प्रियांका गांधी काँग्रेसच्या सक्रिय राजकारणात येणार का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
प्रियंका गांधींनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. ती ताजी बातमी तुम्ही इथे वाचू शकता -
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये या तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत काँग्रेस पक्षात चर्चा सुरू असताना एका नव्या घडामोडीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. ही घटना म्हणजे या प्रक्रियेच्यावेळेस प्रियांका गांधी यांची उपस्थिती.
तिन्ही राज्यांचे कौल काँग्रेसच्या बाजूने लागत असल्याचं स्पष्ट झाल्यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि UPA अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेटून पुढील वाटचालीबाबत चर्चा सुरू केली.
गुरुवारी काँग्रेसचे राजस्थानचे निरीक्षक के. सी. वेणुगोपाल तसंच पक्षाचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट यांच्याबरोबर राहुल गांधी यांच्याशी वेगवेगळ्या बैठका झाल्या. या महत्त्वाच्या बैठकांवेळेस प्रियांका यांची राहुल यांच्या निवासस्थानची उपस्थिती सर्वांच्याच भुवया उंचावणारी ठरली.
एकाच पक्षात दोन युवा नेते ?
आजवर प्रियांका गांधी सक्रिय राजकारणामध्ये येतील अशा अनेकवेळा चर्चा झालेल्या आहेत. तसंच त्या पक्षाच्या सक्रीय राजकारणामध्ये आल्यास राहुल गांधी यांच्यासमोर दुसरं सत्ताकेंद्र तयार होईल अशी चर्चाही केली जाते. त्यामुळे राहुल यांच्या पक्षांतर्गत स्थानालाच नकळत आव्हान निर्माण होईल अशी भीतीही व्यक्त केली जाते.
आता राहुल गांधी पक्षाध्यक्षपदी येऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तेही त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पहिलंच मोठं यश मिळाल्यानंतर प्रियांका यांनी उपस्थित होणं हे थोडं आश्चर्याचं वाटत आहे.
राजकीय सल्लागाराची भूमिका
सीएनएन न्यूज 18च्या ज्येष्ठ पत्रकार आणि गेली अनेक वर्षे काँग्रेसमधील घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या पल्लवी घोष यांच्यामते "आताच प्रियांका गांधी यांच्या राजकीय सक्रीयतेवर बोलणं घाईचे ठरेल. कारण आजवर प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांची पॉलिटिकल बॅकरुम सांभाळली आहे. राहुल यांच्या सल्लागाराची भूमिका त्यांनी वेळोवेळी पार पाडली आहे त्यामुळे आताही महत्त्वाच्या निर्णयाच्या वेळेस मदत करण्याचा निर्णय घेतला गेला असावा."
इतके दिवस राजकारणापासून दूर का?
प्रियांका गांधी सक्रीय राजकारणापासून स्वतःला दूर का ठेवतात, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. प्रियांका त्यांच्या मुलांच्या संगोपनात व्यग्र आहेत, अशा स्थितीत त्या राजकारणात कशा येतील? असा प्रश्न सोनिया गांधी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विचारला होता. राजकारणात कधी यायचं हे प्रियांकाच ठरवेल, असंही सोनिया म्हणाल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
रायबरेलीतून निवडणूक लढवणार?
रायबरेली हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. 1999 पासून लोकसभेचा हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि सध्याचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचाराची धुरा प्रियांका गांधी यांनी नेहमीच सांभाळली आहे.
प्रियांका गांधी या उत्तम संघटक मानल्या जातात. त्यामुळे 2019 साली प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढवून राजकारणात येण्याचा विचार केल्यास त्यांच्यासाठी रायबरेली मतदारसंघाची निवड होईल असे बोलले जातं.
रायबरेली मतदारसंघ काँग्रेससाठी सुरक्षित मानला जात असला तरी 1977 साली जनता पक्षाच्या राज नारायण यांनी याच मतदारसंघात इंदिरा गांधी यांचा पराभव केला होता. तसंच 1996 आणि 1998मध्ये भाजपाने तिथं विजय मिळवला होता.
इंदिरा गांधी यांच्यासारखीच छबी
प्रियांका गांधी यांचं व्यक्तीमत्त्व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच असून त्यांची केशभूषा आणि कपड्यांची निवड इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच आहे. त्यामुळे त्या दोघींमध्ये साम्य शोधलं जातं.
मोठ्या प्रचारसभांना आत्मविश्वासाने संबोधित करण्यासारखे त्यांचे गुण काँग्रेसच्या पारंपरिक आणि जुन्या मतदारांना पक्षाबरोबर बांधून ठेवण्यासाठी उपयोगी ठरतील असा विचार अनेकदा केला जातो.
यावर्षी काँग्रेसच्या महाअधिवेशनासाठी प्रियांका गांधी सक्रीय असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे आगामी काळात त्या वेळोवेळी पक्षाच्या कार्यक्रमात सक्रीय होताना दिसतील अशी चर्चा सुरू झाली.

फोटो स्रोत, Getty Images
रॉबर्ट वाड्रा यांच्यावरील गुन्हे आणि सततचा तपास
प्रियांका गांधी यांचं नाव समोर आल्यावर पाठोपाठ त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर असणाऱ्या घोटाळ्यांच्या आरोपाचा विषय काढला जातो. किंबहुना हे आरोप प्रियांका यांच्या राजकीय वाटचालीत अडथळा मानले जातात.
रॉबर्ट वाड्रा यांच्यावर जमिनव्यवहारात कथित घोटाळे केल्याचे आरोप आहेत. विविध तपास यंत्रणाद्वारे वारंवार तपास आणि न्यायालयीन प्रक्रीयेमुळेही त्यांचं नाव माध्यमांमध्ये येत असतं.
काहीवेळेस बनाना रिपब्लिकसारख्या वादग्रस्त उपमा किंवा ट्वीटरवरील कमेंटसमुळेसुद्धा रॉबर्ट वाड्रा यांनी वाद ओढवून घेतले आहेत.
नुकतंच राजस्थानमधल्या एका जमिन घोटाळ्यात त्यांचं नाव आल्यावर आपल्याला जाणूनबुजून अशा प्रकारे त्रास दिला जात असल्याचे ट्वीट त्यांनी केलं होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








