You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुरजित भल्लांचा राजीनामा; उर्जित पटेलांनंतर आर्थिक सल्लागारांचाही काढता पाय
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीतील अर्थतज्ज्ञ सुरजित भल्ला यांनी राजीनामा दिला आहे. भल्ला यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही घोषणा केली.
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन, डॉ. अरविंद पनगडिया, डॉ. अरविंद सुब्रमण्यन्, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांच्यापाठोपाठ आता सुरजित भल्ला यांनीही राजीनामा दिला.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या प्रमुखपदी नीती आयोगाचे सदस्य बिबेक देबरॉय हे आहेत. रथिन रॉय, आशिमा गोयल आणि शमिका रवी हे समितीतील अन्य सदस्य आहेत.
आर्थिक सल्लागार समिती ही स्वतंत्र समिती अस्थायी स्वरूपाची असते. केंद्र सरकारला आणि प्रामुख्याने पंतप्रधानांना महत्त्वपूर्ण आर्थिक विषयांसंदर्भात सल्ला देणं हे या समितीचं प्रमुख उद्दिष्ट आहे.
सोमवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी राजीनामा दिला होता. वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचं पटेल यांनी सांगितलं होतं. 5 सप्टेंबर 2016 पासून ते रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी होते. त्याआधी 7 जानेवारी 2013 पासून ते डेप्युटी गव्हर्नरपदी कार्यरत होते.
रघुराम राजन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ऊर्जित पटेलांची रिझर्व्ह बँकेचे 24वे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्याच कार्यकाळात नोटबंदीचा निर्णय लागू करण्यात आला. त्यांनी नोटबंदीवर अनेक दिवस मौन बाळगल्यामुळे चर्चेला ऊत आला होता.
बुडित कर्जांविरोधात पटेल यांनी कठोर पावलं उचलली होती. बुडित कर्जांमध्ये घट झाली नाही तर दीर्घकाळात ते भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका बनू शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेच्या कठोर पावलांमुळे काबी बँकांना कर्जवितरण करण्यात अडचणी येत होत्या.
कोण आहेत भल्ला?
मॅक्रो इकॉनॉमिक धोरणासंदर्भात काम करणाऱ्या न्यूयॉर्कस्थित ऑब्झर्व्हेटरी ग्रुपचे सुरजित भल्ला ज्येष्ठ विश्लेषक आहेत. ओक्सस रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीचे ते चेअरमन आहेत.
दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते अध्यापनाचे काम करत होते. देशातल्या पहिल्या बिगरशासकीय आणि डावपेचासंदर्भात कार्यरत थिंकटँकचे ते कार्यकारी संचालक होते. 1999 पासून भल्ला केंद्र सरकारच्या नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च या देशातील सगळ्यांत मोठ्या थिंकटँकच्या प्रशासकीय समितीत कार्यरत आहेत.
रँड कॉर्पोरेशन तसंच द ब्रुकिंग्ज इन्स्टिट्यूट यांच्यासाठी भल्ला यांनी संशोधन अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम पाहिलं आहे. जागतिक बँकेच्या संशोधन आणि कोषाध्यक्ष विभागातही त्यांनी काम केलं आहे. डॉएच्च बँक आणि गोल्डमन सॅच कंपन्यांसाठीही त्यांनी काम केलं आहे.
जागतिकीकरण आणि त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम या विषयावर भल्ला यांची तीन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
'बिटवीन द विकेट्स: द हू अँड व्हाय ऑफ द बेस्ट इन क्रिकेट' या पुस्तकात त्यांनी खेळांमध्ये प्रदर्शन कसं सुधारावं या अनुषंगाने लिहिलं आहे.
भल्ला आर्थिक विषयांवर विविध वृत्तपत्रं तसंच मासिकांसाठी स्तंभलेखनही करतात.
प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे. पब्लिक अँड इंटरनॅशनल अफेअर्समध्ये त्यांनी वुड्रो विल्सन स्कूलमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.
सुरजित भल्ला हे सत्ताधारी भाजपचे निकटवर्तीय आहेत, असा काँग्रेसने नेहमी आरोप केला आहे. भल्ला हे राजकीय विषयांवर टीकाटिप्पणीही करत असतात. ते निवडणुकांची भाकितं व्यक्त करतात आणि वृत्तसंस्थांमध्येही सल्लागार पदांवर कार्यरत आहेत.
सुरजित भल्ला यांनी नोटबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. नोटबंदी यशस्वी झाली, असं मत त्यांनी वारंवार व्यक्त केलं होतं. त्यामुळे आता त्यांनीही राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)