CBIच्या अधिकाऱ्यांत जुंपली : लाचखोरीच्या आरोपांमागचा नेमका वाद काय?

फोटो स्रोत, Getty Images
CBIमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली रस्सीखेच आता उघडपणे समोर आली आहे. एकीकडे या संस्थेने आपल्याच संस्थेतील क्रमांक दोनचे अधिकारी असलेले राकेश अस्थाना यांच्याविरोधात लाचखोरीच्या एका प्रकरणात FIR दाखल केला आहे. तर दुसरीकडे अस्थाना यांनी CBIचे संचालक आलोक वर्मा यांच्याविरोधात अनेक प्रकरणात कोट्यवधी रुपयांची लाच घेण्याच्या संदर्भात कॅबिनेट सचिवांकडे तक्रार दाखल केली आहे.
अशा प्रकारे देशातील सर्वोच्च तपास संस्थेतील दोन महत्त्वाच्या अधिकाऱ्यांमध्ये उघडपणे युद्ध पेटलं आहे. CBIच्या एका अधिकाऱ्याने दुसऱ्या अधिकाऱ्यावर असे आरोप लावण्याची CBIच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. एवढंच नव्हे तर, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देण्याचं काम ज्या विभागाचं आहे, त्या विभागातील उच्चाधिकाऱ्यांवर अशा प्रकारचे आरोप लागणं, हाही एक प्रकारचा विरोधाभासच आहे.
हे प्रकरण यासाठी महत्त्वाचं आहे कारण राकेश अस्थाना गुजरात केडरचे IPS अधिकारी आहेत. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा 'Blue Eyed boy' म्हणजेच लाडका असा त्यांचा उल्लेख केला आहे.
CBI कार्मिक विभागाच्या अंतर्गत येतो. या विभागाचा कार्यभार थेट पंतप्रधानांच्या हातात आहे. म्हणजे त्यांच्या नाकावर टिच्चून CBIचे अधिकारी एकमेकांना दुषणं देत आहेत.
दरम्यान, पंतप्रधानांनी CBIच्या दोन्ही उच्चाधिकाऱ्यांना सोमवारी तातडीने बोलावून घेतलं होतं.
लाचखोरीचं नेमकं प्रकरण काय?
राकेश अस्थाना यांच्या विरोधात हैदराबादचे एक व्यापारी सतीश बाबू सना यांच्या तक्रारीवरून FIR दाखल झाली आहे. सतीश बाबू यांच्याविरोधात सुरू असलेल्या एका चौकशीचं नेतृत्व राकेश अस्थाना करत होते.
सतीश बाबू यांनी दुबईस्थित मनोज प्रसाद नावाच्या एका व्यक्ती मार्फत अस्थाना यांना तीन कोटींची लाच दिली होती, असा दावा FIRमध्ये करण्यात आला आहे.
या मनोज प्रसादने दावा केला होता की त्याची CBIमध्ये चांगली ओळख आहे आणि तो बाबू यांच्याविरुद्धची ही चौकशी थांबवू शकतो.
गेल्या आठवड्यात दाखल झालेल्या या FIRमध्ये अस्थाना यांच्याविरोधात कट रचण्याचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप लावला आहे.

फोटो स्रोत, PTI
हे प्रकरण उघड्यावर आल्यावर सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधान मोदींच्या काळात CBIचा वापर एक राजकीय हत्यार म्हणून केला जात आहे. त्यामुळे आज देशातली ही अग्रगण्य संस्था स्वत:शीच लढत आहे."
काही बातम्यांनुसार CBIने मनोज प्रसाद यांना अटक केली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार या प्रकरणात पाठवलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजेसची शहानिशा करणं सुरू आहे.
संस्थेत रस्सीखेच
CBIमध्ये संयुक्त संचालक म्हणून एन. के. सिंह यांनी काम केलं आहे. त्यांनी बीबीसीशी या बाबत चर्चा करताना सांगितलं की या प्रकरणाची सुरुवात 2016मध्ये तत्कालीन विशेष संचालक आर. के. दत्ता यांची गृहमंत्रालयात बदली झाल्यानंतर झाली.
सेवाज्येष्ठतेनुसार दत्ता CBIच्या संचालकपदासाठी पात्र होते, पण तत्कालीन संचालक अनिल सिन्हा यांच्या निवृत्तीच्या दोन दिवसांआधी दत्ता यांची बदली करण्यात आली. त्यानंतर ते कर्नाटक केडरमध्ये परतले.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर राकेश अस्थाना यांची CBIचे अंतरिम संचालक म्हणून वर्णी लागली. तज्ज्ञांच्या मते त्यांची नियुक्ती स्थायी स्वरूपाची झाली. मात्र सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी त्यांच्या नियुक्तीला आव्हान दिलं.
