लोकसभा निवडणुकांबरोबरच विधानसभा होणार, कामाला लागा: अशोक चव्हाणांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना आदेश #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. विधानसभा 28 फेब्रुवारीला विसर्जित होणार, कामाला लागा - अशोक चव्हाण

"लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. 28 फेब्रुवारी रोजी विधानसभेचं अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील, त्यामुळे कामाला लागा," असं वक्तव्य महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

औरंबादमधील राजीव गांधी स्टेडयमवर गुरुवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, "वंचित बहुजन आघाडीला माझी हात जोडून विनंती आहे की, भाजपला मदत होईल, असं काही करू नका. केवळ 30 टक्के मतांवर भाजपचं सरकार आलेलं आहे. उर्वरित 70 टक्के मतं आता एकसंध राहिली पाहिजेत."

यानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, "काँग्रेस संघाच्या विरोधात काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. महात्मा गांधी यांच्या काळापासून काँग्रेसची संघविरोधी भूमिका स्पष्टपणे राहत आली आहे. त्यामुळे काँग्रेसची संघाच्या संदर्भात लेचीपेची भूमिका असण्याचं कारणच नाही. उलट प्रकाश आंबेडकर यांच्यासह सर्व संघविरोधी शक्तींनी एकत्र येत लढा उभा करण्याची गरज आहे.

"प्रकाश आंबेडकर यांच्या निरोपाची वाट पाहत आहोत. त्यांचा निरोप येत नसल्याने काँग्रेस- राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर करावयाचे थांबले आहे."

2. 80 टक्के शेतकरी 6,000 रुपयांसाठी पात्र

केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 80 टक्के शेतकऱ्यांनी होईल, असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. TV9मराठीनं ही बातमी दिली आहे.

या योजनेंतर्गत वर्षभरात राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात मिळून 7,200 कोटी रुपये जमा होणार आहेत. पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलन करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 2015-16च्या कृषी गणनेनुसार, राज्यात एक कोटी 52 लाख 85 हजार 439 शेतकरी आहेत.

3. कौमार्य चाचणी यापुढे लैंगिक अत्याचार

कौमार्य चाचणी हा यापुढे लैंगिक अत्याचार मानला जाणार असून, संबंधितांवर गुन्हा नोंदवला जाणार आहे. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी अशी माहिती दिली आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

"याबाबत लवकरच अधिसूचना जारी केली जाईल. संबंधित पोलीस ठाण्यांना तसा आदेश दिला जाईल. दर महिन्याला राज्यातील सर्व जिल्ह्यांत महिला अत्याचाराच्या प्रकरणांचा आढावा घेऊन दोषींवर कारवाई करण्याचा पाठपुरावा केला जाईल," असंही त्यांनी म्हटलं आहे.

"कौमार्य चाचणीसारख्या अनिष्ट रुढीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. जातपंचायत कायद्यातही सुधारणा करण्यात येणार आहे. त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात येईल," असं ते पुढे म्हणाले.

4. अण्णा हजारेंचं आता मौन व्रत

"सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या, पण केंद्रीय कृषी कार्यालयाकडून अजूनही अधिकृत पत्र मिळालेलं नाही. त्यामुळे मी केंद्र सरकारला पत्र लिहिणार आणि दोन दिवसानंतर मौन आंदोलन सुरू करणार आहे," असं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

"सरकारनं आश्वासन पूर्ण केलं नाही तर निवडणूक आचारसंहितेच्या काळात पुन्हा उपोषण करणार," असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अण्णांनी सात दिवसांचं उपोषण मंगळवारी थांबवलं होतं.

5. सोनिया गांधींकडून गडकरींच्या कामाचं कौतुक

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी लोकसभेत बाक वाजवत नितीन गडकरींच्या कामाची प्रशंसा केली आहे. द इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

लोकसभेत गडकरी म्हणाले की, "मी खूप भाग्यवान आहे. कारण, मला माझ्या पक्षासह सर्वच विरोधी पक्षाचे खासदारदेखील सांगतात की, त्यांच्या मतदार संघात खूप वेगाने विकासकामं सुरू आहेत. विरोधकही माझ्या कामाने समाधानी आहेत हे ऐकूण मला आनंद होतो."

नितीन गडकरींचं बोलणं आटोपल्यावर भाजप, शिवसेनेसह भाजपच्या मित्रपक्षांच्या खासदारांनी बाक वाजवून कौतुक केलं. यावेळी सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोध पक्षातील अनेक खासदारांनी बाक वाजवून नितीन गडकरींच्या कामांची प्रशंसा केली.

दरम्यान, "केंद्रीय मंत्री नितीन गडकरी फार स्वच्छ स्वभावाचे आहेत. त्यांच्या मनात काही इच्छा असेल, तर सर्वांत आधी ते मला बोलले असते किंवा बोलतीलही. षड‌्यंत्र करणाऱ्यांपैकी ते नाहीत," असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे.

डेहराडूनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)