आज उल्कावर्षाव : आकाशात रंगला आहे तेजस्वी खेळ

उल्का

आजची रात्र ही अवकाश संशोधक, अवकाश निरीक्षकांसाठी पर्वणीची ठरणार आहे. कारण उल्कावर्षाव अनुभवण्याची चांगली संधी आजच्या रात्री जगभरात मिळणार आहे.

महाराष्ट्रातूनही हा वर्षाव दिसणार आहे. निरभ्र आकाशात कोणत्याही दुर्बिणीशिवाय हा वर्षाव पाहाता येईल.

9 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालवधीत होत असलेला या उल्कावर्षावाला Geminid Meteor Shower असं म्हटलं जातं.

विशेष म्हणजे कोणत्याही दुर्बिणीशिवाय रात्री 8 ते पहाटे 5पर्यंत उल्कावर्षाव पाहाता येईल. 9 डिसेंबरपासून सुरू असलेला हा उल्का वर्षाव आजही पाहाता येणार आहे.

या उल्का प्रति सेकंद 35 किलोमीटर इतक्या वेगाने पृथ्वीच्या वातावरणात येत आहेत.

कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेजमधील पदार्थ विज्ञान आणि खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद कारंजकर यांनी या उल्कावर्षाव संदर्भात दिलेली माहिती अशी :

उल्का वर्षाव म्हणजे काय?

आकाशात अनेक खगोलीय वस्तू फिरत असतात. अशा वस्तू पृथ्वीच्या कक्षेत येतात, पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करताना त्यांचे घनअस्तित्व संपून जाते आणि त्या जळून जातात.

उल्का

काही मोजक्याच उल्का या पाषाणाच्या स्वरूपात पृथ्वीवर पडत असतात. त्यांचा आकार लहान किंवा मोठा असू शकतो.

उल्का वर्षाव कधी दिसतो?

वर्षभरात एप्रिल, मे, जून, ऑगस्ट, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये उल्का वर्षाव दिसतो. डिसेंबरमध्ये होणारा उल्कावर्षाव सर्वोत्तम असतो. या उल्का वर्षावाला Geminid Meteor Shower म्हटलं जातं. यावेळी उल्कांचा मोठा जमाव पृथ्वीच्या कक्षेमधून जाऊ लागला की उल्कांचा वर्षाव पाहायला मिळतो. पृथ्वीची आणि उल्कांची कक्षा ठरलेली आहे. त्यामुळे ठराविक काळात आणि ठराविक वेळेतच उल्कांचा वर्षाव पाहायला मिळतो.

उल्का आणि तारकासमूह

आकाशामध्ये निरनिराळी तारकासमूह असून ज्या तारकासमूहातून उल्कावर्षाव होतो त्या तारकासमूहाला उल्कावर्षावाचे उगमस्थान म्हटलं जातं. 30 मे ते 14 जून या कालावधीमध्ये होणारा उल्का वर्षाव हा मेष राशीतून होत असतो. 16 ते 26 एप्रिल या कालावधीत स्वरमंडल या तारका पुंजातून उल्का वर्षाव होतो.

त्यांपैकी 21 ते 22 एप्रिलमध्ये होणारा उल्कावर्षाव जास्त असतो. ययाती या तारकासमूहातून दरवर्षी ऑगस्टमध्ये दिनांक 1 ते 20 या कालावधीत उल्का वर्षाव होतो, त्यातही जास्त उल्कावर्षाव 12 ऑगस्टला आढळतो. सिंह राशीतून 11 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत उल्कावर्षाव होतो. त्यातही 17 नोव्हेंबरला जास्त उल्कावर्षाव दिसून येतो. 24 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत देवयानी या तारकासमूहातून होत असतो.

उल्का

डिसेंबर 9 ते 14 या दरम्यान उल्कावर्षाव होणार असून दिनांक 13 डिसेंबरला जास्त प्रमाणात दिसला. तासाला 120च्या दरम्यान उल्का पडलेल्या आढळणार आहेत. या उल्कांचा रंग पिवळसर असतो.

कोठून आणि कधी पाहू शकाल हा उल्कावर्षाव?

हा उल्कावर्षाव पृथ्वीवर अंधार असणाऱ्या कोणत्याही ठिकाणावरून निरभ्र आकाश आकाशात हा वर्षाव सहज पाहाता येईल.

साधारणपणे मिथुन रास उगवल्यानंतर म्हणजे रात्री 8 ते 9 वाजता वर्षाव सुरू होईल. मिथुन रास डोक्यावर येण्याच्या वेळी म्हणजे रात्री 11च्या सुमारास वर्षाव अधिक स्पष्ट आणि जास्त दिसेल. हा वर्षाव पहाटे 5पर्यंत आणि मिथुन राशीकडून पृथ्वीच्या वेगवेगळ्या दिशेने दिसेल, अशी अशी माहिती खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी दिली.

उल्कावर्षाव पाहाण्यासाठी कोणत्या उपकरणांची गरज?

उल्कावर्षाव पाहाण्यासाठी कोणत्याही दुर्बिणीची किंवा उपकरणांची गरज लागणार नाही. उघड्या डोळ्यांनी तुम्ही उल्कावर्षाव पाहू शकता. थंडीचे दिवस असल्यामुळे उबदार कपडे सोबत असणे योग्य ठरेल, असं ते म्हणाले.

उल्का

फोटो स्रोत, Getty Images

सध्या आकाशात 46P/Wirtanen हा धुमकेतू दिसत आहे. तो सहज ओळखता येण्याची शक्यता कमी आहे. तो पाहाण्यासाठी मात्र मार्गदर्शकाची आणि दुर्बिणीची गरज आहे, असं ते म्हणाले.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)