पुण्यात हेल्मेट वापरण्याचे आदेशः ‘माझ्या प्रांजलीने हेल्मेट घातलं असतं तर तिचा जीव वाचला असता...'

प्रदीप निफाडकर आणि प्रांजली

फोटो स्रोत, FACEBOOK/PRADEEP NIPHADKAR

फोटो कॅप्शन, प्रदीप निफाडकर आणि प्रांजली.
    • Author, प्रदीप निफाडकर
    • Role, ज्येष्ठ कवी

पुण्यात शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. हेल्मेट न घातल्यामुळे अपघातात जीव गमवावा लागलेल्या लोकांचीही संख्या मोठी आहे.

ज्येष्ठ कवी प्रदीप निफाडकर यांनी हेल्मेटच्या निमित्ताने आपल्याच घरात घडलेल्या दुर्घटनेबद्दल बीबीसीला सांगितलं. त्यावर आधारित लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

line

माझी लाडकी मुलगी, प्रांजली, हिचा अपघाती मृत्यू झाला. जर-तरच्या गोष्टी काही उपयोगी नसतात. पण तिने हेल्मेट घातलं असतं तर कदाचित आम्ही आयुष्यभरासाठी दुःख घेऊन हे जग पहात बसलो नसतो. पण ती गेली आणि सांत्वनाला राज्यभरातून लोक येऊ लागले.

मी दुसऱ्याच दिवशी एक आवाहन केले की, तुम्ही मला भेटायला येऊन वेळ, पैसा वाया घालवत आहात. शिवाय हे करून माझं दुःखही हलकं होणार नाही की माझी मुलगीही मला परत मिळणार नाही.

तेव्हा त्याऐवजी तुम्ही त्या पैशात एक हेल्मेट विकत घ्या आणि तुमच्या ओळखीच्या अगर अनोळखी मुला-मुलींना ते भेट द्या. त्याचा एक सेल्फी मला पाठवा. त्याला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला. माझ्या अनेक मित्रांनी, अनेक चाहत्यांनी आणि अनेकांनेक बिगर ओळखीच्या लोकांनी तसं करून मला फोटोही पाठवले.

इतकंच काय झील एज्युकेशन संस्थेनं त्यांच्याकडे शिकणाऱ्या हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींना हेल्मेट भेट द्यायचं ठरवलं. तसा समारंभही माझ्या हस्ते हेल्मेट भेट देऊन पार पडला.

एक चांगलं हेल्मेट साधारणतः 800 रुपयांपर्यंत मिळतं. हजारो मुलांना द्यायला मी काही बिल गेटस् नाही की अंबानी. मग मी आणि माझे मित्र अनिल मंद्रूपकर यांनी 'हेल्मेट पुणे' ही स्वयंसेवी संस्था काढली. त्याद्वारे शक्य त्या गरीब मुला-मुलींना हेल्मेट भेट द्यायचं ठरवलं.

पण इथं बळजबरी नाही. इथं पैशाचा व्यवहार नाही. ज्याला वाटेल त्याने भेट द्यावं. न दिल्यास कोणावर रोषाचंही कारण नाही. एकीकडे माझी ही लढाई सुरू असतानाच दुसरीकडे काय घडत होतं ते बघण्यासारखं आहे.

प्रांजलीच्या निधनानंतर प्रदीप निफाडकर यांनी हेल्मेटसाठी केलेले आवाहन

फोटो स्रोत, FACEBOOK/PRADEEP NIPHADKAR

फोटो कॅप्शन, प्रांजलीच्या निधनानंतर प्रदीप निफाडकर यांनी हेल्मेटसाठी केलेलं आवाहन.

महाराष्ट्रात सरकार दर जानेवारीला एक खेळ खेळत असतं. संपूर्ण महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. पण कोणत्याही जिल्ह्यात न जाता सरकार फक्त आणि फक्त पुणे जिल्ह्यातच हेल्मेट सक्ती सुरू करते. मग जे हेल्मेट वापरणार नाहीत त्यांना पोलीस दंड करतात.

दंडाची ठराविक रक्कम वसूल झाली की नागरिकांच्या विरोधामुळे आम्ही सक्ती मागे घेत आहोत, असं सरकार जाहीर करतं आणि पुन्हा पुढच्या एक जानेवारीची वाट पाहतं. हा खेळ एक दोन वर्षें नाही तर चक्क तीस वर्षें चालू आहे.

खरंच सरकारला जर अपघात बळींची काळजी असेल तर सरकार दिरंगाई का करते हे कुणालाच कळालेलं नाही. दोन वर्षांपूर्वी पोलिसांचा बडगा दाखवून काहीही न झाल्यानं परिवहन मंत्र्यांनी पेट्रोल पंपाच्या खांद्यावर बंदूक ठेवली होती.

