You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी : 'महामिलावट करून एकत्र आलेले देशासाठी घातक'
( ही बातमी सतत अपडेट होत आहे )
महामिलावट करुन एकत्र येणारे देशासाठी घातक आहेत, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी भाजपविरोधातील महाआघाडीवर निशाणा साधला आहे. ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत बोलत आहेत.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करत गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं. ते म्हणाले, "आज 1947 ते 2014 अशी तुलना करत अनेकांनी भाषणं केली. BC आणि AD या कालगणनेची ही त्यांची वेगळी व्याख्या असावी. BC म्हणजे before congress आणि AD म्हणजे after dynasty या त्यांच्या व्याख्या असाव्यात"
विरोधकांवर टीका करण्यासाठी त्यांनी एका कवितेचाही सहारा घेतला,
"जब कभी झूठ की बस्ती में, सच को तडपते देखा है
तब मैंने अपने भीतर किसी, बच्चे को सिसकते देखा है
अपने घर की चार दिवारी में, अब लिहाफ में भी सिहरन होती है
जिस दिन से किसी को गुर्बत में, सडकों पर ठिठुरते देखा है"
मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- सरकारची ओळख पारदर्शकता, गरीबांचं हित, राष्ट्रहिताला प्राधान्य, भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई आणि वेगासाठी आहे.
- आशा आणि विश्वास असलेलेच लोक काहीतरी परिवर्तन घडवून आणू शकतात असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं
- विनाशाचा जो काळ मध्ये आला त्यातून बाहेर पडूनच भविष्यातला भारत घडत आहे. तो अंकुरीत झाला आहे.
- सामान्यांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत
- इतिहास-बीसी आणि एडी या दोन काळांची चर्चा करतो. अनेकांनी भाषणात 1947 पासून 2014 असा उल्लेख केला. तेव्हा मला वाटलं BC म्हणजे before congress आणि AD म्हणजे after dynasty या त्यांच्या व्याख्या असाव्यात
- साडेचार वर्षांत आम्ही किती पुढे गेलोय हे आकडे दाखवतात, जागतिक अर्थव्यवस्थेत भारत सहाव्या स्थानावर
- पहिल्यापेक्षा सर्वाधिक एफडीआय भारतात. जगातला दुसरा स्टील प्रोड्युसर भारत. दुसरा सर्वांत मोठा मोबाईल बनवणारा देश.
- ऑटोमोबाईल क्षेत्रात चौथा देश भारत. इंटरनेट डेटा सर्वांत स्वस्त आणि सर्वाधिक वापर भारतात. एव्हिएशन वेगानं पुढे जात आहे.
- विरोधकांनी विरोध केला पाहिजेच. धोरणांवर टीका आवश्यक. मात्र मोदी, भाजपवर टीका करताना देशाचीच बदनामी करायला लागतो. लंडनमध्ये प्रेस कॉन्फरन्स करून देशाची काय शान वाढवता?
- मोदी संस्था खराब करत आहेत असं म्हणणारे उलटा चोर कोतवाल को डांटे असं आहे.
- तुम्ही विचार करा..आणिबाणी लादली काँग्रेसनं. सेनेला अपमानित केलं काँग्रेसनं. देशाच्या सेनाध्यक्षांना गुंड म्हटलं काँग्रेसनं. आणि मोदींवर आरोप.
- निवडणूक आयोग देशासाठी गौरव. आम्ही त्याला खराब कशाला करू?
- आपली विफलता लपण्यासाठी विरोधक ईव्हीएमचा आधार
- तुम्ही इतके का घाबरला आहात? तुम्हाला झालंय तरी काय?
- काँग्रेसनं योजना आयोगाला जोकरांचा समूह म्हटलं होतं. तुमच्याच माजी पंतप्रधानांनी संस्थांचा अपमान केला.
- कलम 356 चा दुरुपयोग किमान 100 वेळा. इंदिरा गांधींनी एकट्यानं 50 वेळा त्याचा वापर केला.
