कर्नाटक पोटनिवडणूक : काँग्रेसने बेल्लारी जिंकण्यामागं ही आहेत कारणं

राहुल गांधी

फोटो स्रोत, Twiitte@INCINDIA

    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या काँग्रेसनं धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देऊ केलं आणि कर्नाटकात आघाडी करत निसटती सत्ता पुन्हा ताब्यात घेतली. त्यांच्या या खेळीचं फळ आता त्यांना चाखायला मिळतंय.

कर्नाटकात झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवमोगाची एक जागा वगळता इतर दोन ठिकाणी या आघाडीनं विजय मिळवला आहे.

मात्र अंतर्गत गटबाजीमुळे भाजपला लिंगायतांचं प्राबल्य असलेल्या जामखंडीसारख्या मतदरासंघावर पाणी सोडावं लागलं. भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा देखील याच समाजाचे आहेत.

या पोटनिवडणुकीत काँग्रेस-जेडीएस आघाडीनं लोकसभेच्या मंड्या (जेडीएस) आणि बेल्लारी (काँग्रेस) तर विधानसभेच्या रामनगराम (जेडीएस, इथं भाजप उमेदवारानं राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.) आणि जामखंडी या मतदारसंघांमध्ये विजय मिळवला.

भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र हे लोकसभेच्या शिवमोगा जागेवरून निवडून आलेत. त्यांनी जेडीएसच्या मधू बंगारप्पा यांचा 52,000 मतांनी पराभव केला.

मात्र बेल्लारी मतदारसंघात काँग्रेस उमेदवारानं भाजप उमेदवाराचा तब्बल 2 लाख 43 हजार एवढ्या मोठ्या फरकानं पराभव केल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

राजकीय विश्लेषक आणि जैन विद्यापीठाचे प्रो-व्हाईस चान्सलर डॉ. संदीप शास्त्री यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, "काँग्रेसनं जिथं प्रादेशिक पक्षासोबत आघाडी केली आहे अशा कर्नाटक राज्यानं दिलेला हा महत्त्वाचा संदेश आहे. तुम्ही स्थानिक पातळीवर युती करून एकत्र काम केलं नाही तर कुठल्याही युतीचं भविष्य क्षीण असेल, हे या आघाडीने दाखवून दिलं आहे. "

बी. एस. येडियुरप्पा

फोटो स्रोत, Getty Images

आऊटलूक मासिकाचे माजी संपादक कृष्णा प्रसाद म्हणतात, "बेल्लारीमधला विजय हा काँग्रेस-जेडीएस आघाडीसाठी योग्य वेळी साधलेला निशाणा ठरला आहे. योग्य समीकरण जुळवलं तर मोदी-शहा या जोडगोळीलाही शह देता येतो, तेही कुठल्याही मोठ्या चेहऱ्याशिवाय, असा संदेश या विजयानं दिला आहे."

डॉ. शास्त्री यांच्या मते, "काँग्रेस-जेडीएस यांच्यातली केमिस्ट्री आता कुठे जुळून येत आहे. या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद होते. मात्र हा विजय मिळवण्यासाठी त्यांनी हे मतभेद ओलांडले. तसंच या निकालामुळे भाजपमधली गटबाजीही समोर आली आहे. येडियुरप्पा यांच्या मतदारसंघाव्यतिरिक्त इतर कुठल्याच मतदारसंघात भाजपला विजय संपादन करता आलेला नाही. हे गटबाजीमुळे घडलेलं आहे."

पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजप सरकारच्या काळात कायदा मंत्री असलेले सुरेश कुमार यांनी ट्विट केलंय. त्यात ते म्हणतात, "ही खरी आत्मपरिक्षण करण्याची वेळ आहे," पक्षवर्तुळातही अशीच भावना आहे.

विधान परिषदेचे माजी आमदार आणि नुकतेच उपप्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले भानू प्रकाश म्हणतात, "आपण नेहमीच आत्मपरिक्षण केलं पाहिजे. तरच आपण राजकारणात वर जाऊ शकतो. आपण जे करतो तेच नेहमी योग्य आणि इतर म्हणतात ते चूक, असा विचार करणं दरवेळी योग्य नसतं. राज्यातल्या नेतृत्त्वाबद्दल केंद्रातल्या नेतृत्त्वानं विचार करण्याची ही वेळ आहे."

