पंजाब बाँब स्फोटानंतर उपस्थित होणारे 5 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

    • Author, खुशहाल लाली आणि अरविंद छाबडा
    • Role, बीबीसी पंजाबी प्रतिनिधी

शीख धर्मीयांचे सर्वांत पवित्र शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृतसरपासून काही अंतरावर असलेल्या गावात निरंकारी भवनमध्ये एक स्फोट झाला. त्यात तीन लोक ठार तर 19 लोक जखमी झाले.

रविवारच्या सत्संगादरम्यान हा स्फोट झाला. त्यावेळी त्या ठिकाणी शेकडो लोक उपस्थित होते. अद्याप कोणत्याही संघटनेनी हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही.

या हल्ल्यानंतर अनेकांच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न.

1. अमृतसर हल्ल्यापाठीमागे नेमकं कोण?

चेहरा झाकलेले दोन जण मोटरसायकलवर आले. ते पंजाबी बोलत होते. त्यांपैकी एकाने गेटवर असलेल्या सुरक्षा रक्षकावर पिस्तुल रोखलं आणि दुसरा भवनात गेला, असं घटनेचे साक्षीदार सांगतात.

भवनात साप्ताहिक सत्संग चालू होता. हल्लेखोरानं व्यासपीठाकडे ग्रेनेड फेकले. त्याचा स्फोट झाला त्यात तीन लोक मृत्युमुखी पडले आणि 19 जण जखमी झाले.

हा हल्ला दहशतवादी आहे की नाही अशी शक्यता पडताळून पाहिली जात आहे. अद्याप कोणत्याही संघटनेनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

पंजाबात जैश-ए-मोहम्मदचे सहा सात कट्टरवादी घुसले आहेत, अशी अफवा होती. त्यानंतर पोलिसांनी हाय-अलर्ट जारी केला होता.

नुकताच जालंधर येथील मकसूदां पोलीस स्टेशनमध्ये हॅंड ग्रेनेडचा एक हल्ला झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी काही काश्मिरी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे.

या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी करत आहे. या प्रकरणात कट्टरवादी संघटन खलिस्तान लिब्रेशन फोर्सशी संबंधित लोकांना अटक केली आहे.

या व्यतिरिक्त 2016मध्ये पठाणकोट एअरबेसवर आणि 2015मध्ये गुरुदासपूरच्या दीनानगर पोलीस स्टेशनवर कट्टरवाद्यांचे हल्ले झाले आहे. 2017 साली भटिंडा जिल्ह्यात झालेल्या स्फोटात पाच लोकांचा जीव गेला होता.

कट्टरवाद्यांचा काही धोका नाही पण आपल्याला सावध राहावं लागेल, असं लष्कर प्रमुख बिपिन सिंह रावत म्हणाले होते. कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला तर तो रोखण्यास आम्ही सक्षम आहोत, असं रावत म्हणाले.

काही दिवसांपूर्वी विदेशात राहणाऱ्या पण मूळच्या पंजाबी असलेल्या लोकांनी 2020मध्ये पंजाब हे वेगळं राष्ट्र व्हावं यासाठी आंदोलन केलं होतं.

2. शीख आणि निरंकारी पंथात काय फरक आहे?

निरंकारी मिशन या पंथाची सुरुवात 1929मध्ये झाली. शीख धर्मात गुरुग्रंथ साहेबला गुरू मानण्याची परंपरा आहे. ही परंपरा मोडित काढून व्यक्तीला गुरू मानण्याची प्रथा त्यांनी सुरू केली.

पंजाब युनिव्हर्सिटीचे निवृत्त प्राध्यापक आणि विश्व पंजाब केंद्राचे संचालक डॉक्टर बलकार सिंह सांगतात, "शीख गुरुग्रंथ साहेबलाच आपला गुरू मानतात त्या व्यतिरिक्त त्यांचा कुणी गुरू नसतो. निरंकारी हे गुरुग्रंथ साहेबलाच आपला गुरू मानतात पण हा ग्रंथ समजावून देण्यासाठी एखाद्या व्यक्तीची गरज आहे. त्या व्यक्तीला ते त्यांच्या पंथाचा गुरू मानतात."

