पुलवामा CRPF हल्ला : सुरक्षेबाबतच्या हलगर्जीपणामुळे 34 जवानांचा जीव गेला?

RAJNISH PARIHAN

फोटो स्रोत, RAJNISH PARIHAN

    • Author, रियाज मसरूर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, श्रीनगर

जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात CRPFच्या ताफ्यांवर झालेल्या हल्ल्यात किमान 34 जवान मृत्युमुखी पडले आणि काही जखमी झालेत. हा हल्ला रोखता आला असता असं जम्मू आणि काश्मीरच्या गुप्तहेर खात्यातील अधिकाऱ्यांना वाटतं.

जैश-ए-मोहम्मद ही संघटना मोठा हल्ला करू शकते अशी सूचना 12 फेब्रुवारी रोजीच देशातल्या सर्व सुरक्षा यंत्रणांना पाठवण्यात आली होती, अशी माहिती एका मोठ्या अधिकाऱ्याने बीबीसीला दिली आहे.

जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना हल्ल्यानंतर लगेचच याची आठवण करून दिली असल्याचं बीबीसीला खात्रीलायक सुत्रांनी सांगितलं आहे.

पुलवामामध्ये जो हल्ला झाला आहे त्यासारखा हल्ला अफगाणिस्तानमध्ये झाला होता. त्या घटनेनंतर जैश-ए-मोहम्मदनं एक व्हीडिओ प्रसिद्ध केला होता तो गुप्तहेर संघटनेला मिळाला होता. आमच्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला म्हणून आम्ही हल्ला करू असं त्या व्हीडिओत म्हटलं होतं.

जर राज्य गुप्तहेर खात्याने ही माहिती केंद्र सरकारकडे आधीच सुपूर्त केली होती तर हा हल्ला म्हणजे सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा झाल्याचंच उदाहरण आहे, असं त्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं.

जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबानं यापूर्वी काश्मीरमध्ये अनेक आत्मघातकी हल्ले केले होते. त्यानंतर 1998मध्ये कारगील युद्ध झालं.

अशा हल्ल्यात बहुतेक वेळा पाकिस्तानी नागरिक सहभाग घेत, पण यावेळी पहिल्यांदा स्थानिक तरुणाचा सहभाग होता असं जैश-ए-मोहम्मदनं म्हटलं. पुलवामा जिल्ह्यातल्या आदिल उर्फ वकास कमांडोनं हा आत्मघाती हल्ला केला.

गृहमंत्री राजनाथ सिंह हे काश्मीरमध्ये परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी जाणार आहेत.

नेमकं काय झालं?

"जवानांच्या ताफ्यात एकूण 70 गाड्या होत्या. यातल्या एका बसवर हल्ला झाला. जवानांचा ताफा जम्मूहून श्रीनगरला चालला होता."

पुलवामी हल्ला

फोटो स्रोत, Rajnish parihan

हा मोठा ताफा होता. वेगवेगळ्या वाहनांमधून अडीच हजार जवान प्रवास करत होते. जवानांच्या गाड्यांवर गोळीबारही करण्यात आला, अशी माहिती CRPF चे महासंचालक आर. आर. भटनागर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

जवानांचा ताफा पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून निघाला होता. संध्याकाळपूर्वी हे जवान श्रीनगरला पोहोचणं अपेक्षित होतं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

खराब हवामानामुळे गेल्या दोन-तीन दिवसांत या महामार्गावर फारशी वाहतूक नसल्यानं तसंच इतरही काही प्रशासकीय कारणांमुळे जवान मोठ्या संख्येने श्रीनगरकडे जात होते, असं लष्करातील अधिकाऱ्यांनी सांगितलं.

एरवी कोणत्याही ताफ्यात 1 हजार जवान असतात. मात्र यावेळी एकूण 2547 जवान प्रवास करत होते. या ताफ्यात रस्ते मोकळे करणारं पथक होतं. तसंच बुलेट-प्रूफ वाहनंही होती.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)