पुलवामा हल्ल्यांवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, आरोप ठेवणं सोपं आहे, पण...

फोटो स्रोत, AFP / Getty Images
"महाराष्ट्रातील शहिदांच्या कुटुंबांचं दु:ख मी समजू शकतो. त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही," अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात यवतमाळ जवळील पांढरकवडा मध्ये भाष्य केलं. पाकिस्ताननेही या हल्ल्याचा निषेध केला असून भारताच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
यवतमाळ परिसरातील अनेक विकासकामांचं ई-कोनशिला पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं, तसंच अजनी (नागपूर)-पुणे या दोन शहरादरम्यान नव्याने सुरू झालेल्या 'हमसफर एक्सप्रेस'चे त्यांनी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केलं.
तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे नागपूर विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर पांढरकवड्यात बोलताना त्यांनी मराठीतून सांगितलं की "इथल्या लोकांना विशेषत: माता भगिनींना मला भेटायचंच होतं," असं . मोदींनी अनेकदा महाराष्ट्रात मराठी भाषेतून संवाद साधला होता.
माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या चंद्रपूरच्या मुलांचा आपल्या भाषणात उल्लेख केला. याआधी 'मन की बात' या कार्यक्रमातही त्यांनी या मुलांचं कौतुक केलं होतं.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2022पर्यंत लोकांना घरं मिळतील. तसंच या घराची नोंदणी घरातल्या महिलेच्या नावावर व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असंही मोदी यावेळी म्हणाले.
त्यानंतर त्यांनी पुलवामामध्ये 14 फेब्रवारीच्या हल्ल्यात मरण पावलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. "तुमचा आक्रोश मी समजू शकतो. महाराष्ट्रातील शहिदांच्या कुटुंबांचं दु:ख मी समजू शकतो. माझ्या संवेदना त्यांच्याबरोबर आहेत," असं ते म्हणाले.
"शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. दहशतवाद्यांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी शिक्षा दिली जाईल. धीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा. पुलवामाच्या गुन्हेगारांना कशी आणि केव्हा शिक्षा द्यायची याचा निर्णय जवानच घेतील," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Facebook/Nitin Gadkari
"एक असा देश जो फाळणीनंतर जन्माला आला, जिथे दहशतवादाला आश्रय दिला जातो, आज दिवाळखोर होण्याचा मार्गावर आहे, तो दहशतवादाचा दुसरा मार्ग झाला आहे," अशी टीका नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचं नाव न घेता केली.
आम्ही जी विकासकामं करत आहोत त्यामागे अनेकांचं बलिदानसुद्धा आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.
पाकिस्तानचं प्रत्युत्तर
दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी या पुलवामा हल्ल्याचा निषेध केला आहे. मात्र "कुठल्याही प्रकारचा हिंसाचार पाकिस्तान सरकारचा मार्ग कधीच नव्हता न असेल," असंही ते म्हणाले.
पाकिस्तानच्या जियो न्यूजशी बोलताना ते म्हणाले, "ही दुःखद बाब आहे की या प्रकरणात कुठलाही तपास न करता भारताने थेट पाकिस्तानवर आरोप लावले आहेत. आरोप लावायला एक मिनिटही लागत नाही. तुम्ही आरोप लावला आणि तुमची जबाबदारी आमच्यावर ढकलून दिली."
"पण आज जग याने प्रभावित होणार नाही. जगभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे आणि तो व्हायलाही हवा. जी जीवितहानी झाली आहे, ती कुणीही भरून नाही काढू शकत," असं ते म्हणाले.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या वक्तव्याचा आधार घेत कुरेशी म्हणाले, "काश्मीरच्या बाबतीत भारतातूनही काही प्रश्न उपस्थित केले जातात, ज्याबद्दल फारूख अब्दुल्ला बोलले, की पाकिस्तानवर आरोप ठेवणं भारतासाठी सर्वांत सोपं आहे. अब्दुल्ला म्हणाले की आपण हेही पाहायला हवं की आपल्याकडे काय होतंय? मानवाधिकारांची पायमल्ली होतेय, छळ आणि बलात्कार होत आहेत. दररोज अंत्ययात्रा निघत आहेत. मग त्यावर अशी प्रतिक्रिया साहजिक नाहीये का?"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कुरेशींनी मान्य केलं की काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलायला हवा, पण त्यांनी पुलवामा घटनेवर साशंकता व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की मॉस्कोमध्ये एका चर्चेदरम्यान त्यांनी रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांना सांगितलं की भारतात सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी राजकीय लाभासाठी "असा काही खेळ" होणारच होता.
कुरेशी म्हणाले की पंतप्रधान मोदींपुढे दोन पर्याय आहेत - "एक तर निवडणुका ध्यानात घेऊन जबाबदारीने वक्तव्य करा, आपली धोरणं आखा. किंवा, आपल्या देशातील दारिद्र्य आणि विकासाबद्दल विचार करा. पण हे शांतता आणि क्षेत्रात स्थैर्य प्रस्थापित झाल्याशिवाय होणार नाही."
"आम्ही हेच म्हणतोय की जर या प्रकरणी काही पुरावे असतील तर नक्कीच पाकिस्तानलाही सांगा, जेणेकरून आम्ही तपासात सहकार्य करू आणि आरोपांची सत्यता तपासू. आम्हाला शांतता हवी आहे, दोन्ही देशांमधले संबंध ताणायला नको," असंही कुरेशी जियो न्यूजशी बोलताना म्हणाले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








