ऊस दरावरून आंदोलन पेटले; दक्षिण महाराष्ट्रात भडका #5मोठ्याबातम्या

जाळपोळ

फोटो स्रोत, Raju Sanadi

फोटो कॅप्शन, रेठरे हरणाक्ष येथील कृष्णा सहकारी कारखान्याच्या गट ऑफिसमध्ये जाळपोळ झाली.

आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या या आहेत पाच महत्त्वाच्या बातम्या :

1. ऊसउत्पादाक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण

एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाला सांगली आणि सातारा जिल्ह्यांत हिंसक वळण लागले आहे.

वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष इतल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे आणि घोगाव इथल्या क्रांती सहकारी साखर कारखान्यांचे गट कार्यालयांत कार्यकर्त्यांनी जाळपोळ केली.

सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी कारख्यांन्यांच्या कार्यालयांना शेतकऱ्यांनी टाळेही ठोकले आहे. सांगलीतीलच घोगाव येथील गटकार्यालय पेटवल्यानंतर ऊस पट्ट्यातील अनेक प्रमुख गावांतील कारखान्यांच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले.

कराडमधील दत्त चौकातील गट ऑफिसला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टाळे ठोकले. पुढारीने याबाबत वृत्त दिले आहे.

2.नगरमध्ये राष्ट्रवादीच्या 18 नगरसेकांची हकालपट्टी

अहमदनगरमध्ये महापौर निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या 18 नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून काढून टाकले आहे.

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

तसेच या घडामोडींची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना न देणारे पक्षाचे शहराध्यक्ष माणिकराव विधाते यांचीही पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी दुपारी ही कारवाई केली.

भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय मी घेतला होता असे जाहीर सांगणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांच्यावर मात्र राष्ट्रवादीने कोणतीही कारवाई केलेली नाही, असं लोकसत्ताने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

3. बेस्टचा संप कायम

वेतनाचा सुधारित करार, दिवाळीमध्ये सानुग्रह अनुदान आणि बेस्टचे महानगरपालिकेत विलिनीकरण अशा मुद्द्यांवर अजूनही तोडगा निघाल्यामुळे बेस्ट कामगारांचा संप कायम राहिला आहे.

बेस्ट बस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बेस्ट बस

शनिवारी झालेल्या बैठकीतही यावर ठोस निर्णय झाला नाही. सोमवारी यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

शनिवारी बेस्ट कामगार कृती समितीच्या शिष्टमंडळाची मंत्रालयात मुख्य सचिवांच्या दालनात बैठक झाली.

या बैठकीला मुख्य सचिव डी. के. जैन, परिवहन सचिव आशिष कुमार सिंग, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर, महापालिका आयुक्त अजय मेहता, बेस्ट व्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे उपस्थित होते.

कामगारांनी लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. लोकमतने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

4. साहित्य संमेलनाच्या समारोपालाही मुख्यमंत्री उपस्थित राहाणार नाहीत

नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण रद्द केल्यामुळे संमेलनाबाबत तयार झालेल्या चर्चांना अजूनही विराम मिळालेला नाही.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणवीस

यवतमाळ येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य समंलेनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता समारोपालाही उपस्थित राहाणार नाहीत.

मुख्यमंत्री भाजप कार्यकारिणी बैठकीसाठी नवी दिल्ली येथे गेल्याने ते उद्घाटनाच्या दिवशी उपस्थित राहू शकले नव्हते. रविवारी मुख्यमंत्री दिवसभर मुंबईमध्ये आहेत.

मुंबईतील विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहाणार असून माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या श्रद्धांजली सभेला ते उपस्थित राहाणार आहेत. महाराष्ट्र टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

5. 10 टक्के आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी

सामान्य वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये 10 टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे.

रामनाथ कोविंद

फोटो स्रोत, PIB

या कायद्यामुळे घटनेच्या 15 व्या 16 व्या कलमामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी विशेष तरतूद असा उल्लेख त्यामध्ये करण्यात येणार आहे.

9 जानेवारी रोजी हे विधेयक संसदेत मंजूर झाले होते. लोकसभेत हे विधेयक 323 मतांनी तर राज्यसभेत 165 मतांनी मंजूर झाले होते.

इकॉनॉमिक टाइम्सने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)