पुलगाव स्फोट: 'ते रोज मृत्यूचा सामना करायचे, पण त्या दिवशी देवानं साथ दिली नाही'

फोटो स्रोत, BBC/nitesh raut
- Author, नीतेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी पुलगाव, वर्ध्याहून
"रोजंदारीची कामं मिळत नाही. त्यामुळं जीवाची पर्वा न करता या कामावर ते जायचे. आज सकाळी सहा वाजता कामावर गेले. ट्रकमधून बाँबच्या पेट्या उतरवताना अचानक स्फोट झाला आणि त्यातच ते गेले," नारायणराव पचारे यांच्या पत्नी दुर्गा पचारे सांगत होत्या.
वर्धा जिल्यातील पुलगाव तालुक्यात मंगळवारी झालेल्या बाँब स्फोटात नारायणराव पचारे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे.
भूमिहीन शेतकरी असल्यामुळे मजुरी करून ते कुटुंब चालवत होते. त्यासाठी गावाशेजारील केंद्रीय दारूगोळा कंपनीत बाँब निकामी करण्याचं काम ते करायचे.
"जोखमीच्या कामावर जाण्यापासून आम्ही त्यांना अनेकदा हटकलं. कुटुंब जगवण्यासाठी या कामावर गेल्याशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणायचे. कंत्राटदार गावातील मजुरांसोबत त्यांनाही सोबत न्यायचा. 200 रुपये मजुरी मिळायची."
दुर्गा आवंढा गिळत सांगतात, "स्फोटकांमध्ये साध्या कपड्यांवर रोज मृत्यूशी दोन हात करून ते परत यायचे. पण त्या दिवशी देवाने त्यांना साथ दिली नाही."
'त्या' दिवशी काय घडलं?
मंगळवारी सकाळी 7 वाजता जबलपूरच्या खामरिया ऑर्डिनन्स फॅक्टरीमधून लँडमाइन्सच्या 120 पेट्या निकामी करण्याचं काम सुरू होतं. लँडमाइन्स निकामी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान स्फोटकांनी भरलेल्या गाड्या तिथे आल्या.

फोटो स्रोत, BBC/nitesh raut
त्या दिवशी योगेश नेरकर तिथे उपस्थित होते. ते सांगतात, "सकाळी पोते भरायचं काम करत होतो. बाँबच्या पेट्याही ते आम्हालाच उतरवायला सांगतात. तसं करण्यास नकार दिला की ते आमच्या नावावर खड्डा लावायचे नाही. म्हणून त्या पेट्या उतरवणं भाग पडायचं.
"गाडीमध्ये जवळपास निकामी करण्यासाठी आणलेल्या स्फोटकांचे 120 बॉक्स होते. दोन खड्ड्यांमध्ये भरायला 24 बॉक्स खाली उतरवण्यात आले. सात ते आठ पेट्या खड्ड्यापर्यंत पोहोचल्या होत्या. त्यातल्या शेवटच्या पेटीत स्फोट झाला आणि तिघे जागीच गेले.
नेरकर पुढे सांगतात, "एक जण जखमी अवस्थेत तडफडत होता. मी त्याला उचललं. त्याच्या पाठीला छिद्रं पडलेलं होतं. सतत रक्त वाहत होतं. आम्ही जखमींना गाडीत टाकलं आणि सावंगी रुग्णालयात दाखल केलं."
या स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की काही किलोमीटरपर्यंतचा परिसर दणाणून गेला. या स्फोटामध्ये ठार झालेल्या 6 जणांपैकी 5 जण कंत्राटी मजूर आहेत. ते डेपोला लागून असलेल्या सोनेगावचे आहेत.
कशी लावली जाते स्फोटकांची विल्हेवाट?
वर्धा जिल्ह्यातील पुलगाव तालुक्यात आशियातला दुसरा सर्वांत मोठा ऑर्डिनन्स डेपो आहे. जवळपास 40 वर्ग किलोमीटर परिसरात पसरलेल्या या डेपोत अंत्यत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त असतो.

फोटो स्रोत, BBC/nitesh raut
देशभरातला दारुगोळा ठेवण्याचं काम आणि मुदत संपलेला दारुगोळा नष्ट करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. लष्करी दारुगोळा भांडारात तयार झालेले बाँब आणि इतर ठिकाणाहून तयार झालेले बाँब दरवर्षी इथेच निकामी केले जातात.
देवळी तालुक्यातील सोनेगाव पासून चार किलोमीटर अंतरावर बाँब निकामी करण्याचं ठिकाण आहे. खोल खड्ड्यात बाँब ठेऊन त्यावर रेतीचे पोते ठेऊन बाँब निकामी केले जातात. जवळपासच्या गावातील 200 मजूर या कामावर लावले जातात.
बाँब निकामी करताना अनेकदा स्फोट होतो. या घटना कंत्राटदाराकडून दाबल्या जातात, असं काही स्थानिकांनी सांगितलं.
पहिल्यांदा स्फोट नाही
मुदत संपलेले बाँब निकामी करताना यापूर्वीही अनेकदा स्फोट झाले आहेत. दहा दिवसांपूर्वी इथेच झालेल्या स्फोटात 25 वर्षांच्या विक्रम ठाकरेंचा उजवा हात भाजला गेला होता. बाँब नष्ट केल्यानंतर त्यामधून निघणारं लोखंड वेचण्याचं काम विक्रम करतात.
"लोखंड वेचताना अचानक बाजूला स्फोट झाला. गरम राख शरीरावर आली आणि हात भाजला," असं विक्रम यांनी त्यांच्यासोबतच्या अपघाताबद्दल सांगितलं.
उपचारासाठी 80 हजार रुपये खर्च झाला, जो दिवसाला जेमतेम 150-200 रुपये कमावणाऱ्या विक्रम यांना झेपणारा नव्हता. पण उपचारासाठी खर्च मिळणे तर दूरच, कंत्राटदाराने साधी विचारपूसही केली नाही, अशी त्यांची तक्रार आहे.

