You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रियंका गांधी आज लखनौत रणशिंग फुंकणार, पण काँग्रेसला फायदा होणार?
- Author, समीरात्मज मिश्र
- Role, लखनौहून, बीबीसी हिंदीसाठी
गेल्या महिन्यात प्रियंका गांधींची काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती झाली. त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली, जो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचा गड मानला जातो. आणि आज पहिल्यांदाच प्रियंका राजधानी लखनौमध्ये दाखल होत आहेत.
काँग्रेसने प्रियंका यांच्या स्वागताची दणक्यात तयारी केली आहे. दुपारी 12 वाजता त्यांचा 15 किलोमीटर लांब रोड शो सुरू होणार आहे. त्याची जय्यत तयारी म्हणून संपूर्ण शहरभर प्रियंका यांची पोस्टर्स लागली आहेत. काहींच्या मते प्रियंका निवडणूक प्रचारासाठी नव्हे तर लोकसभेची निवडणूक जिंकून आल्या आहेत, असं वातावरण आहे.
प्रियंका गांधी यांच्याकडे औपचारिकपणे पदभार सोपवण्यात आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्साह आहे. हा उत्साह प्रियंका यांच्यासमोर दाखवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते सज्ज आहेत.
कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रियंका यांनी एक ऑडिओ पाठवला आहे, ज्यामध्ये प्रियंका यांनी तरुण, महिला आणि गरीब मतदारांना उद्देशून एक संदेश दिला आहे.
काँग्रेस महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतरच्या पहिल्या प्रसिद्धिपत्रकात प्रियंका यांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये विषारी दारूमुळे जीव गमावलेल्यांप्रति आदरांजली व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी सरकारवर जोरदार टीकाही केली होती.
सोमवारी राहुल आणि प्रियंका यांच्यासाठी लखनौ शहरात 15 किलोमीटर अंतराचा रोड शो आयोजित करण्यात येणार आहे. यादरम्यान दोघांच्या छोटेखानी सभाही होतील.
रविवारी या सगळ्याच्या तयारीसाठी मजबूत विचारमंथन झालं. यावेळी राज्यातले पक्षाचे सगळे नेते उपस्थित होते. यावेळी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी होती.
हरीश रावत यावेळी म्हणाले, "प्रियंका यांच्या औपचारिक नियुक्तीमुळे उत्तर प्रदेशातील काँग्रेसमध्ये नवं बळ संचारलं आहे. 2009 मध्ये आम्ही अपेक्षा केली नव्हती तेव्हा आम्ही 22 जागांवर जिंकलो होतो. यावेळी त्यापेक्षा चांगलं प्रदर्शन करू."
"प्रियंका यांनी सक्रिय राजकारणात यावं, अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची प्रदीर्घ काळापासूनची इच्छा होती. ती पूर्ण होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे," असं माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी सांगितलं.
लखनौमधल्या काँग्रेस कार्यालयात प्रदीर्घ काळानंतर लगबग आणि जोशाचं वातावरण होतं. उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राज बब्बर, प्रमोद तिवारी, जितीन प्रसाद, अखिलेश सिंह, हे नेतेही उपस्थित होते.
प्रियंका यांच्या बरोबर राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिंयाही लखनौवारी करणार आहेत. पुढचे चार दिवस प्रियंका कार्यालयात कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. त्यानंतर राज्यभरातील दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित केला जाईल.
जाणकारांच्या मते, पूर्व उत्तर प्रदेशच्या 42 जागांसाठी प्रियंका 18 फेब्रुवारीपासून दौरा सुरू करतील.
प्रियंका गांधी यांच्या अभिनंदनासाठी तसंच स्वागतासाठी लावण्यात आलेली पोस्टर्स आणि बॅनर्सवर त्यांची तुलना पुन्हा एकदा इंदिरा गांधी यांच्या काळाशी करण्यात आली आहे.
गुलाबी टीशर्ट परिधान केलेल्या कार्यकर्त्यांची एक फौजही सज्ज झाली आहे. या टीशर्टवर 'प्रियंका सेना' असं लिहिलं आहे. इंदिरा गांधी यांच्या 'वानरसेने'च्या धर्तीवर प्रियंका सेनाची रचना करण्यात आली आहे.
'प्रियंका सेने'च्या एका सदस्याने आपल्या भावना व्यक्त केल्या, "प्रियंका गांधी यांचं स्वागत आणि पुढील कार्यक्रमांची जबाबदारी या सेनेवर आहे. आम्ही महिलांचा सन्मान करतो हे प्रतीकात्मक पद्धतीने दाखवण्यासाठी गुलाबी रंगाचे टीशर्ट देण्यात आले आहेत."
गंमत म्हणजे खुद्द प्रियंका गांधींना या सेनेबद्दल कल्पना नाही.
प्रियंका गांधी कार्यक्रमाच्या निमित्ताने लखनौचं काँग्रेस कार्यालय नव्याने नटलं आहे. कार्यालयाला रंगरंगोटी करण्यात आली आहे. आसपासच्या परिसरात सगळीकडे काँग्रेसची पोस्टर्स, बॅनर्स झळकत आहेत. या कार्यालयात प्रियंका गांधी यांच्यासाठी स्वतंत्र कक्षही तयार करण्यात आला आहे.
ज्येष्ठ पत्रकार सुभाष मिश्र प्रियंका स्वागतासंदर्भात निरीक्षण मांडतात, "खूप दिवसांनंतर काँग्रेसचा प्रभारी उत्तर प्रदेशात चार दिवस तळ ठोकून कार्यकर्त्यांना भेटणार आहे. निवडणुकांसंदर्भात चर्चाही करणार आहे."
काँग्रेस पक्ष महागठबंधनात सहभागी नाही. एकट्याने लढत असल्यामुळे काँग्रेसला फायदा होणार की नुकसान, याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
ज्येष्ठ पत्रकार शरत प्रधान यांच्या मते, "नुकसान किंवा फायदा हे आता ठरवता येणार नाही. मात्र भाजप नेत्यांची वक्तव्यं आणि शेरेबाजी पाहता इथल्या घडामोडींकडे त्यांचं बारीक लक्ष आहे, हे लक्षात येतं. प्रियंका यांचा पूर्व उत्तर प्रदेशात किती प्रभाव पडेल, हे सांगता येणं कठीण आहे. मात्र काँग्रेसला याचा फायदाच होईल हे पक्कं."
सोमवारी होणाऱ्या रोड शोनंतर प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया आपापल्या मतदारसंघातील जागांवर जिंकण्यासाठी डावपेच आखणीच्या कामाला लागतील. जाणकारांच्या मते या दौऱ्यात निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावासंदर्भात प्राथमिक चर्चेला सुरुवात होऊ शकते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)