- केरळमधलं निव़डून आलेलं सरकार इंदिरा गांधींना वाटलं म्हणून बरखास्त केलं. तुम्ही एनटीआर, एमजीआरसोबत काय केलं?
- मंत्रिमंडळाचा निर्णय प्रेस कॉन्फरन्समध्ये फाडला होता. यात कोणता सन्मान होता?
- मोदींकडे बोट दाखवताना तुमच्याकडे चार बोटं आहेत हे विसरु नका.
- या सर्व समस्यांच्या मुळाशी गरीबीतून पुढं आलेल्या व्यक्तिनं दिलेलं आव्हान सहन नाही झालं. एका कोपऱ्यातून आलेल्या माणसानं दिलेलं आव्हान पेललं नाही.
- 55 वर्षे विरुद्ध 55 महिने. 10 कोटींहून अधिक शौचालयं बांधली.
- गॅस कनेक्शन-बारा कोटी 55 वर्षांत आणि 55 महिन्यात 13 कोटी. 6 कोटी उज्ज्वला. काम किती वेगानं होतं त्याचं हे उदाहरण.
- बँकांचं राष्ट्रीयकरण केलत तुम्ही पण 55 वर्षांत केवळ 50 टक्के लोकांची बँकांची खाती. आणि आता 100 टक्के.
- ज्या गतीनं गेल्या 55 महिन्यांत सरकार चाललं आहे तसं काम तुम्ही केलं असतं तर पहिल्या वीस वर्षांत घरोघरी वीज पोहोचली असती
- 2004,2009,2014 तीन वर्षांत प्रत्येक घरात वीज पोहचवण्याचं आश्वासन काँग्रेसच्या प्रत्येक जाहीरनाम्यात होतं. मात्र काम झालंच नाही.
- मी रात्रं-दिवस मेहनत करून 100 टक्के विद्युतीकरण करण्यासाठी झटतो आहे.
- 2014 पूर्वी तुम्ही 25 लाख घरं बनवली, आम्ही 1 कोटी 30 लाख घरं बांधून चावी दिली. तीसुद्धा शौचालय आणि सर्व सोयींनी युक्त घरं.
- आधारमुळे पैसे गरीबांच्या खात्यात जमा होतात. कुठेही मध्यस्थ नाहीत. दलाल नाहीत.
- 2004,2009,2014 अशा तीन जाहीरनाम्यांमध्ये काँग्रेसनं प्रत्येक पंचायतीला ऑप्टिकल फायबर पोहचवण्याचं आश्वासन दिलं होतं. तुमची तीन वर्षांची व्याख्या माहित नाही.
- 2005 पासून काम सुरू करून तुम्ही 59 गावांत कनेक्टिव्हिटी दिली आहेत. आम्ही 1 लाख 16 हजार गावांत ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटी दिली.
- काँग्रेसची 55 वर्षे सत्ताभोगाची आणि आमचे 55 महिने सेवा भावाचे.
- आमची निष्ठा अटल आहे आणि हेतू शुद्ध आहे. आम्ही 24 तास देशाच्या विकासासाठी काम करण्याची चिरंतन प्रेरणा मिळवत राहू.
- कॉमनवेल्थ-खेळाडू पदक जिंकण्यासाठी मेहनत करत होते आणि हे लोक आपली संपत्ती वाढवण्यासाठी मेहनत घेत होते.
- 2 जी स्पेक्ट्रममध्ये काय झालं? हे सगळ्या देशानं पाहिलं आहे. आम्हाला लोकांना स्वस्त डेटा द्यायचा होता. त्यामुळं आम्ही स्पेक्ट्रम लिलावाचं नवीन धोरण आणलं.
- स्वातंत्र्यानंतर बँकांनी एकूण 18 लाख कोटी रुपयांचं कर्ज दिलं.
- 2008 ते 2014 हे कर्ज वाढून 52 लाख कोटी. हे फोन बँकिंगचा परिणाम. लोकांना लुटलं जात होतं. नवीन मतदारांना हे माहित असायला हवं.