फेब्रुवारी 2017मध्ये आलोक वर्मा यांची CBIच्या संचालकपदी नियुक्ती झाली. त्यानंतर काही महिन्यातच हे प्रकरण तापू लागलं.
वर्मा यांनी अस्थाना यांच्या विशेष संचालकपदी नियुक्तीला विरोध केला. त्यांच्याविरोधात गंभीर आरोप होते, या प्रकरणाची अजूनही चौकशी सुरू आहे, त्यामुळे त्यांनी संस्थेत असू नये, अशी वर्मा यांची भूमिका होती.
आलोक वर्मा यांच्या अनुपस्थितीत राकेश अस्थाना CBIचं नेतृत्व करतील, या बाबींवरही त्यांनी आक्षेप नोंदवला.
तपाससंस्थेच्या कामकाजावर एन. के. सिंह यांनी पुस्तक लिहिलं आहे. ते सांगतात की "CBIच्या दुरुपयोगाचा याआधीही प्रयत्न झाला आहे. आता मात्र हा संघर्ष चव्हाट्यावर आला आहे."
संचालकांवर उपस्थित झाले प्रश्न
इंडियन एक्सप्रेसच्या एका बातमीनुसार राकेश अस्थाना यांनी कॅबिनेट सचिवांना एक गुप्त पत्र लिहिलं आहे. त्यात वर्मा यांच्यावर सतीश बाबू सना यांच्याकडून दोन कोटी रुपये घेण्याचा आरोप लावला आहे.
वर्मा यांच्यावर आरोप आहेत की त्यांनी कोळसा घोटाळा आणि 2G घोटाळ्यात सहभागी असलेल्या दोघा जणांना सेंट कीट्सचं नागरिकत्व मिळवण्यापासून रोखलं नाही.
अस्थाना यांनी वर्मा यांच्याविरोधात हरियाणा येथील एका जमिनीच्या व्यवहारात घोटाळा करण्याचा आणि भ्रष्टाचाराचाही उल्लेख केला आहे. प्रशांत भूषण यांनी हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत नेण्याचा विचार करत असल्याचं बीबीसीला सांगितलं.
कोण आहेत राकेश अस्थाना?
अस्थाना 1984च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते रांचीचे आहेत. त्यांचं शिक्षण दिल्लीतल्या जेएनयूमध्ये झालं आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जवळचे अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.
त्यांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास केला आहे. गोध्रा हत्याकांड, चारा घोटाळा, अहमदाबाद बाँबस्फोट आणि आसारामबापू अशा काही महत्त्वाच्या प्रकरणांचा यात समावेश आहे. अस्थाना यांनी लालू प्रसाद यादव यांची सलग 6 तास चौकशी केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
अस्थाना यांच्या नेतृत्वाखाली गोध्रा हत्याकांडाची चौकशी झाली होती. त्यानंतर आर. के. राघवन चौकशी समितीची स्थापना झाली. या समितीने अस्थाना यांनी केलेला तपास योग्य ठरवला होता.
ते गुजरात केडरमधले अधिकारी आहेत. अहमदाबाद, सूरत अशा ठिकाणी त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.
केंद्र सरकारने त्यांची नियुक्ती CBIचे विशेष संचालक म्हणून केली.
कोण आहेत आलोक वर्मा?
जानेवारी 2019मध्ये निवृत्त होणारे आलोक वर्मा यांची ओळख सुधारणवादी पोलीस अधिकारी अशी आहे. 35 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये केंद्रशासित प्रदेशांचे पोलीसप्रमुख, तिहार जेलचे प्रमुख, दिल्लीचे पोलीस आयुक्त अशा पदांवर त्यांनी काम केलं आहे. पोलीससेवा सुधारण्यासाठी त्यांनी विविध योजना राबवल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
ते 1979च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते पोलीससेवेत रुजू झाले तेव्हा ते फक्त 22 वर्षांचे होते. दिल्ली पोलिसांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले आहेत.
अस्थाना यांनी वर्मा यांच्या विरोधात केंद्रीय दक्षता आयोग अर्थात सी.व्ही.सी.कडे भ्रष्टाचाराच्या 10 तक्रारी दिल्या आहेत.
CBIचे माजी अतिरिक्त संचालक आणि विशेष संचालक राहिलेले अरुण भगत यांनी वर्मा यांचा उल्लेख हुशार अधिकारी असा केला होता. बीबीसीचे प्रतिनिधी नवीन नेगी यांच्याशी बोलताना ते म्हणाले, "वर्मा अत्यंत कुशाग्र अधिकारी आहेत. ते घाईगडबडीत कोणतंही काम करत नाहीत. नाईलाज झाल्याशिवाय ते वरिष्ठ अधिकाऱ्यावर अशी कारवाई करणार नाहीत. हे पाऊल उचलताना त्यांनी नक्कीच इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली असणार."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








