प्रणिती शिंदे 'त्या' व्हायरल झालेल्या फोटोबद्दल काय म्हणाल्या

    • Author, निरंजन छानवाल
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे मास्क वापरले. त्यावरून केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसचा हा उद्दामपणा असल्याचं म्हटलं तर आमदार प्रणिती शिंदे यांनी यात कुठला उद्दामपणा दिसला, असा सवाल केला आहे.

नितीन नावाच्या एका व्यक्तिने @nithingsoma या ट्वीटर हँडलवरून प्रणिती शिंदे यांचा काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबरचा जल्लोष करतानाचा एक फोटो शेअर केला. त्यात प्रणिती शिंदे यांना टॅग करून यांचा उद्दामपणा बघा असं म्हटलं. या ट्वीटला 975 लोकांनी रिट्विट केलं. तर 1,157 जणांनी लाईक केलं.

याच ट्वीटला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी रिट्विट करत "यांचा विजयी होऊन 24 तासचं झाले आहेत आणि यांचा उद्दामपणा दिसू लागला आहे," असं म्हटलं आहे. स्मृती इराणी यांनी दुपारी बारा वाजेच्या आसपास केलेल्या या ट्वीटला 3,132 लोकांनी रिट्वीट केलं असून जवळपास आठ हजार लोकांनी लाईक केलं आहे.

मुळ ट्वीटमध्ये वापरण्यात आलेल्या फोटोत सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या आजूबाजूला काँग्रेसचे कार्यकर्ते झेंडे घेऊन उभे आहेत.

यात एकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मास्क घातला असून दुसऱ्या व्यक्तीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मास्क घातलेला आहे आणि त्यांच्याकडे चहाची कॅटली आणि कप आहेत.

याविषयी बीबीसी मराठीने आमदार प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

त्या म्हणाल्या, "तीन राज्यांतील निवडणुकांमध्ये काँग्रेसने विजय मिळवल्यानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. तिथं मला बोलावण्यात आलं होतं. भारतात सगळीकडेच जल्लोष करण्यात आला. आता यात जल्लोष साजरा करण्यात कुठला उद्धटपणा दिसला."

"काहींनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मास्क लावलेले होते, असं म्हणायचं असेल तर अनेक ठिकाणी तसे मास्क घातले जातात. कोण कुठली एक व्यक्ती ट्वीट करते आणि देशाच्या केंद्रीयमंत्री असलेल्या स्मृती इराणी त्याला रिट्विट करतात. भाजपचं बॅक ऑफिस काहीही म्हणेन. पण मला नेमका त्यांचा मुद्दाच कळालेला नाही. मी उद्धटपणा केला असं कसं काय म्हणू शकता," असा प्रश्नही त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)