फोटो स्रोत, BBC/nitesh raut
"घरची परिस्थिती गंभीर आहे. पोटापाण्यासाठी दररोज हा जीवघेणा खेळ करावा लागतो. कधी मजुरी मिळायची तर कधी थापड मारून परत पाठवायचा," विक्रम सांगतात.
मग त्या हात भाजण्याच्या दुर्घटनेनंतर काही मोबदला मिळाला नाही का, असं विचारल्यावर विक्रम सांगतात, "कंपनीचा आणि आमचा थेट संबंध नाही. चांडक नावाचा कंत्राटदार काम द्यायचा. कंत्राटदाराकडून मोबदला मिळण्याची अपेक्षा होती. पण तुम्ही एकदा जखमी झालात की त्याचा आणि आमचा संबंध संपला."
योगेश नेरकर यांच्या माहितीनुसार, एका खड्ड्यात 40 सेल असलेल्या 12 पेट्या लावल्या जातात. विशिष्ट प्रक्रियेतून याला ब्लास्ट करण्यात येतं. ब्लास्ट करताना अनेकदा काही बाँब त्वरित तर काही विलंबानं फुटतात. एकाच वेळी स्फोट होईल, असं होत नाही. स्फोट झाल्यानंतर बाँबवरचे आवरण वेचले जातात. त्यामधून कंत्राटदाराला किमान लाखोंचा फायदा होतो. आणि मजुरांच्या नशिबी येते ती कधी 200 रुपये मजुरी तर कधी मृत्यू.

फोटो स्रोत, BBC/nitesh raut
संरक्षण मंत्रालयाच्या नागपूर विभागाचे जनसंपर्क अधिकारी कॅप्टन बी. बी. पांडे यांनी माहिती दिली की मृतांमध्ये एक व्यक्ती शस्त्र भांडारातील कर्मचारी आहे तर इतर सर्व खासगी कंत्राटदाराचे कर्मचारी आहेत.
"चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीतील तज्ज्ञांचं पथक पुलगावला येत असून त्यांनी पाहाणी केल्यानंतर स्फोट नेमका कसा झाला ते सांगता येईल," असं पांडे यांनी सांगितलं.
दरम्यान, पुलगाव स्फोटाप्रकरणी चौकशीअंती कारवाई करू, असं आश्वासन केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी गुरुवारी दिलं.
मात्र सगळी बोटं कंत्राटदारांकडे दाखवली जात असल्यामुळे नेमकी याची जबाबदारी कुणाची, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र या कर्मचाऱ्यांचा कंत्राटदार कोण आहे, या प्रश्नाचं उत्तर पांडे यांनी सुरक्षेचं कारण पुढे करत देणं टाळलं.
इतरांनीही यावर भाष्य करणं टाळलं. आम्ही मग चांडक नावाच्या त्या कंत्राटदाराला गाठण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे दोन्ही मोबाईल बंद होते. काहीही प्रतिसाद आल्यास ही बातमी अपडेट केली जाईल.
सततच्या स्फोटांमुळे परिसरात दहशत
स्फोटाच्या आवाजाने सोनेगाव, केळापूर या गावामध्ये हादरे बसतात. कानठळ्या बसणे, घराच्या भिंतीला तडा जाणे नेहमीचेच आहे. अनेकांवर कायम कर्णबधिर होण्याची वेळ आलीय.
"ब्लास्ट केल्यानंतर बाँबचे तुकडे आसपासच्या परिसरात येतात. याचा मारा इतका जोरदार असतो की शेतात काम करणारे शेतकरीसुद्धा अनेकदा जखमी झाले आहे," असं गावकरी प्रशांत गोरे सांगतात.

फोटो स्रोत, BBC/nitesh raut
पुलगाव इथल्या दारूगोळा भांडारात 31 मे 2016 ला झालेल्या स्फोटात 17 जण ठार झाले होते. या भीषण स्फोटानंतर आजूबाजूच्या गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं होतं.
या घटनेमुळे धास्तावलेले देवळी तालुक्यातले आगरगाव, मुरदगाव, नागझरीच्या गावकऱ्यांनी पुनर्वसनाची मागणी केली होती. या मागणीचं काय झालं, हे संबंधित पुनर्वसन अधिकाऱ्यांकडून जाणण्याचा प्रयत्नही बीबीसी मराठीने केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. काही उत्तर आल्यास ही बातमी अपडेट केली जाईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








