'मा. पंतप्रधान मोदी, कृपया आमच्या गावचे नाव बदलावे कारण...'

हरप्रीत कौर, हरियाणा राज्यातील मुलगी
फोटो कॅप्शन, आपल्या गावाचं नाव बदलण्यासाठी हरप्रीत कौरने पंतप्रधानांना पत्र लिहून विनंती केली होती.
    • Author, अरविंद छाब्रा
    • Role, बीबीसी पंजाबी प्रतिनिधी

जन्मजात काही तरी विचित्र नाव किंवा आडनाव असलेल्या अनेक व्यक्ती तुम्हाला माहिती असतील. अनेकांनी तर अधिकृतपणे त्यांना लाजीरवाणी वाटणारी ही नावंही बदलून नवीन नावं ठेवली आहेत. पण जर एका अख्ख्या गावाचं नाव तिथल्या ग्रामस्थांसाठी लाजीरवाणं असेल तर?

हो, आहेत काही गावं, जिथल्या गावकऱ्यांना त्यांची नावं बदलायची आहेत. हरियाणा आणि राजस्थानमध्ये अशी अनेक गावं आहेत ज्यांची नावं विचित्र असल्याने ती बदलावी, यासाठी गावकरी गेली अनेक वर्ष लढा देत आहेत.

"माझ्या गावाचे नाव गंदा (घाणेरडा) आहे." हे पत्र हरप्रीत कौर यांनी 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं होतं. गावातील कुणाचाही अपमान करण्यासाठी हे नावच पुरेसे असल्याचं सांगत त्यांनी हे पत्र लिहून गावाचं नाव बदलण्याची मागणी केली होती.

त्या पत्रात लिहितात, "परिस्थिती इतकी वाईट आहे की आमचे नातलगच गावाच्या नावावरून आमची टर उडवतात."

या पत्रानंतर 2017 साली पंतप्रधानांनी संबंधित अधिकाऱ्यांना गावाचं नाव बदलण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर हरियाणातील या गावाचे नाव बदलून आता 'अजित नगर' करण्यात आलं आहे.

गावचे सरपंच लकविंदर राम सांगतात, नामांतरासाठी गावकऱ्यांनी सरकारदरबारी अनेक वर्षं खेटे घातले. "त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तेव्हा गावातील एखाद्या तरुण व्यक्तीने थेट पंतप्रधानांनाच साकडं घालावं, असं आम्ही ठरवलं."

अखेर त्यांच्या गावाचं नाव आता बदलण्यात आलं आहे. ते सांगतात, "गावात अशी एकही व्यक्ती नव्हती जिला गावाचं नाव बदलू नये, असं वाटत होतं."

अनेक वर्षांपूर्वी आलेल्या महापुरावरून गावाचं गंदा हे नाव पडल्याचं गावकरी सांगतात. महापुरानंतर पाहाणी करायला आलेल्या सरकारी अधिकाऱ्याने पुरासोबत बराच कचरा गावात वाहून आल्याचं बघितलं. त्यानेच गाव खूप 'गंदा', म्हणजेच 'घाण' झाल्याचा शेरा दिला आणि तेव्हापासूनच गावाला हेच नाव पडलं.

नावामुळे गावच्या मुलींशीही कुणी लग्न करत नव्हतं, असं सरपंच सांगतात. ते म्हणतात, "आता आम्हाला मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतं."

गेल्या काही वर्षात अशी जवळपास 50 गावं आहेत, जिथल्या गावकऱ्यांनी गावाचं नाव बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे तगादा लावला आहे. कारणं वेगवेगळी आहेत. काहींची नाव जातीवाचक आहेत तर काहींची खूप विचित्र किंवा अत्यंत लाजीरवाणी.

वरिष्ठ केंद्रीय अधिकारी असलेले कृष्णकुमार सांगतात, "जवळपास 40 गावांची विनंती मान्य करण्यात आली आहे आणि त्याची अंमलबजावणीदेखील करण्यात आली आहे."

मुगलसराई स्टेशन
फोटो कॅप्शन, मुगलसराई वाराणसीपासून 20 किमी अंतरावर आहे.

यातील एका गावाचे नाव होते 'किन्नर' म्हणजे तृतीयपंथीय. 2016 साली या गावाचेही नाव बदलून गैबी नगर करण्यात आले.

राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील एका गावाचे नाव होते 'चोर बसाई'. नावात चोर असल्याने गावकऱ्यांनी हे नाव बदलण्याची विनंती केली आणि आता या गावाच्या नावातून चोर शब्द बाद होऊन ते केवळ 'बसाई' एवढंच ठेवण्यात आलं आहे.

मात्र गावाचं नाव बदलण्याची सरकारी प्रक्रिया सोपी नाही. या प्रक्रियेची सुरुवातच राज्य सरकारला आपला मुद्दा पटवून देण्यापासून होते. राज्य सरकारने आपला मुद्दा मान्य केल्यावर फाईल केंद्र सरकारकडे पाठवली जाते. कारण नामांतराचे अंतिम अधिकार केंद्राकडेच असतात.

नामांतराची विनंती मंजूर करण्याआधी केंद्र सरकारलाही रेल्वे, पोस्ट आणि सर्व्हे ऑफ इंडिया, यासारख्या सरकारी खात्यांकडून मंजुरी मिळवावी लागते. गावाला जे नवीन नाव देण्यात येणार आहे, ते इतर कुठल्या गावाला तर दिलेले नाही ना, याची खातरजमा करण्यासाठी ही प्रक्रिया पार पाडावी लागते.

लुला अहिर गावातील फलक
फोटो कॅप्शन, लुला अहीर येथे दिशा दाखवणारा फलक

हरियाणात 'लूला अहीर' नावाचं गाव आहे. 'लूला' अर्थात मराठीत 'लुळा' हा शब्द अपंग व्यक्तीचा अवमानकारक उल्लेख करताना वापरतात. हे नाव बदलण्यासाठी गावकऱ्यांना प्रशासनाशी बराच संघर्ष करावा लागतो आहे.

गावाचं नाव बदलावं, यासाठी गावकऱ्यांनी पहिल्यांदा 2016 साली राज्य सरकारकडे विनंती केली. गावचे सरपंच विरेंदर सिंह सांगतात, "गावाला 'देव नगर' नाव देण्याची विनंती आम्ही केली होती."

त्यांनी सहा महिने वाट बघितली. त्यानंतर भारतात याच नावाने दुसर एक गाव असल्याचं पत्र त्यांना मिळालं.

त्यानंतर पुन्हा नवीन नावाचा शोध घेण्यात आला आणि गावाचं नाव 'कृष्ण नगर' ठेवावं, अशी विनंती गावकऱ्यांनी केली. सरपंच विरेंदर सिंह सांगतात, "आम्ही पुन्हा प्रशासनाला पत्र लिहिलं. मात्र या खात्यातून दुसऱ्या खात्यात अशी टोलवाटोलवी सुरू झाली."

जुलै 2018 मध्ये हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी गावाचं नाव बदलणार असल्याची घोषणा केली आणि गावकऱ्यांना पुन्हा आशेचा किरण दिसू लागला. मात्र त्यांचा आनंद अल्पकाळच टिकला. कारण नामांतराचा निर्णय केंद्र सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आला नव्हता.

गावकऱ्यांची विनंती अजूनही 'विचाराधीन' असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. "तेव्हापासून आम्ही फक्त वाट बघत आहोत," विरेंदर सिंह सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)