'मणिकर्णिका'वरून राणी लक्ष्मीबाईंच्या वंशजांनी निर्मात्यांना कोर्टात खेचलं

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित 'मणिकर्णिका' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र लक्ष्मीबाईंच्या वंशजांनी चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यावर आक्षेप नोंदवला आहे.

'मणिकर्णिका'मध्ये कंगना रणावत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. झी स्टुडिओज तसंच कमल जैन आणि निशांत पिट्टी यांच्या सहनिर्मितीत हा सिनेमा तयार झाला आहे आणि तो 25 जानेवारीला देशभर प्रदर्शित होणार आहे.

पण त्यापूर्वीच लक्ष्माबाईंच्या पाचव्या पिढीचे वंशज असलेले विवेक तांबे यांनी काही आक्षेप नोंदवत निर्मात्यांना कोर्टात खेचलं आहे. आम्ही त्यांचे नेमके आक्षेप त्यांच्याकडूनच जाणून घेतले.

"19 नोव्हेंबर 1835 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात, मराठी कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबात राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला. संसदेतर्फे काही वर्षांपूर्वी राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळीही त्यांची जन्मतारीख 19 नोव्हेंबर 1835 अशीच दाखवण्यात आली. सरकारी दरबारी असलेल्या कागदपत्रांमध्येही हीच तारीख आहे.

"वर्षानुवर्षे शाळा तसंच महाविद्यालयांमध्ये राणी लक्ष्मीबाई यांचा जन्मदिन 19 नोव्हेंबर 1835 हेच शिकवण्यात येतं. मात्र 'मणिकर्णिका' चित्रपटाच्या पोस्टर लाँचवेळी त्यांची जन्मतारीख 19 नोव्हेंबर 1828 दाखवण्यात आली. हा बदल का करण्यात आला?" असा पहिला आक्षेप ते नोंदवतात.

पहिल्या स्वातंत्र्ययुद्धा वेळी अर्थात 1857च्या स्वातंत्र्यसंग्रामात राणी लक्ष्माबाई लढल्या होत्या. त्यातच त्यांनी 1858 मध्ये त्यांनी हौतात्म्य पत्करलं. त्यावेळी त्यांचं वय 23 होतं.

परंतु, "चित्रपटात मृत्यूसमयी त्यांचं वय 30 दाखवण्यात आलं आहे. ऐतिहासिक तथ्यांची अशी मोडतोड का करण्यात आली?" असा दुसरा आक्षेप तांबे यांनी नोंदवला आहे.

तांबे सांगतात की राणी लक्ष्मीबाई यांचा 1842 मध्ये राजा गंगाधर नेवाळकर यांच्याशी विवाह झाला होता. त्यावेळी त्या 7 वर्षांच्या होत्या. झाशीमधल्या गणेश मंदिरात हा विवाहसोहळा झाला होता.

"मात्र चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच्या व्हीडिओत विवाहसमयी त्यांचं वय 14 दाखवण्यात आलं आहे," असा तांबे यांचा दावा आहे.

"राणी लक्ष्माबाई यांचा गर्भपात झाला, असं चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हे अगदीच चुकीचं आहे. 1851 मध्ये राणी लक्ष्माबाई यांनी एका मुलाला जन्म दिला. अवघा चार महिन्यांचा असताना या मुलाचा मृत्यू झाला. एखाद्या ऐतिहासिक महत्त्वपूर्ण अशा व्यक्तीच्या आयुष्यासंदर्भात, त्यांच्या मातृत्वावर प्रश्नचिन्ह का घेण्यात यावं? राणी लक्ष्माबाई यांचा जन्म, मृत्यू आणि आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटनांसंदर्भातील तथ्यांची मोडतोड करण्याचा अधिकार चित्रपटाची निर्मिती करणाऱ्यांना कुणी दिला?" असा सवाल तांबे उपस्थित करतात.

राणी लक्ष्माबाई यांच्या जन्मतारखेसंदर्भात तांबे यांनी झी स्टुडिओजच्या लिगल विभागाला मेल केला आहे. या मेलला महिनाभरानंतर उत्तर देण्यात आलं. राणी लक्ष्माबाई यांच्या जन्मतारखेसंदर्भात या गोष्टी निदर्शनास आणल्याबद्दल झी स्टुडिओजने तांबे यांचे आभारही मानले, असा त्यांचा दावा आहे.

मात्र लक्ष्मीबाई यांच्या जन्मतारखेचा चुकीचा उल्लेख हा प्रसारमाध्यमांनी केल्याचा दावा झी स्टुडिओजनं केल्याचं तांबे सांगतात.

दोन वर्षांपूर्वी राणी लक्ष्माबाई यांचं जन्मस्थळ असलेल्या वाराणसी इथं 'मणिकर्णिका' चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर उत्तर प्रदेशातील स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये चित्रपटासंबंधी बातम्या छापून आल्या. त्यामध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्या जन्मतारखेचा चुकीचा उल्लेख होता, असं तांबे यांनी सांगितलं.

तांबे यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा विषय सिव्हिल अंतर्गत येत असल्याचं सांगत त्यांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. बऱ्याच पाठपुराव्यानंतर तक्रार दाखल करून घेतली.

दरम्यान हे प्रकरण कोर्टात निकाली निघालं आहे, त्यामुळे आम्ही त्यावर काहीही प्रतिक्रीया देणार नाही असं, झी स्टडिओ तर्फे बीबीसी मराठीला सांगण्यात आलं.

तांबे यांनी उल्हासनगरच्या न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. तांबे यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडली. 4 फेब्रुवारीपर्यंत कोर्टानं निकाल राखून ठेवला आहे. दरम्यान, तांबे यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)