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.

याबरोबरच त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही टीका केली. "आमच्याकडे अणुबाँब आहे, असं इम्रान खान म्हणतात. पण मग आमच्याकडे नाहीये का? आम्हाला सांगण्याऐवजी त्यांनी 'जैश-ए-शैतान' आणि 'लष्कर-ए-शैतान'चा बंदोबस्त करावा," असंही ओवैसी आपल्या पक्षाच्या 61व्या स्थापना दिनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.

भारतीय वायुदलातील विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची भारतात सुखरूप परतणं, हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं यश असल्याचा भाजपचा दावा आहे. मात्र काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि अन्य विरोधक भाजपवर टीका करत आहेत.

देशाच्या वीर सैनिकांच्या बलिदानाचं कुणी राजकारण करणार असेल तर आम्ही त्याचा पूर्णपणे विरोध करू, असं ओवेसी यांनी हैदराबादमध्ये म्हटलं.

पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील चिघळलेल्या संबंधांवर जे राजकारण सुरू आहे, त्याबद्दल बीबीसी हिंदीनं असदउद्दीन ओवेसी यांच्याशी संवाद साधला.

प्रश्नः इम्रान खान जैशबद्दल काहीच का बोलत नाहीत?

कट्टरतावादाबद्दल पाकिस्तान सरकारची भूमिका खूप निवडक आहे. त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मसूद अझहर पाकिस्तानमध्येच असल्याचं म्हटलं होतं.

मग त्याला अटक का करण्यात येत नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी म्हटलं, की "पुरेसा पुरावा दिला तर त्याच्या विरोधात नक्की कारवाई करू."

मसूद अझहरच्या संघटनेवर (जैश-ए-मोहम्मद) संयुक्त राष्ट्राने बंदी घातली आहे. हाच सर्वांत मोठा पुरावा आहे. मात्र त्याबद्दल ते काहीच बोलत नाहीत.

इमरान खान

फोटो स्रोत, Getty Images

लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफीज सईदवर बक्षीस ठेवण्यात आलं आहे. या संघटनेवरही बंदी घालण्यात आलीये. याशिवाय तिथे लखवी पण आहे.

आता इम्रान खानला यापैकी काहीच दिसत नाही, यात काही विशेष नाही. इम्रान या सगळ्यांना पाठीशी घालत आहेत, हेच यातून स्पष्ट होतंय.

प्रश्नः पुलवामा हल्ल्यामागची तुमच्या मते कारणं काय असावीत?

पुलवामा हल्ल्याशी संबंधित एका व्हीडिओमध्ये हल्लेखोरानं तो कोणत्या कट्टरतावादी संघटनेचा सदस्य आहे, हे सांगितलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं आली कुठून आणि याला जबाबदार कोण आहे, याचा विचार पंतप्रधानांनी करणं आवश्यक आहे.

पुलवामा हल्ला

फोटो स्रोत, Getty Images

पुलवामा हल्ला हे राजकीय अपयशही आहे, कारण सध्या तिथं राज्यपालांची राजवट लागू आहे. याआधी भाजप आणि PDPचं सरकार होतं.

या सरकारनं काही काम केलंच नाही. जर सरकारनं काम केलं असतं तर काश्मीर खोऱ्यातील तरुण एवढ्या मोठ्या संख्येनं कट्टरतावादाकडे वळलेच नसते.

प्रश्नः चीन मसूद अझहरला पाठीशी का घालत आहे?

चीन मौलाना मसूद अझहरला ब्लॅकलिस्ट करायला तयार नाहीये, हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं अपयश आहे.

भारतानं वुझेन इथल्या संमेलनात भाग घेतला. चीनचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले होते, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना अहमदाबादमध्ये झोपाळा झुलवला होता. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.

प्रश्नः काश्मिरी युवकांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल?

काश्मिरी तरुणांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी अनेक गोष्टी करता येतील. यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशासनात सुधारणा घडवून आणणं.

जेव्हा पेलेट गनचा वापर केला होता आणि अनेक तरुणांना अंधत्व आलं होतं तेव्हा मी काश्मीरला गेलो होतो. राजनाथ सिंह यांच्यासोबत एका सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळासोबत मी काश्मिरला गेलो होतो.

त्यावेळी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या सूचना सादर केल्या होत्या. मीसुद्धा 11-12 मुद्दे सुचविले होते. मात्र आमच्या सूचना आजतागायत धूळ खात पडल्या आहेत.

सरकारनं काश्मिरी तरुणांच्या मनात विश्वास निर्माण करणं आवश्यक आहे. त्यांना सोबत घेऊन चालण्याची गरज आहे.

प्रश्नः सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानसोबत चर्चा शक्य आहे का?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सातत्यानं चर्चा करण्याची भूमिका मांडत आहेत. मात्र जोपर्यंत इमरान खान मुंबई हल्ल्यातील दोषींविरुद्ध कारवाई करणार नाहीत, तोपर्यंत दोन्ही देशांतील संबंध कसे सुधारतील?

मसूद अझर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मसूद अझर

मसूद अझहरची संघटना सातत्यानं भारताविरुद्ध कट्टरतावादाला प्रोत्साहित करत आहे. जोपर्यंत पाकिस्तान कट्टरतावादाला संरक्षण देणं थांबवणार नाही, तोपर्यंत दोन्ही देशांदरम्यान कोणतीही चर्चा होऊ शकत नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)