जो हेल्मेट न घालता पंपावर पेट्रोल भरायला येइल त्याला पेट्रोलच मिळणार नाही. पंपांनी त्याला विरोध केला. मग सरकारने ठरल्याप्रमाणे नमते घेतले आणि पुन्हा पुढच्या एक जानेवारीच्या खेळाची तयारी करीत बसले.

गंमतीचा भाग म्हणजे त्यावर्षीच नव्हे तर त्यानंतरही पुणे पोलिसांनीच हेल्मेट न घालण्याचं ठरवून सरकार आमचं काही करू शकत नाही असं दाखवून दिलं. तर सामान्य माणूस सरकारला कशाला भीक घालेल? खरंतर हेल्मेट हा सक्तीचा विषय होऊ नयेच, पण सक्तीशिवाय आम्हाला काही कळतच नाही त्याला काय करणार?

ज्या घराची किंमत 50-60 लाख रुपये इतकी आहे, त्या घराच्या सुरक्षेसाठी दरवाजा, जाळीचा दरवाजा, कुलूप (सॉरी, कुलूप नव्हे, कुलपं) असा सारा इंतजाम करतो, पण ज्या जीवाची किंमत कैक खर्व-निखर्वाची आहे, त्यासाठी 800 रुपयांचं हेल्मेट घेत नाही आणि घेतलं तर घालत नाहीत, ही शोकांतिका आहे.

तेलंगणा आणि मध्यप्रदेशात सरकारने सक्ती केल्यावर नागरिक हेल्मेट घालूनच पेट्रोल घेऊ लागले आहेत. अर्थात तिथंही सिग्नल न पाळणारे काही महाभाग जसे आहेत तसे हेल्मेट न घालता पेट्रोल घेणारे आहेत. पण त्यांचं प्रमाण फार कमी आहे.

भोपाळ विद्यापीठाने तर कायदा केला आहे जो दुचाकीस्वार हेल्मेट घालणार नाही आणि जो चारचाकीवाला बेल्ट लावणार नाही त्याला प्रवेश नाही. तसंच महाराष्ट्रात व्हावं ही इच्छा आहे पण लोकांना हेल्मेट का नको, त्याची कारणमींमासा केली पाहिजे.

हेल्मेट काही काल-परवा आलेलं नाही

खरोखरंच हेल्मेट घालणं हे काही नव्यानं आलं आहे का? सुमेर संस्कृतीत (इसवी सन पूर्वी सुमारे दीड हजार वर्षें) सर्वांत जुनं शिरस्त्राण म्हणजेच हेल्मेट किंवा शिरोकवच आढळून आलं आहे. ख्रिस्त पूर्वकाळात ग्रीस आणि रोममध्ये मेणात उकळून कडक केलेल्या चामड्यापासून किंवा पंचधातूंपासून बनवलेली शिरस्त्राणं वापरत.

नंतर त्याला पुढे किंवा मागे कोंबड्याचा तुरा जसा असतो तसा धातूचा तुकडा बसवत. ग्रीस देवता अथीनाचं छायाचित्र पाहिले की हे लक्षात येतं.

पुढे त्यात रोमच्या नागरिकांना करमणुकीसाठी जी युद्धं योजली त्यात ग्लॅडिएटर शिरस्त्राणं आली. म्हणजे ज्याला खाली-वर करायला एक झडप आणि बघण्यासाठी झरोका असे. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात म्हणजे मेसोपोटेमियन संस्कृतीत सोन्याची हेल्मेटं घातलेली आढळतात. (नव्या गोल्डमॅनसाठी ही चांगली बातमी.)

इ. स. 1200 नंतर हनुवटी आणि मान यांचाही हेल्मेटमध्ये सहभाग झाला. त्याला साखळीही असे. काही राजांच्या चित्रात तशी हेल्मटं दिसतात. पण खरी हेल्मेटं उदयाला आली ती इसवीसन 1500 च्या सुमारास. रोमच्या पोपचे संरक्षक ती वापरत.

प्रदीप निफाडकर

फोटो स्रोत, FACEBOOK/PRADEEP NIPHADKAR

फोटो कॅप्शन, दुःख बाजूला ठेवून मी हेल्मेटचे महत्त्व सोप्या शब्दांमध्ये सर्वांना पटवून देणार- निफाडकर

पोलादापासून बनविलेल्या शिरस्त्राणाचा वापर सुरू झाला तो पहिल्या महायुद्धापासून म्हणजेच 1914 ते 18च्या दरम्यान. 1914 ला फ्रेंच तर 1915 पासून ब्रिटिश सैनिकांनी ती वापरायला सुरूवात केली. गोळी किंवा तोफगोळा लागला तरी तो त्याला घासून जावा हा उद्देश होता. ती वजनाने हलकी होती. पाचव्या चार्ल्सने तर हिरेजडीत हेल्मेट ज्याला 'बर्गनेट' म्हणत ते वापरल्याचंही आढळते.

