गज चक्रीवादळाने नाही, पाळीभोवतीच्या अनिष्ट प्रथेने 'माझ्या मुलीचा बळी घेतला'

महिला
    • Author, प्रमिला क्रृष्णन
    • Role, बीबीसी तामिळ प्रतिनिधी

"आई, मी मरणार आहे," 14 वर्षांच्या विजयालक्ष्मीने आपल्या आईला म्हटलेले हे शेवटचे शब्द.

गेल्या आठवड्यात तामिळनाडूत धडकलेल्या गज चक्रीवादळात विजयालक्ष्मी सापडली होती. तामिळनाडूतल्या तंजावर जिल्ह्यातल्या अन्नाईकाडू गावात ती राहायची. मासिक पाळीत मुलीने घराबाहेर झोपायचं, अशी परंपरा या भागात असल्याने विजयालक्ष्मी घराशेजारी गवताचं छप्पर असलेल्या झोपडीत झोपली होती.

तिच्याजवळच तिची आई भानुमतीही झोपलेली होती. पण वादळाने त्यांच्यावर नारळाचं एक झाड पडलं. यातून तिची आईतर थोडक्यात बचावली, पण विजयालक्ष्मी वाचू शकली नाही.

भारतात अजूनही अनेक भागांमध्ये मासिक पाळीला अशुद्ध समजलं जातं. या काळात स्त्री अपवित्र असते, असा समज आहे. पण त्यामुळे हा प्रश्न पडणं साहजिक आहे - विजयालक्ष्मीचा जीव खरच चक्रीवादळाने घेतला की अनिष्ट प्रथेने?

गज चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या किनारपट्टीच्या भागातील जवळपास 46 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.

विजयालक्ष्मीचे कुटुंबीय सांगतात भानुमती (40) आणि विजयालक्ष्मी (14) दोघी चक्रीवादळात नारळाच्या वाडीत बनवलेल्या झोपडीत अडकल्या. वादळामुळे नारळाचं एक झाडं उन्मळून थेट विजयालक्ष्मीच्या छातीवरच पडलं. तिच्या आईच्या पायाचं हाड मोडलं.

भानुमती यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मुलीच्या आठवणीने हेलावून गेलेल्या भानुमती बीबीसी तामिळशी बोलताना म्हणाल्या, "ती मला म्हणाली, आता मी लवकरच मरणार आहे. माझ्या डोळ्यांदेखत मी तिला मरताना पाहिलं. माझा पाय फ्रॅक्चर असल्याने मी हलू शकत नव्हते. सर्व ताकदीने ओरडून घरच्यांना बोलवणं, एवढंच मी करू शकत होते.

"पण जोवर घरची माणसं आणि शेजारीपाजारी आले, तोवर ती हे जग सोडून निघून गेली होती. तिच्या तोंडातून रक्त येत होतं आणि हेच शेवटचं चित्र माझ्या मनात कोरलं गेलंय. तिचा तो चेहरा मी आयुष्यभर विसरू शकणार नाही," विजयालक्ष्मीची आई सांगते.

झोपडी
फोटो कॅप्शन, गाजा चक्रीवादळामुळे तामिनळनाडूच्या किनारपट्टीच्या भागातील जवळपास 46 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.

मुलीच्या जाण्याने भानुमती कोलमडून गेल्या आहेत. मुलीच्या आठवणीने त्या रडू लागल्या की हॉस्पिटलमधल्या इतर बायका त्यांचं सांत्वन करतात. त्यांची बहीण त्यांना बळजबरीने औषध आणि जेवण भरवते. मात्र भानुमती फक्त विजयालक्ष्मीविषयी पुटपुटत असतात.

"माझी बहीण सांगते, माझ्या मुलीसोबत मला बाहेर काढलं तेव्हा मी बेशुद्ध होते. इथे माझ्यावर उपचार सुरू आहेत. माझी मुलगी मी गमावली यावर माझा विश्वासच बसत नाहीये. तिला मुखाग्नी दिली, त्यावेळी तिचा चेहराही मी बघू शकले नाही, ही खंत मला आयुष्यभर राहील," असं भानुमती सांगतात.

अश्रू अनावर झाले असतानाही त्या बोलणं सुरू ठेवतात, "ती माझी परी होती. आपल्याला वेदना होत असताना आपल्या मुलीने आपल्या शेजारी असावं, असं प्रत्येक आईला वाटतं. पण माझ्याकडे बघा. मी जिवंत आहे आणि या जगात जिच्यावर मी सर्वांत जास्त प्रेम केलं, ती माझी मुलगी मी गमावून बसलीये. मला तिला मोठं होताना बघायचं होतं. माझी सगळी स्वप्न उद्ध्वस्त झालीत."

