आयआरएस सहीराम मीणा लाचखोरीच्या आरोपात अटकेत, 200 कोटींचं घबाड सापडलं?

फोटो स्रोत, NArayan Bareth/BBC
पद, प्रतिष्ठा, धन-संपत्ती सगळं काही त्यांच्या पायाशी लोळण घेत होतं. पण त्यांची इच्छा होती थेट देशाच्या संसदेत जाण्याची. अर्थात खासदार होण्याची. पण त्याआधीच राजस्थानच्या अँटी करप्शन ब्युरोने कोटामध्ये नार्कोटिक्स विभागाचे उपायुक्त सहीराम मीणा यांना प्रजासत्ताक दिनादिवशीच लाच घेताना रंगेहात पकडलं.
मीणा यांनी सकाळी झेंडावंदन केलं. सत्य, निष्ठा आणि प्रमाणिकपणाच्या गप्पा मारल्या. आणि आता अधिकारी त्यांच्या करोडोंच्या संपत्तीचा हिशोब लावण्यात गुंतले आहेत.
अँटी करप्शन ब्युरोच्या माहितीनुसार मीणा यांच्या संपत्तीचा आकडा 200 कोटी रुपयाच्या घरात पोहोचला आहे. ज्यात तब्बल अडीच कोटी रुपये कॅश, 106 प्लॉट्स, 25 दुकानं, पेट्रोल पंप, लग्नाचे हॉल, दागदागिने आणि शेतजमिनीचा समावेश आहे.
मीणा यांच्याकडे सापडलेली संपत्ती मोजण्यासाठी चक्क मशीन्स मागवाव्या लागल्या. विशेष म्हणजे त्यांनी बिटकॉईनमध्येही गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे.
अर्थात या क्रिप्टोकरन्सीची माहिती मिळवण्यासाठी अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा शोध घेतायत, ज्याचा वापर मीणा यांनी केला आहे.

फोटो स्रोत, NArayan Bareth/BBC
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मीणा यांना अटक केल्यानंतर ना त्यांच्या चेहऱ्यावर कुठली काळजी होती, ना ते घाबरलेले दिसत होते.
अँटी करप्शन विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रशील ठाकूर यांनी बीबीसीला सांगितलं की मीणा यांची अजून चौकशी सुरु आहे.
मीणा यांच्यासोबत दलाल कमलेश धाकड यांनाही अटक केली आहे. धाकड यांना 1 लाख रुपयाची लाच घेताना अटक करण्यात आली.
तेच मीणा यांच्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करत होते. धाकड यांचे वडील अफूची शेती करतात. तपास अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार मीणा चौकशीत अजिबातच सहकार्य करत नाहीएत. शिवाय आपल्याकडे वडिलोपार्जित संपत्ती असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तपासात अशी कागदपत्रं पोलिसांच्या हाती लागली आहेत, ज्यातून स्पष्ट होतं की मीणा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते.

