नितीन गडकरींना सोलापूरमध्ये पुन्हा भोवळ, साखर कमी झाल्याचे परिणाम काय होतात?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

सोलापूर विद्यापिठाच्या एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. राष्ट्रगीत सुरू असताना त्यांना भोवळ आली. त्यांची तब्येत आता स्थिर आहे.

नितीन गडकरी यांचे सर्व नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

याआधी अहमदनगर जिल्ह्यातल्या कार्यक्रमात गडकरींना भोवळ आली आणि ते खाली पडत असताना बाजूच्या लोकांनी त्यांना सावरलं होतं. त्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांना चॉकलेट खायला दिलं. त्यानंतर काही क्षणानंतर गडकरी उठून उभे राहू शकले.

"राहुरीला कार्यक्रमामध्ये थोडं सफोकेशन झालं. मी त्या पदवीदान समारंभाचे कपडे परिधान केले होते, त्यामुळे ऑक्सिजन कमी आला, त्याच्यामुळे मला चक्कर आली होती. मला ब्लड प्रेशर, शुगर असा कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम नाही. माझी प्रकृती उत्तम आहे. काळजी करण्याचं कारण नाही," असं नितीन गडकरी यांनी नंतर एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

गडकरी यांना डायबेटिस आहे. "ब्लड शुगर कमी झाल्याने तब्येत खराब झाली होती. डॉक्टरांनी उपचार सुरू केला आहेत आणि आता माझी प्रकृती उत्तम आहे," असं त्यांनी एका ट्वीटमधूनही कळवलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी गडकरींना शुभेच्छा पाठवल्या आहेत. "कधीकधी परिश्रमामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. काळजी घ्या गडकरी जी," असं पवार एका ट्वीटमधून म्हणाले.

डायबेटिस असलेल्या अनेकांना या अनुभवातून जावं लागलं आहे.

मुंबईत राहणारे विश्वास भांबुरे (62) अशांपैकीच एक आहेत. गेल्या 15 वर्षांपासून भांबुरे यांना डायबेटिस आहे. त्यामुळे त्यांना अनेकवेळा चक्कर आली आहे.

त्यांनी असाचं एक प्रसंग सांगितला.

ते म्हणाले, "ठाण्यात असताना मी एकदा प्रवासात होतो. अचानक मला प्रचंड घाम आला. पोटात खड्डा पडल्यासारखं वाटलं आणि नंतर चक्कर आली. मग मी लगेच शेजारच्या स्टॉलवर जाऊन ज्यूस घेतलं. 10 मिनिटं खाली बसलो तेव्हा कुठे मला बरं वाटलं. नंतर मला कळालं की माझी शुगर लेव्हल अचानक कमी झाली होती."

"यानंतर प्रवास करताना मी नेहमी पाणी आणि बिस्किट सोबत ठेवायला लागलो. अनेकदा चक्कर यायचा प्रसंग माझ्यावर ओढवला. मला अनेक वर्षांपासून डायबेटिस असल्यामुळे साखरेचं प्रमाण कमी झालं आणि चक्कर यायला लागली की लगेच लक्षात येतं. असं झालं की मी लगेच पाणी पितो आणि बिस्किट खातो. क्षणभरानंतर बरं वाटायला लागतं," असं ते सांगतात.

"डायबेटिस असलेल्या व्यक्तीला चक्कर आली की त्यानं काही न काही गोड पदार्थ खायला हवा. एक चमचा साखर किंवा चॉकलेट खाल्लं तरी फरक जाणवतो," असं ते सांगतात.

भोवळीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रल्हाद केळवकर यांच्याशी संपर्क साधला.

भोवळ का येते?

मेंदूला काही क्षणापुरता रक्तपुरवठा कमी झाला की भोवळ येते. भोवळला वैद्यकीय भाषेत सिनकोप (Syncope) म्हणतात. डायबेटिसमध्ये येणाऱ्या भोवळीला hypoglycemic syncope म्हणतात. भोवळ ही एकाच प्रकारची असत नाही.

भोवळ आल्यावर शरीरात काय बदल होतात?

भोवळ ही काही वेळासाठी येते. भोवळ आली आणि व्यक्तीचे हात पाय थरथरायला लागले तर त्याला फीट असं म्हणतात.

दुसरं म्हणजे भोवळ आली आणि व्यक्ती बेशुद्ध पडली तर संबंधित व्यक्ती कोमात गेली असं म्हणतात.

डायबेटीस म्हणजे काय?

डायबेटीसमध्ये रक्तातील साखर कमी होते. रक्तातील साखर खूप कमी झाली किंवा खूप वाढली तरी भोवळ येते. यामुळे मग हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थितपणे होत नाही. बारीक रक्तवाहिन्यांमुळेही रक्त पुरवठा कमी होतो.

भोवळीवर उपाय काय?

भोवळीचा प्रकार कोणता आहे, त्यानुसार उपचार दिले जातात. MRI किंवा तत्सम चाचण्या केल्या जातात. पण आपण पाहतो की, भोवळ आली की लोक व्यक्तीच्या अंगावर पाणी शिंपडतात, त्याला सॉक्सचा वास देतात. पण भोवळीवर हा काही उपाय नाही. त्यासाठी दवाखान्यात उपचार घेणं आवश्यक असतं, असं ते म्हणाले.

'भोवळ रोखण्यासाठी वेळेवर खाणं महत्त्वाचं'

"शरीरातील साखरेचं प्रमाण कमी झालं तर भोवळ येऊ शकते. हे रोखायचं असेल तर वेळच्या वेळी खाणं महत्त्वाचं असतं. दर दोन-तीन तासांनी थोडंथोडं खात राहायला हवं. यामुळे मग अचानक शुगर कमी होणार नाही," भोवळीबद्दल असं डॉ. शशांक जोशी सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)