- मुद्रा योजनेतून आम्ही 7 लाख कोटी रुपये दिले. ज्यांच्याकडे तारण ठेवण्याची ताकद नव्हती त्यांनाही कर्ज दिलं.
- मोदींच्या दाव्यानंतर विरोधकांची 'नीरव मोदी..नीरव मोदी' अशी घोषणाबाजी
- मोदी म्हणाले.. जे पळून गेले ते ट्वीटरवर रडताहेत. मी जेवढं घेऊन गेलो, मोदी त्यापेक्षा जास्त संपत्ती जप्त करत आहे. काँग्रेसनं लुटणाऱ्यांना लुटू दिलं. आम्ही त्यांना परत आणण्यासाठी कायदे केले.
- आमच्यावेळेस सर्जिकल स्ट्राईक झाल्याचं काँग्रेसनं म्हटलं. पण तुम्ही सेनेची अशी अवस्था केली होती, की सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेण्याचीही परिस्थिती नव्हती. त्यांच्याकडे बुलेटप्रूफ जॅकेट्स, चांगले शूज नव्हते, तुम्ही सर्जिकल स्ट्राईकची भाषा करता?
- 2014 नंतर यूपीएचं सरकार बनलं असतं तर तेजस विमानं जमिनीवरच उभी राहिली असती.
- सेनेला बळकटी देण्याचा विचार तुम्ही कधीच केला नाही. देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांप्रती संवेदनहीनता दाखवलीत - मोदी
- तीस वर्षांत एकही नेक्स्ट जनरेशन फायटर प्लेन सेनेला का दिलं गेलं नाही?
- राफेलबद्दल सर्वोच्च न्यायालयानं सौद्याचे प्रत्येक तपशील तपासले आहेत.
- काँग्रेसला वायूसेनेला बळकटी मिळावी अशी इच्छा नाही.
- राफेल सौदा रद्द करण्यासाठी प्रयत्न? कोणाच्या फायद्यासाठी हे सर्व सुरू आहे? तुम्ही गेली तीस वर्षे सेनेला निःशस्त्र केलं.
- काँग्रेसच्या कारकिर्दीत एकही संरक्षण सौदा दलालीशिवाय नाही.
- काँग्रेस राफेलच्या बाबतीत एवढं खोटं कसं बोलत आहे याचा विचार मी केला. त्यांच्या काळात 55 वर्षांत एकही सौदा दलालीशिवाय झाला नाही. कोठूनतरी येणाऱ्या काका-मामाच्या माध्यमातून सौदा झाला.
- आता ह्यांचे चेहरे उतरले आहेत. आम्ही आता यांचे 'राजदार' पकडून आणले आहेत. तुम्हाला हेच कोडं पडलंय.
- काळा पैसा- भ्रष्टाचार संपवण्यासाठी आम्ही कटिबद्ध. मात्र यांचे हात कोठे ना कोठे तरी अडकलेले. आमच्याकडे असं काही बॅगेज नाही. कोणाच्या उपकारावर आम्ही जगत नाही.
- बेनामी संपत्तीसाठी आम्ही कायदा केला. आता बेईमान लोकांची प्रॉपर्टी बाहेर येत आहे. कुठे आणि कशापद्धतीनं बाहेर येतेये ते दिसतंय.
- आम्ही भ्रष्टाचार विरोधाच्या संकल्पात मागे हटणार नाही. आव्हान खूप आहेत. पण आमचा निश्चय पक्का आहे.
- नोटाबंदी- 3 लाख कंपन्या बनावट होत्या. आमच्या 55 महिन्यांच्या सेवाभावी सरकारनं त्याला आळा घातला.
- 3 लाख कोटी रुपये नोटाबंदीनंतर परत आले.
- आम्ही देशातील विविध संस्थांना पत्रं पाठवली. विदेशातून येणाऱ्या पैशाचा हिशोब मागितला. धाड नाही, इन्कम टॅक्स नाही. केवळ एक पत्र. 20 हजार संस्थांचा कारभार बंद झाला. परदेशातून दान स्वरुपात धन घ्यायच्या, त्यांना पायबंद घातला.