फोटो स्रोत, Getty Images
विशेष म्हणजे ते काँग्रेस किंवा भाजप कुठल्याही पक्षाकडून तिकीट मिळालं तर निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते.
मीणा 1989 मध्ये सरकारी नोकरीत आले. आणि अतिशय कमी कालावधीत म्हणजे 1997 मध्ये ते भारतीय रेव्हेन्यू सर्व्हिसचे सदस्य झाले.
अर्थात त्यांच्या सेवानिवृत्तीला अतिशय कमी कालावधी बाकी राहिला आहे. अधिकाऱ्यांनी चौकशीला वेग आणला, तर लगेच मीणा यांनी आपली प्रकृती बरी नसल्याची तक्रार केली.
तपा अधिकारी ठाकूर यांनी सांगितलं की, "आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत की लाचखोरीच्या प्रकरणात कोण कोण सामील होतं आणि ही साखळी नेमकी किती मोठी आहे"
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अफूच्या शेतीत शेतकरी आणि नार्कोटिक्स विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये सरपंच हात मुख्य दुवा असतो. तोच गावातील अफूची शेती, त्याचा पसारा आणि त्याचा हिशोब करत असतो.
कमलेश आपल्या गावात वडिलांनाच सरपंच बनवू इच्छित होते. पण पात्रता नसल्याने दुसऱ्या कुणालातरी सरपंच बनवण्यात आलं.
अर्थातच अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांची मीणा यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून नजर होती. आणि त्यांचे फोनही अँटी करप्शनने टॅप केले होते.
मीणा यांना ट्रॅप करण्याचा घटनाक्रम एखाद्या थरारपटासारखा आहे. अँटी करप्शनची मीणा यांच्यावर नजर होती. प्रजासत्ताक दिनादिवशी मीणा झेंडावंदनासाठी घरातून निघाले. नार्कोटिक्स विभागाचे दोन कर्मचारी दुचाकीवरुन त्यांना एस्कॉर्ट करत होते.
मीणा यांना झेंडावंदन केलं. 20 मिनिटं इमानदारीवर भाषणबाजी केली. त्यानंतर घरी आले. आणि जसं कमलेशनं त्यांना 1 लाखाची लाच दिली, तसं त्यांना अटक करण्यात आली.
राजस्थानच्या सवाई माधोपूरचे असलेले सहीराम मीणा 30 वर्षापासून सरकारी सेवेत आहेत. आता लाचखोरीच्या प्रकरणानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
मात्र कोटातील नार्कोटिक्स विभागाला याबद्दल विचारलं असता त्यांनी म्हटलं की याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाहीए.
ग्वाल्हेरच्या नार्कोटिक्स विभागाच्या मुख्य कार्यालयातही याबद्दल कुणीच बोलायला तयार नाही. अँटी करप्शनच्या माहितीनुसार आरोपी मीणा यांची बरीच बँक अकाऊंट्स आणि लॉकर्स आहेत.
मीणा यांची संपत्ती
मीणा यांच्याकडे जयपूरमध्ये किमान 106 भूखंड असल्याची कागदपत्रं मिळाली आहेत.
यात खुद्द सहीराम मीणा यांच्या नावे 23, मुलगा मनीषच्या नावे 23, पत्नी प्रेमलता यांच्या नावावर 42 तर इतर नातेवाईकांच्या नावे 12 भूखंड आहेत. तर पत्नी प्रेमलता यांच्या नावावर तब्बल 42 दुकानं असल्याची कागदपत्रं मिळाली आहेत.
मुंबईत मुलगा मनीषच्या नावावर एक फ्लॅट आहे. याशिवाय काही वाहनं आणि जयपूरमध्ये एक घर आहे. जयपूरच्याच जगतपुरा भागात असलेल्या घरातून तब्बल 2 कोटी 26 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
मीणा यांचा पगार महिन्याला केवळ दीड लाख रुपये आहे. मग इतकी संपत्ती कुठुन आणली? या प्रश्नावर मीणा यांनी आपण निरपराध असल्याचा दावा केला.
भ्रष्टाचाराचा खेळ उघडकीस
अफीमची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मते गेल्या अनेक वर्षांपासून नार्कोटिक्स विभागात लाचखोरीचा खेळ सुरु आहे.
राजस्थानच्या 7 जिल्ह्यांमध्ये अफूची शेती करण्यास सशर्त परवानगी आहे.
भारतीय अफीम किसान विकास समितीचे अध्यक्ष चौधरी रामनारायण यांनी सांगितलं की "शेतकरी गेली अनेक वर्ष भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत आहेत. पण त्यांचं कुणीही ऐकत नाही. अँटी करप्शन विभागाने कारवाई केली याचं आम्हाला समाधान आहे. कारण आम्ही तक्रारी करुन थकलो होतो."
अफू उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या 445 दिवसांपासून चित्तौडगढच्या जिल्हा मुख्यालयासमोर धरणं धरलंय. अफीम उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची त्यांची मागणी आहे. ज्यात भ्रष्टाचाराचा मुद्दा केंद्रस्थानी आहे.
समितीचे अध्यक्ष चौधरी सांगतात की, "आम्ही दिल्लीत जाऊन जंतर-मंतरवरही धरणं धरलं. पण शेतकऱ्याचं ऐकतं तरी कोण? सरकारी अधिकाऱ्यांनी असे कायदे आणि नियम केलेत, ज्यानुसार शेतकऱ्यांकडून भरगच्च वसुली केली जाईल."

नार्कोटिक्स विभागाचे अधिकारी अवैध कामं करतात, आणि अफूच्या शेतीचं लायसन्स रद्द करण्याची धमकी देऊन पैसे लुटतात असा आरोप चौधरी यांनी केला आहे.
ते सांगतात की, "सरकारला शेकडोंनी पत्रं लिहिली. निवेदनं पाठवली. दु:ख सांगितलं. पण त्यात काहीही बदल झाला नाही. तब्बल तीनवेळा आम्ही सहीराम मीणा यांना भेटून नार्कोटिक्स विभागातील भ्रष्टाचाराची तक्रारही केली"
कोटामध्ये अफीम शेतकरी संघर्ष समितीचे भवानी सिंग धरतीपकड यांनी सांगितलं की, "नार्कोटिक्सचे अधिकारी अफू खालच्या दर्जाचं असल्याचं सांगून पूर्ण उत्पादन नाकारण्याची धमकी देऊन पैसे लाटतात."
ते सांगतात की, "जेव्हा जेव्हा अधिकारी, नेते आणि शेतकऱ्यांच्या बैठका होतात तेव्हा आम्ही हे मुद्दे मांडले आहेत, आम्हाला आशा आहे की यात काहीतरी सुधारणा होईल. या बैठकांमध्ये कोटा, चित्तौड आणि झालावाडचे खासदारही होते. आम्ही प्रत्येकवेळी हे मुद्दे उचलून धरले, पण कारवाई झाली नाही"
धरतीपकड सांगतात की, "अफूच्या शेतीवर घरदार चालतं. कारण बाकीच्या शेतमालात फार पैसा मिळत नाही. ही अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची मजबुरी आहे आणि त्याचाच फायदा अधिकारी उचलताना दिसत आहेत"
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
('बीबीसी विश्व' हे आमचं बातमीपत्र तुम्ही संध्याकाळी 7 नंतर Jio TV Appवर पाहू शकता. बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटरवर फॉलो करू शकता.)








