पॅरिस : शहराच्या मध्यवर्ती भागात स्फोट, 12 जण गंभीर जखमी

फोटो स्रोत, EPA
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आज सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात 12 जण गंभीर जखमी झाले. 9 अॅरॉनडिसेमेंट भागातील रु डी ट्रेवाईझ भागात झालेल्या स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती त्यामुळे आसपास उभ्या असलेल्या कार आणि इमारतींचे नुकसान झाले.
स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. एका बेकरीमध्ये गॅस गळती झाल्यामुळे हा स्फोट झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
बचाव कार्यात अडथळा येऊ नये, यासाठी नागरिकांना दुर्घटनास्थळापासून लांब राहण्यास सांगण्यात आले. स्फोट होताच रस्त्यावर दुकानांच्या काचांचा खच पडला. तर जवळच असलेल्या बेकरीला आग लागली.
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे गृहमंत्री क्रिस्टोफे कॅस्टॅनर यांनी सांगितले.

फोटो स्रोत, AFP
फ्रान्समध्ये सध्या सरकारी धोरणांविरोधात 'येलो वेस्ट' आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाअंतर्गत येत्या शनिवारी पॅरिस आणि फ्रान्समधील इतर शहरांमध्ये मोर्चे निघणार आहेत.
त्यासाठी 80 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मात्र स्फोटाचा या आंदोलनाशी संबंध नसावा असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
नेमके काय झाले?
ले परिशन वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार स्फोटावेळी 'द हुबर्ट' बेकरी बंद होती.
त्यानंतर एका इमारतीत वायू गळती होत असल्याची माहिती मिळाली. मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचणार इतक्यात स्फोट झाला.
हेलिकॉप्टरच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.
स्फोटाची तीव्रता आणि त्यामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची माहिती जवळूनच जाणाऱ्या स्थानिक पत्रकार इमिली मोली यांनी ट्वीट करून दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
याच भागात राहणारे किलिअन हे झोपले होते. त्याचवेळी स्फोटामुळे त्यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. इमारतीतील सर्व रहिवासी उतरून खाली आले आणि सगळीकडे आरडाओरड सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
या स्फोटात जवळच असलेल्या एका थिएटरचेही नुकसान झाल्याचे त्यांनी BFMTV या फ्रेन्च न्यूज चॅनलला सांगितले.
स्थानिक रहिवासी असलेल्या क्लेअर सॅलावुर्ड यांनी AFP वृत्तसंस्थेला सांगितले, "मी झोपले होते आणि स्फोटाच्या आवाजाने मला जाग आली."इमारतीतील सर्व खिडक्या फुटल्या. कड्या तुटल्याने दरवाजे पडले. मी दरवाज्यावरून चालत घरातून बाहेर पडले. मुलं खूप घाबरली होती. त्यांना त्यांच्या खोलीतून बाहेरही पडता येत नव्हते."

फोटो स्रोत, AFP
शेजारच्याच डिवा हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट असलेल्या पाउला नागुई म्हणाल्या, "स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे आमच्या खिडक्या फुटल्या."
स्फोटामुळे हॉटेलमधील पाहुणे घाबरले होते. मात्र हा अतिरेकी हल्ला नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.
निदर्शनांसाठी एवढा बंदोबस्त का?
फ्रान्समध्ये इंधनावरील करवाढीविरोधात 17 नोव्हेंबरपासून निदर्शनं सुरू झाली आहेत. सलग नवव्या शनिवारी निदर्शनं करण्यात येणार आहेत. लांबूनही लक्ष वेधून घेतील असे पिवळे जॅकेट्स आंदोलक घालत असल्याने या आंदोलनाला 'येलो वेस्ट' आंदोलन म्हटले गेले.
या आंदोलनाने संपूर्ण फ्रान्समध्ये रस्ते वाहतूक खोळंबली. इतकेच नाही तर या आंदोलनादरम्यान फ्रान्सने गेल्या काही दशकातील सर्वाधिक हिंसक घटनाही बघितल्या.
येत्या शनिवारी यलो वेस्टचे आंदोलक पॅरिसमधील अर्थमंत्रालयाबाहेर आंदोलन करण्याची शक्यता आहे.
परवानगी न घेता आंदोलन करणाऱ्यांना शिक्षा करण्याचा विचार असल्याचे पंतप्रधान एडवर्ड फिलिपे यांनी म्हटले आहे.
या आंदोलनामुळे दहा जणांचा बळी गेल्याचं सरकारचे म्हणणे आहे. दहापैकी एका वृद्धेचा ती घरात असताना अश्रू धुराचा हातबॉम्ब चेहऱ्यावर लागून मृत्यू झाला होता.

फोटो स्रोत, AFP
आतापर्यंत दीड हजारांहून जास्त आंदोलक जखमी झाले आहेत. त्यातील 53 जण गंभीर जखमी होते. तर हजारांहून जास्त सुरक्षा रक्षकही जखमी झाले, अशी माहिती एका फ्रेंच टीव्हीने 5 जानेवारीला दिली.
6 जानेवारीला 5,339 निदर्शकांना ताब्यात घेण्यात आले. तर 152 जणांना अटक झाली, अशी माहिती कायदा मंत्र्यांनी एल-एक्सप्रेस या वर्तमानपत्राला दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