क्षुलल्क सबबी टाळा

आता खाणकामगार, बांधकाम कामगार, खेळाडू, अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस, मोटार स्पर्धेतील रायडर्स, क्रिकेटीअर्स आणि सैनिक हेल्मेट वापरतातच. अंतराळवीरही वापरतात. त्याला बऱ्याच सोयी असतात. म्हणजे लेझर किरणांनी रात्रीही दिसणे वगैरे.

एवढे सारे वापरतात तरी हेल्मेटला विरोध का होत आहे, त्याची कारणं तपासली तर त्यातील अनेक कारणं द्यायची म्हणून दिली गेलेली आढळते. उदाहरणार्थ, हेल्मेटमुळे डोक्यावरचे केस गळतात. वास्तविक केस गळणे ही नैसर्गिक प्रक्रीया आहे.

ज्या महिला घरातच असतात त्यांचेही केस गळतात, मग? आणि आपळ्याकडे केसांमध्येच सौंदर्य दडलंय असा उगाचच गैरसमज आहे.

पर्सिस खंबाटापासून शबाना आझमी आणि सारिका यांच्यापर्यंत अभिनेत्रींनी टक्कल करून हे दाखवले आहे की सौंदर्य हे केसांमध्ये नाही. ते आतील विचारांवर, मनावर आहे.

तेव्हा केस गळतात हे कारण फोल आहे. आणि तेही गळाले तरी हरकत नाही. जीव महत्त्वाचा की केस? समजा केस गळालेच तर?

अहो, ज्यांना कर्करोग झाला आहे त्यांना बघा. केमोथेरपीने त्यांचे संपूर्ण केस जातात, पुन्हा येतात. त्यांचं तसं होतं तर तुमचं का होणार नाही? उलटपक्षी हेल्मेटमुळे स्टोल किंवा स्कार्फ वापरायची गरज नाही. शिवाय रस्त्यावरची धूळ चेहऱ्यावर न आल्यामुळे मुरमं (पींपल्स) येत नाहीतच पण चेहरा काळवंडत नाहीच.

प्रदूषणापासूनही चेहरा, श्वास वाचू शकतो. डोळ्यात चिलटंही जात नाहीत. त्यामुळे तोल जाऊन होणारे अपघात वाचतात. केसावर धूळ बसत नाही. त्यामुळे ते राठ होत नाहीत.

हेल्मेट

फोटो स्रोत, FACEBOOK/PRADEEP NIPHADKAR

फोटो कॅप्शन, निफाडकर यांच्या विनंतीनंतर त्यांच्या मित्रांनी हेल्मेट्स वाटून त्याचे फोटोही पाठवले.

पूर्ण हेल्मेट घातलेला माणूस थुंकू शकत नाही. त्यामुळे आपोआपच सार्वजनिक स्वच्छता राहाते. हेल्मेट घातल्यावर मोबाइलवर आलेला फोन घेता येत नाही. त्यामुळे आपोआपच 'मोबाइलमुळे मृत्यू' हे प्रमाण कमी होतं.

शरीराचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे, डोकं किंवा मेंदू. डोकं भिजलं तर सर्दी होते, त्याला ऊन लागलं तर ताप येतो. त्याला गार वारा लागला नक्कीच तुम्ही आजारी पडाल. मग हे टाळण्यासाठी हेल्मेट हा खास उपाय नाही का?

हेल्मेट वापरणाऱ्यांना त्यांचे अनुभव नक्की विचारा

कितीही थंडी असू द्या निदान गार वारा लागणार नाही. उन्हात घाम येतो. येऊ द्या. तसं हल्ली कोणी घाम गाळत नाही. आला तर येऊ द्या. पण त्यामुळे हेल्मेट न वापरणे किती संयुक्तिक आहे? फक्त हेल्मेट आतून स्वच्छ कसं राहील याची काळजी घ्या. ती तर आपण हात वा पायमोज्याची घेतोच तशी घ्यायची. हेल्मेटधारकाला छत्रीची गरज नाही.

अंग भिजले तरी डोके शाबूत राहते. हेल्मेट घातले की ज्याला भेटावंसं वाटत नाही त्याला ओळखही देता येत नाही.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मेंदू हा सुजला तर त्याच्या सुजेला वाव नसतो, त्यामुळे तो सुजला की काम करायचे सोडतो आणि माणूस मरण पावतो.