- आरोप, चिखलफेक होण्याचं कारण हेच आहे की हे सरकार एका प्रामाणिक माणसाच्या नेतृत्वात स्थापन झालेलं आहे.
- विकासाच्या गप्पा तुम्ही मारता पण ज्या सरदार सरोवराचं भूमीपूजन पंडित नेहरुंनी केली होतं, त्याचं उद्घाटन मी केलं.
- 55 वर्षे सत्तेत राहून काही जण इतरांना तुच्छ लेखतात. प्रत्येकाला अपमानित करणं त्यांचा स्वभाव. न्यायपालिका, मुख्य न्यायाधीश, आरबीआय, निवडणूक आयोग, सर्वोच्च तपास यंत्रणा, लोकशाहीचा अपमान करत आहेत.
- महात्मा गांधींनी हे ओळखलं होतं म्हणूनच त्यांनी काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिल होता. काँग्रेसमुक्त भारत ही माझी घोषणा नाही तर महात्मा गांधींची इच्छा. त्यांचं 150वं जयंती वर्ष आहे. हे काम करूनच टाकू.
- अटलजींना पूर्ण बहुमत मिळालं असतं, तर देश कुठच्या कुठे गेला असता.
- बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "काँग्रेसमध्ये सामील होणं आत्महत्या करण्यासारखं आहे."
- महागाईवरही चर्चा झाली. त्यात काहीच तथ्य नाही. दोन गाणी प्रसिद्ध आहेत "बाकी जो बचा महंगाई मार गई" आणि "महंगाई डायन खाये जात है" पहिल्या गाण्याच्या वेळेस इंदिरा गांधींचं सरकार. दुसऱ्या गाण्याच्या वेळेस रिमोट कंट्रोलवालं काँग्रेस सरकार.
- महागाईशी काँग्रेसचं नातं अतूट आहे. तुमच्या काळात प्रत्येक वेळेस महागाई दर जास्त होता. गेल्या 55 वर्षांत महागाईचा दर 4 टक्क्यांच्या नियंत्रणात.
- मध्यमवर्गांच्या आशा-अपेक्षा वाढणं देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक. हे विकासाचं चिन्ह आहे. गेल्या 55 महिन्यात या अपेक्षा वाढीस लागल्या आहेत.
- जीएसटीनंतर आम्ही जीवनावश्यक वस्तूंवरचा कर आम्ही हटवला. तुम्ही दूधावरही कर घेतला होता. आज 99 टक्के सामान 18 टक्के कर चौकटीच्या खाली आहे.
- शैक्षणिक कर्जाचा व्याजदर 15 टक्क्यांवरून 11 टक्के केला. गृहकर्जातही आम्ही दिलासा दिला.
- LED बल्ब युपीएच्या काळात 300-400 रुपयांना मिळायचा. आमच्या काळात केवळ 50-60 रुपयांत मिळतो. त्यामुळे वीज बिलात 50 हजार कोटी रुपयांची घट झाली. देशातील मध्यमवर्गाला यामुळे दिलासा.
- ह्रदयात टाकावे लागणारे स्टेंट स्वस्त केले. डायलिसिस आता मोफत होतं.
- 5 हजारांहून अधिक जनऔषधी केंद्र आम्ही सुरू केली आहेत. त्यामुळं 100 रुपयांचं औषध केवळ 30 रुपयांत मिळू लागलं.
- आयुष्यमान भारत योजनेत मोदींच्या चिठ्ठीवरून लोकांना त्रास होत आहे. जेव्हा एक पंतप्रधान अशी चिठ्ठी देतो, तेव्हा त्याची बांधिलकी दिसून येते.
- सभागृहाला या योजनेचं स्वागतच करायला हवं. ही योजना सुरु होऊन 100 दिवसचं झाले असतील, पण दिवसाला पंधरा हजारांहून अधिक गरीब दररोज या योजनेचा लाभ घेत आहेत. 11 लाख गरीबांनी त्याचा लाभ आतापर्यंत घेतला आहे.
