ईशा अंबानींच्या लग्नात अमिताभनी का वाढलं याचं अभिषकने दिलं स्पष्टीकरण

भारतातल्या लग्न समारंभात पंगतींची पद्धत आता हद्दपार होते आहे. पण ईशा अंबानीच्या लग्नात एक विशेष पंगत रंगली. कारण त्यात वाढपी होते सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि आमिर खान. या पंगतीचा व्हीडिओ व्हारयल झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केला की मुकेश अंबानी भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असल्यामुळे बॉलिवुड त्यांच्यासमोर लोटांगण घालत आहेत का?

या लग्नात अमिताभ बच्चनपासून दीपिका-रणवीरपर्यंत अवघं बॉलिवुड अवतरलं. फारसे लग्नसमारंभात न दिसणारे रजनीकांतही सपत्निक चेन्नईहून आले. सचित तेंडुलकरनेही उपस्थिती लावली. लता मंगेशकरांनी खास या जोडप्यासाठी प्रार्थना रेकॉर्ड करून पाठवली. जगप्रसिद्ध पॉपस्टार बियॉन्सेही परफॉर्म करून गेली. यातले अनेक कलावंत असे वावरले जणू हे त्यांच्या घरचं कार्य होतं. या वावरावर आणि कोट्यवधी रुपयांच्या खर्चावर अनेकांनी टीका केली.

फेसबुक युजर सचिन माळी म्हणतात, "ईशा अंबानींच्या लग्नात अमिताभ बच्चन आणि आमीर खान वाढपी म्हणून ताट वाढत होते. खरंच अर्थमेव जयते."

शशी चंद्रा यांच्या मते अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांनी एखाद्या गरीब मुलीच्या लग्नात जाऊन असं काही केलं असतं तर त्या कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नसता. अमिताभ आणि आमीर हे स्वत:च्या प्रसिद्धीसाठी हे सगळं करत आहेत, असं त्यांना वाटतं.

तर अभिषेकच्या लग्नातही अमिताभ यांनी असा पाहुणचार केला नसेल, अशी खोचक प्रतिक्रिया फरहात या ट्विटर युजरने दिली आहे.

एस. बालाकृष्णन यांनी या प्रकारावर टीकेची झोड उठवली आहे.

ते म्हणतात, "ईशा अंबानी यांना शुभेच्छा आहेतच. मात्र ईशाच्या वडिलांनी (मुकेश अंबानी) यांनी पैशाचा जो खेळ मांडला आहे त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. अमिताभ बच्चन आणि तिन्ही खान प्रभुतींनी वाढपी म्हणून काम करत आणि नृत्याविष्कार दाखवत स्वत:चं हसं करून घेतलं आहे."

अभिषेक बच्चन आणि सज्जन गोठ

यातल्या काही प्रतिक्रिया गैरसमजातून दिल्याचं अंबानींच्या सोशल मीडियाच्या पाठीराख्यांचं म्हणणं आहे. त्यातच अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या वडिलांवर होत असलेल्या टीकेला उत्तर देत लिलिहं आहे की अमिताभ बच्चन केवळ सज्जन गोठ नावाची परंपरा पाळत होते.

पण अमिताभ बच्चन कधीपासून अंबानींच्या घरातले सदस्य झाले, या टीकेला त्यांनी उत्तर दिलं नाही.

मुलीच्या घरच्यांनी पंगतीत बसलेल्या मुलाच्या घरच्यांना आणि पाहुण्यांना पोटभर खाऊ घालण्याची प्रथा मारवाडी-गुजराती समाजात आहे. त्याला सज्जन गोठ म्हणतात.

ही प्रथा मराठी लग्नातील व्याही भोजनासारखी असते. एकदा मुलाच्या घरच्यांचं जेवण झालं की मुलाच्या घरचे मुलीच्या घरच्यांना प्रेमाने खाऊ घालतात.

या प्रथेतूनच अमिताभ बच्चन यांनी पंगतीत वाढपीची भूमिका निभावली असं चिराग या ट्विटर युजर्सचं मत आहे.

चिराग यांच्याप्रमाणेच अनेक युजर्सनी अमिताभ यांच्या समर्थनार्थ आपली मतं मांडली आहेत.

निशित दवे म्हणतात, "गुजरातमध्ये घरातील ज्येष्ठ व्यक्ती आणि मुलीचे आईवडील पाहुण्यांना गोडधोड खाऊ घालायचा आग्रह करतात आणि त्यांचा मान ठेवतात. त्यामुळे अमिताभ यांनी जे केलं ते मान ठेवण्यासाठी केलं त्यात काही अपमानजनक नाही."

प्रकाश साळवी म्हणतात, "हा त्यांचा चॉईस आहे. आपल्याला लग्नाचं आमंत्रण नव्हतं त्यामुळे आपण याविषयी बोलण्यात काहीच अर्थ नाही."

अमिताभ आणि आमीर यांच्या या कृत्याबद्दल चर्चेचा धुरळा खाली बसत नाही तोच लता मंगेशकर यांनी ईशासाठी गायलेल्या भजनाचा व्हीडिओ समोर आला.

त्यांनी भजन सुरू करताच वधुपिता मुकेश अंबानी आणि नीता अंबानी भावूक झाल्याचं रिलायन्स पीआरने माध्यमांना पाठवलेल्या व्हीडिओमध्ये दिसत आहे.

बॉलिवुड तारेतारकांनी पैसे घेऊन आतापर्यंत अनेक लग्नांमध्ये डान्स केला आहे. पण लता मंगेशकरांनी कुठल्या लग्नासाठी गायल्याचं आतापर्यंत तरी ऐकिवात नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)