बाकीच्या जागी तुम्हाला मुकामार लागला तरी सूज वाढायला वाव असल्याने त्या भागाचे काम बंद होत नाही. मेंदूचं तसं नाही. मेंदूने काम सोडलं तर संपूर्ण शरीर थंडच पडतं. तसं होऊ देऊ नका.

प्रदीप निफाडकर, हेल्मेट

फोटो स्रोत, PRADEEP NIPHADKAR

फोटो कॅप्शन, झील शिक्षणसंस्थेतर्फे हेल्मेट वाटप.

आता एक कारण सांगितलं जातं की हेल्मेटमुळे मान दुखते. काहीजण असेही विचारताना दिसतात की मणक्यांचा आजार आहे त्यांनी हेल्मेट वापरावे की नाही? मुळात ज्यांना मणक्यांचा वा मानेचा आजार आहे त्यांना दुचाकी चालवायलाच बंदी आहे. त्याने स्वतःची मोटार, सार्वजनिक वा सरकारी वाहतूक वापरावयाची आहे. त्यामुळे हाही प्रश्न निकाली निघतो.

जे हेल्मेट वर्षानुवर्षें वापरतात त्यांना विचारा की त्यांची मान दुखते का? तर नव्वद टक्के उत्तर 'नाही' असेच येईल.

हेल्मेटमध्ये काही बदल करता येतील का?

हेल्मेटच्या जनजागरणात एक महत्त्वाचा घटक आहे, उत्पादकांचा. त्यांच्यासाठी काही सूचना केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ पूर्वी एक घड्याळ आलं होतं. त्याची डायल महिलांच्या वेषभूषेसारखी मॅचिंग असायची. तशी मॅचिंग बाजू तयार केली तर मुली-स्त्रीया नक्कीच हेल्मेट वापरतील.

दुसरे आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ताचे हेल्मेट जागतिक मानांकनाने तयार केली आहेत. त्यामुळे चिनी वा जपानी लोकांना हे हेल्मेट घातलं तरी आजूबाजूचं, थोडं मागचं दिसतं कारण त्यांचे डोळे खोबणीत नाहीत. आपले आहेत. त्यांचे डोळे बाहेर म्हणजे भुवईच्या रांगेत आहेत. तरी हेल्मेटला अजून थोडा कर्व्ह द्यावा लागेल. तसेच जड हेल्मेट हलके कसे करता येईल ते पहावं लागेल.

आपण मोबाइलचा संच हलका केला ना? संगणक फ्लॅट केला ना? मग तेही करता येईल. किंवा हेल्मेटला दोन्ही बाजूला आरसे लावून मागील दोन्ही बाजूचे दिसू शकेल का ते बघता येईल. काही दुचाक्यांमध्ये हेल्मेट ठेवण्याची जागा विस्तृत झाली आहे.

पण अनेकदा त्या जागेत इतर गोष्टी ठेवल्या जातात आणि ती जागा अपुरी पडते. म्हणूनही कित्येकजण हेल्मेट नेत नाहीत. त्याऐवजी हेल्मेट ठेवायला वेगळी सोय व्हायला हवी.

त्यासाठी वाहन उत्पादकांशी चर्चा केली पाहिजे. शिवाय काही मुलांनी असे शोध लावले आहेत की वाहनधारकांने हेल्मेट घातलं नसेल तर गाडी सुरूच होणार नाही. त्यांच्या मदतीने तशी सोय प्रत्येक गाडीला करता आली तर उत्तम होईल.

जबाबदारी सर्वांचीच

उत्पादन वाढवायचं तर जाहिरात ही आवश्यकच आहे. पण दुर्दैवाने उत्पादक तशा जाहिराती करताना दिसत नाहीत. हेल्मेट नसेल तर वाहन चालविण्याचा परवानाच दिला नाही तर सक्तीची गरजही राहणार नाही. केवळ सरकार किंवा उत्पादकांनी काही करून होणार नाही तर समाजप्रबोधनासाठी प्रसारमाध्यमांचीही काही जबाबदारी आहे.

जर त्यांनी अपघाताच्या बातम्या देताना हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू असं आवर्जून छापावंत.

हेल्मेट न घालणाऱ्यांना तुमचा जीव आम्हाला प्रिय आहे. तुम्ही आम्हाला हवे आहात, असे आपणच समजावून सांगायला हवं.

आपल्या प्रिय व्यक्तीच्या जीवाची काळजी ज्याला असेल तो किंवा ती शपथ घालेल, पण हेल्मेट वापरालायला सांगेन. तसं व्हावं हीच खरी माझ्या मुलीसारख्या अपघातात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली ठरेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)