या मिशनचे गुरू बाबा अवतार सिंह यांनी रचलेल्या गाथेला अवतारवाणी हे नाव देण्यात आलं. शीख विद्वानांचं मत आहे की अवतारवाणीने शीख तत्त्वांसोबत छेडछाड केली आहे.

विचारधारेच्या याच मतभेदांमुळे 1978 मध्ये हिंसा झाली. अमृतसर येथे निरंकारी मिशनच्या कार्यक्रमाचा काही लोकांनी विरोध केला. त्यांचा विरोध इतका तीव्र झाला की तो थांबवण्यासाठी गोळीबार करावा लागला. त्यात 16 लोक मारले गेले होते. त्यात तीन निरंकारी पंथातील होते तर 13 जण शीख समुदायातील होते.

त्यावेळी गुरबचन सिंग हे निरंकारी पंथाचे प्रमुख होते. 16 जणांच्या मृत्यूमुळे शीख संप्रदायातील काही लोक नाराज होते. 24 एप्रिल 1980ला शीख कार्यकर्ता रणजीत सिंग आणि त्याच्या साथीदारांनी गुरबचन यांची हत्या केली.

या प्रकरणात दमदमी टकसालचे प्रमुख जरनैल सिंग भिंद्रनवाले यांना अटक करण्यात आली होती. पण त्यांना नंतर सोडण्यात आलं. या प्रकरणात रणजीत सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात आली. नंतर त्यांना राष्ट्रपतींनी त्यांची शिक्षा माफ केली. काही वर्षांची शिक्षा भोगून आल्यावर तो अकाल तख्तचा जत्थेदार बनला.

निरंकारी स्वतःला शीखांपासून वेगळं समजतात आणि अकाल तख्ताने त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे.

4. शीख आणि निरंकारी मतभेदातून हा हल्ला झाला का?

अद्याप या बाबतीत पोलिसांना काही पुरावे सापडले नाहीत. 1978नंतर निरंकारी आणि शीखांमध्ये काही हिंसक घटना झालेल्या नाहीत. मतभेद राहू नयेत म्हणून दोन्ही समाजांकडून प्रयत्न होतात.

5. पंजाबच्या राजकारणावर काय फरक पडेल?

या हल्ल्यानंतर सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्यातला अकाली पंथाचा प्रभाव कमी व्हावा म्हणून कट्टर विचार असलेल्या पक्षांना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी चिथावणी दिली, असा आरोप केला जात आहे.

निवडणुकीनंतर निष्प्रभ झालेल्या अकाली दलाने पुन्हा आपलं सामर्थ्य एकवटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अशा स्थितीत त्यांना काँग्रेसवर टीका करायची संधी मिळाली आहे.

अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे सामान्य माणसाच्या इतर प्रश्नांकडे काणाडोळा होण्याची शक्यता आहे. पंजाबचे लोक हिंसेचे आगीत याआधी चांगलेच होरपळलेले आहेत. 1990पासून राज्यात शांतता आहे. पण पंजाबमध्ये संवेदनशील मुद्दे उचलण्यास सुरुवात झाली आहे.

हल्ल्यानंतर अकाली दलाच्या नेत्या हरसिम्रत कौर यांनी ट्वीट करून अमरिंदर सिंग यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उचलले आहेत. त्या म्हणतात, "आधी बाँब, मग ग्रेनेड हल्ला. पुढे काय होणार आहे राजा साहेब? हिंसक तत्त्वांना खतपाणी घालू नका. परिश्रम करून मिळवलेलं शांततेचं वातावरण तुम्ही आणि तुमचे मंत्री बिघडवत आहेत. राजकारण करणं सोडा आणि सुशासनाबाबत गंभीर व्हा. पंजाबी लोकांना पुन्हा त्या काळोखाच्या गर्तेत जाण्याची इच्छा नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)