"आमच्या गावात मासिक पाळीच्या वेळी मुलींना दूर ठेवण्याची प्रथा आहे. मुलगी वयात आली की सोळा दिवस तिला घरापासून वेगळं राहावं लागतं. सोळाव्या दिवशी एक सोहळा होतो आणि त्यानंतरच तिला घरात आणलं जातं. अनेक वर्षांपासून आम्ही हे पाळत आलो आहोत. माझ्या बाबतीतसुद्धा हेच झालं होतं. या परंपरेमुळेच मी तिला घरात नेऊ शकत नव्हते. पण त्यामुळे मी तिला गमावूनच बसले. या परंपरेने माझ्या मुलीचा कसा बळी घेतला, हे आता माझ्या लक्षात येतंय," असं त्या म्हणाल्या.

झोपडी
फोटो कॅप्शन, विजयालक्ष्मीची आजी सांगते, ''झोपडीवर झाड पडलेलं बघितलं तेव्हाच आमच्या आशा संपल्या होत्या.

घरात विजयालक्ष्मीच्या आजी-आजोबांचं दुःख तर सांत्वन करण्यापलीकडचं आहे. तिची आजी विसलक्ष्मी सांगते, "झोपडीवर झाड पडलेलं बघितलं, तेव्हाच आमच्या आशा संपल्या होत्या. गावकरी येतील आणि झोपडीतून तिला बाहेर काढतील, आम्ही याची वाट बघत बसलो होतो."

गावकऱ्यांनी तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र हॉस्पिटलमध्ये आणण्याच्या काही तास आधीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

आजी पुढे सांगतात, "तिला दुसरीकडे घेऊन जा, असं मी त्यांना सांगितलं. मात्र काही तासातच वादळ आमच्या गावात धडकलं आणि मग आम्हाला कुठे जाताच आलं नाही. आम्ही तिला नाराळाच्या वाडीशिवाय दुसरीकडे कुठेच घेऊन जाऊ शकत नव्हतो. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही इथे काम करतोय. इतर कुठे जाण्यासाठी आमच्याकडे ठिकाणच नाही."

स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या वीरसेना सांगतात की मासिक पाळीत मुलीला वेगळं झोपवणं, ही परंपरा गरीब, श्रीमंत सगळेच पाळतात.

मासिक पाळीदरम्यान मुलींच्या सुरक्षेविषयी तामिळनाडू बालहक्क आयोगाच्या अध्यक्ष एम. पी. निर्मला यांच्याशी बातचीत केली. त्यांनी सांगितलं की मासिक पाळी अशुद्ध नाही, हे लोकांना पटवून देणं खूप कठीण आहे.

निर्मला म्हणतात, "ही आमच्यासाठी धक्कादायकच बातमी आहे. लोक अशा परंपरांवर विश्वास ठेवून आपल्या मुलींना असं एकटं कसं सोडू शकतात? पेलांबरून जिल्ह्यातही अशा काही घटना मी बघितल्या आहेत. आपल्याला जागरूकता वाढवली पाहिजे आणि मासिक पाळीबाबत असलेले गैरसमज दूर केले पाहिजे. मात्र हे खूपच कठीण काम आहे."

विजयालक्ष्मीचं दप्तर
फोटो कॅप्शन, विजयालक्ष्मीचं दप्तर

वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली आणि 12 जिल्ह्यात जवळपास 80 हजार हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.

या भागातल्या लोकांचं उपजीविकेचं महत्त्वाचं साधन म्हणजे मासेमारी आणि नारळ, चिंचेसारखी नगदी पिकं. दोन्हींना वादळाचा फटका बसला आहे. मासेमारी करणाऱ्या होड्यांचं नुकसान झालं तर किनारपट्टीवरच्या गावांमध्ये अनेक घरात समुद्राचं पाणी शिरलं.

सरकार आपत्तीग्रस्तांना अन्न आणि पाण्यासारख्या मूलभूत सोयीही देत नसल्याचा आरोप करत, काही जिल्ह्यांमध्ये गावकऱ्यांनी निदर्शनंही केली.

मात्र प्रशासनाने उभारलेल्या सर्व 493 बचाव छावण्यांमध्ये पुरेसं अन्न, पाणी आणि ब्लँकेट यांचं वाटप केल्याचं स्थानिक प्रशासनाने एका निवेदनात म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)