कर्नाटक विधानसभेसमोर निवडणूक आयोगाचं चिन्ह घालून मतदानासाठी आवाहन करणारा माणूस.

फोटो स्रोत, Getty Images

प्रकाश यांच्या या वक्तव्यातून भाजपतल्या येडियुरप्पा विरोधकांची भावना व्यक्त होते. भाजपतल्या काहींना येडियुरप्पा यांना आता मार्गदर्शक मंडळात पाठवावं असं वाटतं.

मात्र पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा त्याला ठाम विरोध आहे. येडियुरप्पा यांना काढलं तर लिंगायत व्होट बँकेवर याचा परिणाम होईल, असं त्यांना वाटतं.

मात्र भाजपचा परंपरागत मतदार समजल्या जाणाऱ्या लिंगायतांचा प्रभाव असलेल्या जामखंडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी भाजप आणि काँग्रेस दोन्हींच्या कार्यकर्त्यांचा हातभार लागला, असं म्हणावं लागेल.

त्याला तीन कारणं आहेत. पहिलं म्हणजे काँग्रेस उमेदवार आनंद न्यामेगौडा यांचे वडील सिद्दू न्यामेगौडा ऊर्फ बॅरेजमॅन यांच्या मृत्यूमुळे या मतदारसंघात सहानुभूतीची लाट त्यांच्या बाजूने होती.

दुसरं म्हणजे काँग्रेसची व्होटबँक असलेल्या अहिंदा म्हणजेच अल्पसंख्याक, इतर मागासवर्गीय आणि दलित यांची एकगठ्ठा मतं काँग्रेसला मिळाली.

कर्नाटकात प्रचारादरम्यान राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

आणि तिसरं कारण म्हणजे भाजपमधली गटबाजी आणि लिंगायतांमधला एक गट काँग्रेसकडे वळल्याने काँग्रेसला विजय मिळाला. लिंगायतांना अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याचा निर्णय हा त्या समाजाच्या नेत्यांच्या मागणीवरूनच घेतल्याचं माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटल्यामुळे देखील हे घडलं.

लिंगायत मतदार जिथं मोठ्या प्रमाणावर भाजपच्या बाजूनं मत द्यायचे असा लोकसभेचा दुसरा महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे बेल्लारी. भाजप नेते गली जनार्दन रेड्डी यांच्या कथित खाण घोटाळ्यामुळे एकेकाळी या भागाला 'रिपब्लिक ऑफ बेल्लारी 'असंही म्हटलं जायचं.

काँग्रेस

फोटो स्रोत, JAGADEESH NV/EPA

नाव उघड न करण्याच्या अटीवर एका भाजप नेत्यानं सांगितलं, "बेल्लारीच्या विजयाचं श्रेय डी. के. शिवकुमार (जलसंधारण मंत्री) यांना जातं. त्यांनी एक टीम म्हणून काम केलं आणि उत्तम काम केलं. आम्हाला अशाच व्यक्तीची गरज आहे. काही कारणामुळे आमच्या पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहच नव्हता. बी. श्रीरामलू यांना भविष्यातले मुख्यमंत्री म्हणून समोर करणं चुकीचं होतं. लोकांना खाण लॉबीचा कंटाळा आला आहे."

मात्र काँग्रेस नेते वेगळा विचार करतात. ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री कृष्णा गौडा सांगतात, "पंतप्रधानांच्या सांत्वनपर शब्दांनी लोकांची भूक आणि गरज भागत नाही. हाच कल आजपर्यंत दिसला आहे. आणि काँग्रेस केंद्रस्थानी नसलं तरी लोक आता काँग्रेस-युक्त अशा भाजप विरोधी आघाडीकडे पर्याय म्हणून बघू लागले आहेत."

लोकसभेच्या मंड्या आणि विधानसभेच्या रामनगराम या दक्षिण कर्नाटकातल्या मतदारसंघांमध्ये पूर्वी काँग्रेस विरुद्ध जेडीएस अशीच लढत असायची. आता या दोघाची युती झाल्याने जेडीएसचा विजय अपेक्षितच होता.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)