You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधींच्या भेटीत रफालचा विषयच निघाला नाही - पर्रिकर
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते मनोहर पर्रिकरांशी मंगळवारी झालेली भेट वादात सापडली आहे. आणि त्याचं कारण आहे रफाल घोटाळ्याचं प्रकरण.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी गेले तीन दिवस गोव्यात होते. अर्थात हा दौरा राजकीय नसून खासगी असल्याचं सांगितलं जात होतं.
याच दौऱ्यात काल राहुल गांधींनी मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. आपण केवळ पर्रिकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, मात्र यावेळी पर्रिकर यांनी आपला रफाल घोटाळ्यात हात नसल्याचं म्हटलं होतं. असा दावा राहुल यांनी केला होता.
अर्थात राहुल यांचं हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलं. ज्यावर मनोहर पर्रिकर यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.
भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी एएनआय वृत्तसंस्थेचं एक ट्वीट रीट्वीट केलं आहे. ज्यात मनोहर पर्रिकर यांनी राहुल गांधींना पाठवलेलं लेखी उत्तर आहे.
ज्यात मनोहर पर्रिकर यांनी म्हटलंय की, "तुम्ही या वैयक्तिक भेटीला राजकीय फायद्यासाठी वापरलं, याचं मला फारच वाईट वाटतं. जी काही पाच मिनिटं तुम्ही आमच्यासोबत घालवली त्यात रफालवर कुठलीही चर्चा झाली नाही."
पर्रिकरांच्या या पत्राला रीट्वीट करताना अमित शाह म्हणतात की, "प्रिय राहुल गांधी, एका आजारी व्यक्तीच्या नावाखाली खोटारडेपणा करुन तुम्ही किती असंवेदनशील आहात, हे दाखवून दिलंत. देशवासीय तुमच्या या कृतीमुळे हैराण झालेत"
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मनोहर पर्रिकरांची भेट घेताना ही वैयक्तिक आणि राजकीय शिष्टाचार म्हणून घेतलेली भेट आहे, असं म्हटलं होतं.
मंगळवारी गोवा विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये राहुल आणि पर्रिकर यांची भेट झाली होती.
त्यांच्या या संवेदनशील कृतीचं सोशल मीडियावर कौतुकही झालं. पण त्यानंतर कोच्चीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी रफालचा मुद्दा छेडला. शिवाय पर्रिकरांशी झालेल्या भेटीचा हवाला दिला.
राहुल यांनी म्हटलं की "मित्रांनो, नरेंद्र मोदींनी अनिल अंबानींना ज्या रफाल डीलमध्ये फायदा मिळवून दिला, त्यात आपला हात नसल्याचं स्वत: मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केलं आहे."
अर्थात राहुल यांनी पर्रिकर यांची भेट घेतल्यानंतर हा मुद्दा सातत्यानं चर्चेत होता की, राहुल गांधींनी रफालचं एवढं भांडवल केल्यानंतर ते ते पर्रिकरांना भेटायला का गेले?
काही विश्लेषकांच्या मते रफालचा मुद्दा काढून राहुल गांधी हे प्रकरण बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत असावेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)