- निवडणुका येतील-जातील. पण मी सभागृहातल्या प्रत्येकाला आवाहन करतो की तुमच्या मतदारसंघातल्या लोकांपर्यंत ही योजना पोहोचवा.
- एससी-एसटी, ओबीसींच्या हितांना बाधा न आणता सवर्णांना 10 टक्के आरक्षण. आम्हाला सगळ्यांनी साथ दिली. त्यासाठी सर्वांचेच आभार.
- 55 वर्षांत रोजगाराच्या आकडेवारीसंबंधी कोणतीही व्यवस्था नव्हती. देशात असंघटित क्षेत्रात 85 ते 90 टक्के नोकऱ्या. तर संघटित क्षेत्रात केवळ 10 ते 15 टक्के रोजगार आहे.
- सप्टेंबर 2017 पासून नोव्हेंबर 2018 पर्यंत 1 कोटी 80 लाख लोकांनी पहिल्यांदाच पीएफमध्ये पैसे टाकले. यात 60 टक्क्यांहून अधिक लोकांचं वय 28 वर्षांहून कमी. हे विना रोजगार शक्य झालं का?
- 2014 मध्ये देशात 65 लाख लोक एनपीएस मध्ये रजिस्टर्ड होते. गेल्या वर्षी ही संख्या 1 कोटी 20 लाख झाली.
- असंघटित क्षेत्राचा विचार करताना आपण आधी ट्रान्सपोर्ट क्षेत्राचा विचार करू. गेल्या चार वर्षांत जवळपास 36 लाख ट्रक किंवा कमर्शियल वाहनांची विक्री झाली. या क्षेत्रातच गेल्या चार वर्षांत सव्वा कोटी लोकांना रोजगार मिळाला आहे.
- मान्यताप्राप्त हॉटेल्सच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ. पर्यटन क्षेत्रातही दीड कोटी नवीन रोजगारांची निर्मिती.
- मुद्रा योजनेअंतर्गत पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्या लोकांची संख्या सव्वा चार कोटींहून अधिक. या लोकांनी काम सुरू केलंय. मात्र हे लोक रोजगाराच्या आकडेवारीत येत नाहीत.
- सरकारनं दोन लाख नवीन कॉमन सर्व्हिस सेंटर उघडले आहेत. यात अनेक तरूण काम करतात. हा रोजगार नाही का?
- देशात महामार्ग, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन्स बांधले जात आहेत. बांधकाम क्षेत्राचा विकास झाला आहे. यातून रोजगार मिळत नाहीत का?
- शेतकऱ्यांसाठी तुम्ही किती तरतूद करत होता आणि आम्ही किती केली आहे, याची तुलना करा. तुम्ही निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कर्जमाफीचा खेळ सुरू केला. सत्तेत असताना दहा वर्षे तुम्ही तेच करत होता.
- 6 लाख कोटींचं शेतकऱ्यांचं कर्ज होतं. तुम्ही केवळ 52 हजार कोटी रुपये माफ केलंत. त्यातही 35 लाख असे होते, जे लाभार्थी नव्हतेच. हा कॅगचा रिपोर्ट होता.
- आम्ही कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर भर दिला. हजारो कोटी रुपये खर्च करुन प्रलंबित राहिलेले 99 सिंचन प्रकल्प मार्गी लावले. मेगा फूड पार्क, ग्रामीण हाट बनवण्यासाठी प्रयत्न केले.
- शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला. 12 कोटी शेतकरी या योजनेचे लाभार्थी ठरतील. थेट लाभ मिळेल. दलाल नसतील.
- कर्नाटकमध्ये तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्याचा लाभ 43 लाख लोकांना मिळणार होता. पण आतापर्यंत केवळ 60 हजार शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळाला.
- दहा दिवसांत कर्जमाफीची भाषा करता, राजस्थान-छत्तीसगढमध्ये अजून कागदही तयार नाहीत.
- तुम्ही प्रत्येक गोष्ट अर्धवट सोडलीत. मला त्या पूर्ण करण्यातच वेळ घालवावा लागत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)